चंदीगड: हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील एका कारखान्यात बुधवारी दि. ३ ऑगस्ट रोजी टाकी साफ करताना विषारी वायू घेतल्याने उत्तर प्रदेशातील चार कामगारांचा मृत्यू झाला. तर दोन बेशुद्ध पडले, असे पोलिसांनी सांगितले. बेशुद्ध पडलेल्या दोन कामगारांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते झज्जरच्या बहादूरगडच्या रोहाड येथील औद्योगिक परिसरात असलेल्या युनिटमध्ये कचरा टाकी साफ करत होते. हा कारखाना वाहनांसाठी गॅस किट बनवतो, असे पोलिसांनी सांगितले.
"या घटनेत उत्तर प्रदेशातील चार कामगारांचा मृत्यू झाला. इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, असे झज्जरचे पोलिस अधीक्षक वसीम अक्रम यांनी सांगितले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर झज्जर जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. अग्निशमन सेवा आणि औद्योगिक सुरक्षा विभागांसह अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीकडून ही चौकशी केली जाईल. एक कामगार कचरा टाकी साफ करण्यासाठी आत गेला होता आणि तो बाहेर न आल्याने इतर कर्मचारी आत गेले, पण सर्वांना विषारी वायूची बाधा झाली.
नंतर सहाही जणांना बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात नेले असता चौघांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची पोस्टमॉर्टम तपासणी केली जात आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितांच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली असून घटनेच्या संबंधात कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला जाईल. पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. "बहादूरगढच्या रोहाड औद्योगिक परिसरात असलेल्या कारखान्यात गॅस गळतीच्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझी तीव्र संवेदना," खट्टर यांनी ट्विट द्वारे शोक व्यक्त केला आहे.