बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदा महिला टी-२० क्रिकेट सामना ठेवण्यात आला आहे. या क्रिकेट सामन्यात देखील भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. एजबस्टन क्रिकेट स्टेडियम वर सुवर्णपदकासाठी भारत विरुध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघात ऑस्ट्रेलिया हा संघ शक्तीशाली मानला जातो. भारतीय महिला क्रिकेट संघ कागारुंचा पराभव कसा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेचा महिला क्रिकेट संघाचा अंतिम सामना रविवार, दि. ७ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार एजबस्टन क्रिकेट स्टेडियम वर रात्री ९:३० होणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाला वचपा काढण्याची संधी मिळणार आहे. भारताची सलामीची जोडी सध्या जोरात आहे. सलामीवीर स्मृती मंधानाने आतापर्यंत २ अर्धशतकं मारली आहेत. यामुळे अंतिम सामन्यात तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय, कर्णधार हरमनप्रीत कौर, रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकार यांची कामगिरीही मोलाची ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत आता पर्यत एकही सामना हरला नाही. मेग लॅनिंगच्या नेतृत्त्वात संघाने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. ऑस्ट्रेलियाला हरवणे भारतीय महिला संघाला मोठे आव्हान असणार आहे.