हर घर तिरंगा: एक भव्य राष्ट्रीय संदेश

    06-Aug-2022   
Total Views |

modi
 

काँग्रेस पक्षाने ‘हर घर तिरंगा’ अभियानालाही विरोध केला. काँग्रेस हा राजकीय पक्ष असल्यामुळे भाजपला विरोध करणे त्यांना आवश्यक असते. विरोध केला नाही, तर आपली ओळख पुसून जाईल, याची भीती काँग्रेसला वाटते. तसे व्हायचे नसेल, तर काँग्रेसने सर्व देशवासीयांना सहज करता येईल, असा कार्यक्रम दिला पाहिजे. परंतु, तेवढी कल्पकता असणारा नेता काँग्रेसमध्ये नाही. वायफळ बडबड करणारे नेते मात्र भरपूर आहेत.
 
 
यंदाच्या स्वातंत्र्यदिनी भारतातील सर्व नागरिक आपल्या घरी तिरंगा झेंडा लावणार आहेत. प्रत्येकाला तिरंगा उपलब्ध होणार आहे. सर्व देशाला नरेंद्र मोदी यांनी एक कार्यक्रम दिला आहे. सर्वसामान्य माणसाला सहज करता येईल, असा कार्यक्रम देणे, हे महात्मा गांधीजींचे वैशिष्ट्य होते. नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीजींचा हा गुण उचलला आहे. कोरोना ‘लॉकडाऊन’च्या काळातही प्रत्येकाने घरी दिवा लावावा, थाळी वादन करावे, असे दोन कार्यक्रम त्यांनी दिले होते. हे सर्व कार्यक्रम देशवासीयांनी स्वीकारले आणि त्याची अंमलबजावणी केली. ‘हर घर तिरंगा’ हा तसा तिसरा कार्यक्रम आहे.
 
 
काँग्रेस पक्षाने या तिन्ही कार्यक्रमांच्या वेळी राजकारण केले. त्याला विरोधही केला. काँग्रेस हा राजकीय पक्ष असल्यामुळे भाजपला विरोध करणे त्यांना आवश्यक असते. विरोध केला नाही, तर आपली ओळख पुसून जाईल, याची भीती काँग्रेसला वाटते. तसे व्हायचे नसेल, तर काँग्रेसने सर्व देशवासीयांना सहज करता येईल, असा कार्यक्रम दिला पाहिजे. परंतु, तेवढी कल्पकता असणारा नेता काँग्रेसमध्ये नाही. वायफळ बडबड करणारे नेते मात्र भरपूर आहेत.
 
 
या वायफळ बडबड करणार्‍या नेत्यांचे नेतृत्त्व राहुल गांधी करीत असतात. त्यांच्याइतकी अर्थहीन, विचारहीन, आशयहीन बडबड करणारा नेता स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेसमध्ये दुसरा झालेला नाही. याबाबतीत ते एकमेवाद्वितीय आहेत. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाला काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी विरोध केला. ते जे काही म्हणाले, ते जसेच्या तसे राहुल गांधी म्हणाले. या ठिकाणीदेखील राहुल गांधी यांचे स्वतंत्र डोके चालले नाही.
 
 
राहुल गांधी म्हणाले त्यात नवीन काही नाही. ते म्हणाले, “ ‘हर घर तिरंगा’ मोहीम अशा लोकांनी चालविली आहे, ज्यांनी ५२ वर्षे तिरंगा फडकावला नाही. एका संघटनेतून ही मंडळी आलेली आहेत आणि ती आता तिरंग्याचा इतिहास सांगतात आणि ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम चालवितात.” राहुल गांधी यांचा संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे. ५२ वर्षे त्यांनी कुठून काढली, हे त्यांचे त्यांना माहीत. जयराम रमेश यांनी प्रथम ५२ वर्षांचा उल्लेख केला. मी जयराम रमेश यांचे उष्टे बोलत नाही, हे सांगण्यासाठी राहुल गांधी यांनी ५४ वर्षे, ५६ वर्षे असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते. असो.
 
 
राहुल गांधी पुढे म्हणाले की, “स्वातंत्र्याच्या आंदोलनात काँग्रेस पक्षाला ते तेव्हा थांबवू शकले नाहीत आणि आजही ते थांबवू शकणार नाही.” या वाक्याचा नेमका अर्थ काय होतो, हे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले नाही, अशी असंबद्ध बडबड करण्याचा रेकॉर्ड त्यांनी कायम ठेवलेला आहे. स्वातंत्र्याचे आंदोलन करणारी काँग्रेस ही नेहरू-सोनिया काँग्रेस नव्हे, ती राष्ट्रीय काँग्रेस आहे आणि स्वातंत्र्याचे आंदोलन राष्ट्रीय आंदोलन होते. या आंदोलनात जे हुतात्मा झाले, जे तुरूंगात गेले, ते सर्व, राष्ट्राचे आहेत, कुठल्याही एका पक्षाचे नव्हेत.
 
