भातशेती संकटात! लागवड केलेल्या भातशेतांना पडल्या भेगा!
04-Aug-2022
Total Views | 128
7
वाडा :पावसाने मागील आठवडय़ापासून दडी मारली असून भातशेती संकटात आली आहे. लागवड केलेल्या दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने भातशेतांना पुर्णत: भेगा पडल्या असून भातपिके कोमेजून गेली आहेत.
अनेक संकटांचा सामना करत येथील शेतकरी हा आपली भातशेती करत असतो, परंतु शेती ही पुर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने त्याच्या नशिबी नेहमी निराशाच येत असते.
गेले आठ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे भातशेती संकटात आल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसांपासून स्वच्छ सुर्यप्रकाश असुन तालुक्यात पाऊस पडत नसल्याचे दृश्य आहे. एक तर यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाले होते. त्यामुळे शेतक-यांच्या भाताची रोपे वाढलीच नाहीत.
पावसाचे एकदा आगमन झाल्यानंतर थांबण्याचे नावच न घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना बांध फुटीच्या समस्यांना सामोरे जावे लागले. तसेच भात क्षेत्रही वाहुन गेले आहे. या अतिवृष्टीत ज्या भातपिकांनी तग धरली होती, ती भातपिके आता पावसाअभावी संकटात सापडली असून कोमेजून गेली आहेत.
पावसाचे आगमन लवकर झाले नाही, तर भातपिकावर याचा वाईट परीणाम होणार आहे .पाऊस नसल्याकारणाने लावलेले भात क्षेत्र आता तडकू लागले आहे. भातशेतांना मोठ- मोठ्या भेगा पडल्या आहेत. भात शेतांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने लावलेली भातशेती कोमेजली असून शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून पावसाच्या पुनरागमनाची वाट पाहत बसला आहे.