साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे: आंतरराष्ट्रीय परिषदेतील आठवणी...
03-Aug-2022
Total Views | 437
2
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेले ’माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णन वाचून रशिया या प्रगतशील देशाबद्दलची प्रचंड आपुलकीची, ओढ अनेक वर्षांपासून लागून होती. कधीतरी आपणही रशियात जाऊन रशियाच्या त्या प्रगतशील आणि विकसनशील देशाचे वैभव आपल्या डोळ्यांनी पाहू, ही मनातील ओढ ‘एमजीडी परिवारा’चे सुनील वारे साहेबांच्या अथक परिश्रमांतून साकार झाली. आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मास्को, रशियाला गेलो. त्या समाजशील आठवणी...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी ’माझा रशियाचा प्रवास’ हे एकच प्रवासवर्णन लिहिले असून ‘इंडो- सोव्हिएत कल्चर सोसायटी’ व महाराष्ट्रातील अण्णा भाऊंवर प्रेम करणार्या तमाम जनतेच्या सहकार्यातून अण्णा भाऊंनी हा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी जे जे पाहिले, अनुभवले ते इतरांना कळावे, रशियन समाजाचे वास्तवरूप भारतीयांना ज्ञात व्हावे, म्हणूनच अण्णा भाऊंनी पुढे या प्रवासाला लेखनाचा साज चढविला. हे प्रवासवर्णन साकार झाले. अतिशय अभ्यासू पद्धतीने हे प्रवासवर्णन अण्णा भाऊंनी साकारले आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेची पायाभरणीच मुळी दि. ४ ऑक्टोबर, २०१७ रोजी मुंबई येथील रशियन दूतावासात संपन्न झालेल्या राष्ट्रीय परिषदेतून झाली. त्या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांतून अनेक विचारवंत, मान्यवर साहित्यिक, अभ्यासक उपस्थित होते. त्या परिषदेत मुंबई येथील रशियन दूतावासात अण्णा भाऊंची प्रतिमा लावण्यात आली आणि ती प्रतिमा तयार करून मुंबईपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी डॉ. देशपांडे, सन्माननीय सुनील वारे आणि डॉ. बळीराम गायकवाड यांनी माझ्यावर सोपवली होती. ती मी व्यवस्थितपणे पार पाडली होती. याचा मला आनंद आहे.
दि. १६ व १७ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबई विद्यापीठ आणि मास्को येथील पुश्किन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय परिषद मास्को शहरात अत्यंत उत्सवात संपन्न झाली. या परिषदेला भारतासह अनेक देशांतून ३२८ मान्यवर साहित्यिक, विचारवंत आणि अभ्यासकांची उपस्थिती होती. ज्या हॉटेलमध्ये ६३ दिवस अण्णा भाऊ साठे यांनी मुक्काम करून रशिया देशाचे निरीक्षण केले त्या ‘सोव्हिएत स्काय’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा लावण्याचे भाग्य या परिषदेच्या माध्यमातून आम्हाला मिळाले होते. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
ज्या ‘सोव्हिएत स्काय’ हॉटेलमधील ज्या ठिकाणी ‘फेमस हॉल ऑफ फेम’ या ठिकाणी जगातील काही मान्यवरांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत, त्या प्रतिमांच्या रांगेत अण्णा भाऊंची प्रतिमा हॉटेलच्या व्यवस्थापन मंडळाने अण्णा भाऊंची प्रतिमा लावण्याची परवानगी दिली, ही बाब आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची आहे.
‘सोव्हिएत स्काय हॉटेल’मधील प्रतिमा पाहण्यासाठी या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपस्थित असलेले अनेक मान्यवर, विचारवंत आणि अभ्यासक मंडळी रांगा लावून अण्णा भाऊंच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. एवढा मोठा जनसमुदाय या पंचतारांकित हॉटेलमध्ये पहिल्यांदाच आला असल्याचे तेथील काही मान्यवरांनी सांगितले. ही प्रतिमा औरंगाबाद येथील कलावंताकडून (चित्रकार) तयार करून घेऊन औरंगाबाद ते मुंबई मार्गे रशियापर्यंत पोहोचण्याची जबाबदारीही माझ्यावरच सोपवली होती. रेल्वेचा प्रवास करत असताना ती प्रतिमा मी अगदी जीवापाड लेकरासारखं सांभाळत मुंबईपर्यंत घेऊन गेलो. त्यानंतर ती प्रतिमा आम्हाला विमानाने घेऊन जाता आले.
ज्या दिवशी ‘सोव्हियत स्काय’ हॉटेल मधील ‘फेमस हॉल ऑफ फेम’ या ठिकाणी अण्णा भाऊंची प्रतिमा लागली, त्यादिवशी आपण धन्य झालो, असे वाटले. रशिया येथील संपन्न झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी माझ्या एकट्या नांदेड शहरांमधून माझ्यासोबत ४० मान्यवरांची उपस्थिती होती.