 
घरोघरी तिरंगा फडकावून भारतातीलसर्व नागरिक त्यांचा सन्मान करणार आहेत.आजच्या राजकीय काँग्रेेसची अवस्था दयनीय आहे. लोकसभेत फक्त ५४ खासदार आहेत.ते प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालत असतात. नागरिकांच्या हिताचा कोणताही प्रश्न ते हाती घेत नाहीत की, त्याबाबत आंदोलनही करीत नाहीत. राहुल गांधी हे पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघतात. त्यांच्या स्वपक्षातील नेतेही त्यांना विचारत नाहीत. विरोधी पक्षातील नेते त्यांना फारशी किंमत देत नाहीत आणि सामान्य लोक त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवितात.
 
 
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने राहुलगांधी यांना सर्व देशवासीयांशी संवाद साधण्याची संधी होती. पं. जवाहरलाल नेहरू यांनी दि. २२ जुलै, १९४७ रोजी संविधान सभेत राष्ट्रध्वजाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावरत्यांचे भाषण झाले. हे भाषण काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे नसून एका राष्ट्रनेत्याचे आहे. राहुल गांधी यांनी हे भाषण कधी वाचले की नाही माहीत नाही. हे भाषण तसे मोठे आहे, त्यातील पं. नेहरूंची काही वाक्ये अशी आहेत.
 
 
* स्वतंत्र राष्ट्राचा हा ध्वज आहे. जोपर्यंत जगात एक व्यक्तीदेखील पारतंत्र्यात आहे, तोपर्यंत आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे असे होत नाही.
 
* जोपर्यंत जगात उपासमारी आहे, वस्त्रांचा अभाव आहे, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे, प्रत्येकाला विकासाची संधी नाही, तोपर्यंत आमचे स्वातंत्र्य पूर्ण होत नाही.
 
आपल्या स्वातंत्र्याची वैश्विक भूमिका पं. नेहरूंनी मांडली आहे. केवढा उदात्त विचार आहे हा! पणतू मात्र बाष्कळ बडबड करीत फिरत असतो.
 
* हा ध्वज सुंदर आहे. कारण, राष्ट्राचे प्रतीक सुंदरच असले पाहिजे.
 
* राष्ट्र केवळ भौतिक साधनांवर जीवंत राहत नाही. हा ध्वज अनेक सुंदर संकल्पनेचे प्रतीक आहे, ज्यात अध्यात्म, मनोविज्ञान, इत्यादी गोष्टी येतात.
 
* आम्ही केवळ भौतिक साधनांनी जीवंत राहिलो आहोत असे नाही, तर हजारो वर्षे आम्ही अध्यात्मिक आधाराने जीवंत राहिलो आहोत.
 
* भारताचे आदर्श अतिशय उच्च आहेत आणि त्यांना घेऊनच आपण राहिले पाहिजे.
 
* आपल्या ध्वजावर अशोकचक्र आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीचे ते प्रतीक आहे.
 
या प्रकारे पं. नेहरुंची अनेक वाक्ये देता येण्यासारखी आहेत. थोडक्यात सांगायचे तर पं. नेहरू यांनी भारताचे आत्मतत्त्व या भाषणातून मांडलेले आहे. ते अतिशय महत्त्वाचे आहे. राहुल-सोनिया गांधी यांच्या डोक्यावरून ते जाणारे दिसते. ते जर त्यांच्या डोक्यात गेले असते, तर ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला त्यांनी आणखी मोठी उंची दिली असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचेदेखील संविधान सभेत राष्ट्रध्वजावर भाषण झालेले आहे.
 
 
ते म्हणतात, “भगवा रंग हा अनासक्तीचे प्रतीक आहे. आमच्या नेत्यांनी भौतिक लाभाच्या संदर्भात उदासीन असले पाहिजे. आपल्या कामाला ते समर्पित असले पाहिजेत. असा भगव्या रंगाचा अर्थ होतो. मध्यभागी असलेला शुभ्र रंग हा सत्याचा मार्ग दाखविणारा आणि आमच्या व्यवहाराला मार्गदर्शन करणारा आहे. हिरवा रंग हा भूमीशी नाते दाखविणारा आणि वनस्पती जीवनाशी आपले संबंध दाखविणारा आहे. शुभ्रभागी असलेले अशोकचक्र हे धर्मचक्र आहे. या ध्वजाखाली जे काम करणार आहेत,ते सत्याच्या मार्गाने, धर्माच्या मार्गाने चालणारे असले पाहिजेत, असा याचा अर्थ आहे. धर्मचक्र गती दाखवितो. अवधता हा मृत्यू आहे. भारताने बदलांना स्वीकारले पाहिजे.”
 
 
(राधाकृष्णन यांच्या भाषचा भावानुवाद)‘हर घर तिरंगा’ याचा अर्थ पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. राधाकृष्णन यांच्या वर दिलेल्या भाषणातून स्पष्ट होतो. या दोन राष्ट्रनेत्यांनी जे मांडले आहे ते आजच्या राहुल गांधी पक्षाची विचारधारा नाही. ही सनातन राष्ट्राची विचारधारा आहे. राष्ट्रीय विचारधाराआहे. त्यामुळे सर्व राष्ट्राचा तिच्यावर हक्क आहे. काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व करणार्‍या राहुलगांधी यांनी संघाचा इतिहास काय आहे, हे सांगण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास कोणता होता, याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या राष्ट्रीय नेत्यांची भाषणे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. संघावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. याचेही ज्यांना आकलन होत नाही, त्यांच्या बुद्धीमत्तेविषयी अधिक काही न लिहिलेले बरे!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.