दरवर्षी कोकण किनारपट्टीवर भरकटलेली जहाजे येऊ लागली आहेत. हा सुरक्षा व्यवस्थेला धोका आहे. कारण, या जहाजांमध्ये धोकादायक साहित्य असू शकते. काही दहशतवादी संघटना, तस्कर, त्याचा वापर तस्करीसाठी, देशविघातक कारवायांसाठी करू शकतात. जहाज मुद्दाम भरकटवून किनार्यापाशी आणून काही धोकादायक साहित्य किनार्यावर आणले जाऊ शकते. तसेच या जहाजांमध्ये जे इंधन असते, ते जर समुद्रात पसरले, तर पर्यावरणाला धोकादायक ठरू शकते.
हरिहरेश्वरच्या किनार्यावर आढळलेली संशयास्पद बोट
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट नुकतीच आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे महाराष्ट्र पोलीसही सतर्क झाले. खबरदारीची उपाययोजना म्हणून रायगड जिल्ह्यात ‘अलर्ट’ घोषित करण्यात आला. या बोटीत एक काळ्या रंगाचा बॉक्सही आढळून आला. त्यात ‘तीन एके-47’ रायफल आणि काही काडतूसंही मिळाली. दि. 18 ऑगस्टला सकाळी स्थानिक नागरिकांना ही संशयास्पद बोट आढळून आली. समुद्रात मोठ्या लाटा उसळत असल्यामुळे दोरीच्या साहाय्याने ही बोट खेचून बाहेर काढली गेली. महाराष्ट्र ‘एटीएस’, रायगड पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी याची चौकशी सुरू केली. या बोटीवर ‘नेप्चुन मॅरिटाईम सिक्युरिटी’ असं लिहिण्यात आलं होतं. बोट किनार्याजवळ आढळून आली तेव्हा या बोटीवर कोणीही नव्हतं.
आमदार आदिती तटकरे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली की, या संपूर्ण प्रकरणात एक सविस्तर टीम नेमली पाहिजे. केंद्रीय यंत्रणांची गरज लागली, तर त्यांची मदत घेतली पाहिजे. केंद्रीय यंत्रणा आमच्या संपर्कात आहे, असं निवेदन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केले.
या बोटीचं नाव ‘लेडीहान’ असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लाँडरन यांची आहे. या महिलेचा नवरा जेम्स हॉबर्ट या बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपला जाणार होती. दि. 26 जूनला बोटीचं इंजिन निकामी झालं आणि खलाशांनी मदतीचा फोन दिला. त्याच दिवशी 1 वाजता कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केलं. समुद्र खवळलेला असल्याने ‘लेडीहान बोटिंग’चं ‘टोईंग’ करता आलं नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे ही बोट भरकटत रायगडच्या किनारी आली.
अनेक प्रश्नांची उत्तरे जरुरी
देशाची सागरी सुरक्षा ही तीन स्तरीय आहे. पहिल्या स्तरांमध्ये किनारपट्टीपासून 12 नॉटिकल माईलपर्यंत पोलीस सागरी सुरक्षेकरिता जबाबदार आहेत. 12 नॉटिकल माईलपासून 200 नॉटिकल माईलपर्यंत भारतीय तटरक्षक दल जबाबदार आहे. 200 नॉटिकल माईलच्या पुढच्या समुद्रामध्ये भारतीय नौदल जबाबदार आहे. वरील बोट जवळजवळ एक महिन्यांहून जास्त आपल्या सागरी हद्दीमध्ये तरंगत होती, तरी पण गस्त घालणार्या तिनी दलांच्या नौकांना ती कशी दिसली नाही? याशिवाय हवेतून हेलिकॉप्टर आणि विमानेसुद्धा गस्त घालत असतात. त्यांनासुद्धा ही बोट दिसली नाही. ‘26/11’ नंतर पश्चिम किनारपट्टीवर रडारचे जाळे बसवण्यात आले होते.
ही आंतरराष्ट्रीय बोट असल्यामुळे हिच्या वरती ‘ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’ ही होती, तरी पण आपल्या रडारना ही बोट का दिसली नाही, असे अनेक प्रश्न समोर येतात. याविषयी नक्कीच चौकशी झाली पाहिजे.