मास्को शहरातील ‘आंतरराष्ट्रीय भाषा संशोधन केंद्र’ आणि ‘ग्रंथालय मार्गारिटा रोडो मिनो’ या ग्रंथालयाच्या प्रांगणात जगातील काही प्रसिद्ध लेखकांच्या अर्धाकृती पुतळ्यांच्या रांगेत अण्णा भाऊंचा पुतळा बसविण्याची सहमती ही याच आंतरराष्ट्रीय परिषदेत मान्य करण्यात आली, हे या परिषदेचे फलितच म्हणावे लागेल. या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतासह इतर देशातील 68 विचारवंत, अभ्यासकांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले. मास्को ‘स्टेट युनिव्हर्सिटी’ येथे जाऊन अण्णा भाऊंच्या कादंबरी आणि कथासंग्रहाचा शोध घेतला असता, त्या ठिकाणी अनेक रशियन भाषांतरित कादंबरी आणि कथासंग्रह मिळाले. ते पाहून आम्हा सर्वांना प्रचंड उत्सुकता आणि आनंद झाला. तेथील प्रशासनाची परवानगी घेऊन आम्ही त्या पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती मिळविल्या. हा मोठा आनंद मनात घेऊन आम्ही त्या परिषदेत वावरत होतो.
ज्याठिकाणी रशियन क्रांती झाली, त्या लाल चौकातील ठिकाणाला ही आंतरराष्ट्रीय परिषदेतील मान्यवरांनी भेट देऊन या भूमीचे दर्शन घेतले. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी स्वयंप्रेरणेने उपस्थित राहून या प्रवासाचा आणि परिषदेचा आनंद घेतला मास्को येथील पंचतारांकित असलेल्या ‘कॉसमॉस हॉटेल’मध्ये आमची राहण्याची व्यवस्था ‘नेम हॉलिडेज्’ कंपनीने केली होती. नाष्टा, भोजनाची उत्तम व्यवस्था या परिषदेची अत्यंत महत्त्वाची बाब होती.
आम्ही परिषदेला जाण्याअगोदर अनेकांनी रशियामध्ये खाण्याची व्यवस्था होणार नाही, असे सांगितले होते. परंतु, चार-पाच दिवस भारतीय पद्धतीचे उत्तम जेवण देण्याची व्यवस्थाही ‘नेम हॉलिडेज्’ कंपनीने केली होती. यासह वाहतूक व्यवस्था, दुभाषिक यांच्यामुळे रशियातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देताना काहीच अडचणी आल्या नाहीत. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या काही मान्यवरांनी रशियातील पीटर्सबर्ग या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरालाही भेटी देऊन आनंद घेतला.
रशियातील मास्को शहरातील रस्ते,जनजीवन, आखीवरेखीव प्रत्येक इमारत, रस्त्याच्या कडेला असणारे सुंदर झाडाची ठेवण आणि आपल्या देशासाठी देशावर प्रेम करणारी प्रचंड निष्ठावंत माणसं या निमित्ताने आम्हाला पाहता आली. मी अण्णा भाऊंचा ‘माझा रशियाचा प्रवास’ वाचल्यानंतर रस्त्यावर काडीसुद्धा दिसणार नाही. कचर्याचा एक तुकडाही दिसणार नाही, हे वाचल्यानंतर हे असे कसे होईल, असे माझ्या मनात होते. परंतु, मी जेव्हा मास्को शहरातील रस्त्यावरून पायी फिरत असताना प्रत्यक्ष मला अण्णा भाऊंच्या त्या प्रवास वर्णनातील शब्दन्शब्द आठवत होता. एवढ्या मोठ्या शहरांमध्ये सगळीकडे चकाचक सुंदर स्वच्छ रस्ते, रस्त्याच्या मध्यभागी आणि कडेला सुंदर झाडांची रांगोळीसारखी ठेवण, मोठमोठ्या इमारती पाहून भरून गेल्यासारखं वाटू लागलं.
रस्त्यावर एक गाडीसुद्धा दिसली नाही. परंतु रेल्वे स्थानकावर मात्र काही तरी पाहायला मिळेल म्हणून मी रेल्वे स्थानकावर गेलो तेव्हा आपले घरही तेवढे स्वच्छ असणार नाही एवढी स्वच्छता! मी तेथील नियोजन पाहून चक्रावूनच गेलो होतो. इतकं कसं स्वच्छ शहर असू शकते, यावर माझाच विश्वास बसत नव्हता. अण्णा भाऊंनी लिहिलेला ‘माझा रशियातील प्रवास’मधील ओळन्ओळ डोळ्यांसमोरून जात होती. ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी व्हावी, याच्यासाठी सतत रशियन दूतावासाच्या संपर्कात राहून पुश्किन विद्यापीठाच्या नियोजनासोबत मुंबई विद्यापीठ जोडण्यासाठीचे मोठे काम डॉ. संजय देशपांडे यांनी केले.
त्यासोबतच डॉ. शिवाजी सरगर, डॉ. सोनू सैनी, ‘एमजीडी’ परिवाराचे आमचे सुनील वारे, प्राचार्य डॉ. बी. एन. गायकवाड आणि आनंद कांबळे यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या परिषदेतील डॉ. बळीराम गायकवाड आणि सुनील वारे यांचे अभ्यास पूर्ण असलेल्या शोधनिबंधाचे वाचन पाहून आणि ऐकून सर्वांनीच त्यांचे कौतुक केले होते.