नागाला कितीही दूध पाजलं तरी तो चावतोच : उद्धव ठाकरे

    03-Aug-2022
Total Views |


Uddhav Thackeray
 
 
मुंबई : "नागाला कितीही निष्ठेचं दूध पाजलं तरी तो चावतोच", असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदेगटातील आमदारांवर टीका केली आहे. बुधवारी (दि. ३ ऑगस्ट) जळगावमधील शिवसैनिक मातोश्रीवर आले असता त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. दरम्यान शिवसेना जळगावचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे 'एक गुलाब गेलं पण दुसरे गुलाबराव आपल्यासोबत आहेत.', असेही ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले.
 
"कालच नागपंचमी झाली. असं बोलतात की नागाला कितीही दूध पाजलं तरी चावायचा तो चावतोच. या सर्वांना निष्ठेच दूध पाजलं पण अवलाद गद्दार निघाली. आतापर्यंत आपण गुलाब पाहिलात आता सैनिकांचे काटे बघा. लवकरच मी राज्यभर माझे दौरे सुरु करणार आहे. तेव्हा मी सविस्तर बोलेन. आजवर शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु झालेत. मात्र अशी अनेक आव्हाने पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवत आलो आहोत. राजकारणात हार जीत होत असते, पण पक्ष संपवण्याची भाषा केली जात नाही.", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 
आदित्य ठाकरेंनी निष्ठायात्रा घेत ठिकठिकाणी फिरायला सुरुवात केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरेही राज्यभर दौरे सुरु करणार असल्याचं ते म्हणत आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यांतून मतदार संघातले प्रश्न सुटणार की तिथेही टोमणेबाजी सुरु राहणार? असा प्रश्न सध्या उद्भवतो आहे.