महाराष्ट्र राज्यास 720 किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे आणि एक हजार किमी खाड्या आहेत, ज्या निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या आहेत. किनारपट्टीवर 728 लँडिंग पॉईंट (बोटीतून उतरण्याची जागा/धक्का)असलेला महाराष्ट्र, याबाबतीत अव्वल आहे. खाड्या निगराणीखाली ठेवणे हे एक आव्हानच आहे.
आता सर्व लँडिंग पॉईंटवर पर्यवेक्षक तैनात केले आहेत. सर्वाधिक नोंदित आणि अनोंदित स्थाने क्लोज सर्किट टेलीव्हिजन निगराणीखाली ठेवण्यात आलेली आहेत, जेणेकरून चढ-उतारावर लक्ष ठेवले जाऊ शकेल.
सागरी किनारा सुरक्षा उपेक्षित
गेल्या काही महिन्यांमध्ये पश्चिम किनारपट्टीवर अनेक वेळा हजारो कोटी रुपयांची अफू, गांजा, चरस पकडण्यात आली आहे. याशिवाय या किनारपट्टीवर तस्करी म्हणजे सोने, खोट्या नोटा आणल्या जातात अशीही माहिती आहे. तसेच नुकताच पाकिस्तानमधून एक टेलिफोन कॉल आला होता की, समुद्राकडून महाराष्ट्रामध्ये दहशतवादी हल्ला होणार आहे.
पश्चिम किनारपट्टीवर भारतातून आखाती देशांबरोबर बेकायदेशीर व्यापार सुरु असल्याच्या बातम्या मधूनमधून येत असतात. गुजरात किनारपट्टीवर अनेक पाकिस्तानी बोटी रण ऑफ कच्छमध्ये पकडल्या गेल्या आहेत, पण त्यामध्ये माणसे नव्हती. म्हणजेच किनारपट्टीवरती वेगवेगळ्या प्रकारचे सुरक्षा भंग वेळोवेळी होत असतात. दहशतवादी हल्लाच म्हणजे सुरक्षा भंग असे नव्हे, कारण ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळेपाकिस्तानची आता दहशतवादी हल्ला भारतामध्ये करायची हिंमत नाही.
दरवर्षी कोकण किनारपट्टीवर भरकटलेली जहाजे येऊ लागली आहेत. हा सुरक्षा व्यवस्थेला धोका आहे. कारण, या जहाजांमध्ये धोकादायक साहित्य असू शकते. काही दहशतवादी संघटना, तस्कर, त्याचा वापर तस्करीसाठी, देशविघातक कारवायांसाठी करू शकतात. जहाज मुद्दाम भरकटवून किनार्यापाशी आणून काही धोकादायक साहित्य किनार्यावर आणले जाऊ शकते. तसेच या जहाजांमध्ये जे इंधन असते, ते जर समुद्रात पसरले, तर पर्यावरणाला धोकादायक ठरू शकते.
या आधी रत्नागिरी किनार्यावर समुद्रात भरकटलेली दोन जहाजे आली होती. त्यातील इंधन बाहेर काढले नाही, तर ते सागरात पसरून प्रदूषण होऊ शकते. म्हणून इंधन काढून घेण्याची मोहीम हाती घेतली. पण, खराब हवामानामुळे जहाजावर जाणे शक्य झाले नाही.मात्र त्या जहाजातील 11 हजार लीटर्स इंधन चोरीला गेले.
भारताचा पश्चिम किनारा स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच तस्करीप्रवण राहिला आहे. सोने, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्यावरून ‘इलेक्ट्रॉनिक’ वस्तू आणि अमली पदार्थ देशात आणि देशातून बाहेर नियमितपणे तस्करीने येत राहिले. 1993 मधील मुंबईतील बॉम्बस्फोटांची स्फोटके याच किनार्यावरून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, तस्करी रोखण्यासाठी त्याविरुद्धचे उपाय योजले गेले. एप्रिल 1993 मध्ये ’कार्यवाही-स्वान’ सुरू करण्यात आली. तिचे उद्दिष्ट, बंदी घातलेल्या आणि अवैध मालाचे, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर गुप्तपणे होणारे अवतरण रोखण्याचे होते. ’कार्यवाही स्वान’ अंतर्गत एकही नौका पकडली गेली नाही. ‘26/11’च्या मुंबईवरील हल्ल्यातील दहशतवादी पाकमधून भारतात आले ते मासेमारी नौकेतून, ‘गेटवे ऑफ इंडिया’जवळ ते उतरले होते.
2005 साली सुरू झालेल्या सागरी सुरक्षा योजनेअंतर्गत समुद्री पोलीस दल निर्माण करण्यात आले. योजनेचे उद्दिष्ट सागरी भागातील गस्ती आणि निगराणीकरताच्या पायाभूत सुविधा सशक्त करण्याचे होते. विशेषतः किनारपट्टीनजीकच्या उथळ पाण्याच्या भागांत.
सुरक्षा यंत्रणांमधील उणिवा
तस्कर/दहशतवादी यंत्रणा भारतीय सुरक्षा व्यवस्थांमधील उणिवांचा गैरफायदा घेऊन किनारी भागांमध्ये कारवाई करतात. त्यांना सहज सापडतील अशा अनेक उणिवा आपल्या यंत्रणेमध्ये आहेत. म्हणून देशात वारंवार तस्करी होऊ शकते. कोकण किनार्यावर आता तटरक्षक दलाचे मुंबई बंदर, मुरुड जंजिरा आणि रत्नागिरी बंदर असे तीन तळ आहेत. सर्वत्र बंदर खात्याची यंत्रणा आहे. शिवाय सागरी गस्त घालणारी पथकेही तैनात आहेत.
पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत किनारी भागातील नागरिकांचे सहकार्य असावे, म्हणून सागरी सुरक्षा पथके स्थापन केली आहेत. अशी सगळी व्यवस्था असूनदेखील किनारी भागात भरकटलेली जहाजे येतात. बंदर खाते, नौदल, तटरक्षक दल, पोलीस यंत्रणा पुरेशी सर्तक नाही, असे चित्र त्यामुळे दिसून येते.
अनेक वर्षांनंतर आता सागरी गस्तीसाठी फौजफाटा, अद्ययावत उपकरणे, पोलीस ठाणी जमा होऊ लागली असली, तरी सुरक्षेकडेअजूनही मजबूत नाही.
मच्छीमार बांधवांमधून फौजफाटा भरती करा
मुंबईसारख्या ठिकाणी या तीन यंत्रणांव्यतिरिक्त डीजी-शिपिंग, कस्टम्स, मुंबई पोर्ट ट्र्स्ट अशा अनेक यंत्रणांचा संबंध येतो. मुंबई पोर्ट ट्रस्टनेही मुंबई बंदराभोवतीच्या वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी काही चॅनेल तयार केले. पण, या चॅनेल्सचे छोट्या नौकांकडून वारंवार उल्लंघन होत असते. गेल्या काही वर्षात प्रवासी वाहतूक प्रचंड वाढली आहे. पण, त्यावर पोर्ट ट्रस्टचे नियंत्रण नाही. छोट्या यॉट्स, हार्बर क्रूझ बोटी यांच्यावर सध्या पुरेसा अंकुश नाही.
म्हणून ड्युटीसाठी मच्छीमार बांधवांमधून फौजफाटा भरती करावा. परिणामकारक निगराणीकरिता, सागरी पोलीस नागरिक-स्नेही (चांगले वर्तवणूक करणारे) असले पाहिजेत.
भारतीय नौदल, भारतीय तटरक्षकदल, सैनिकी अभियंत्रज्ञ, ‘ईएमई’ यातील कर्मचार्यांना ‘डेप्युटेशन’वर किंवा यातील निवृत्त कर्मचार्यांना भरतीद्वारे सागरी पोलीसदलात घेण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.
घातक विचार पसरविणारे, संशयास्पद हालचाली करणारे, चुकीच्या व्यवसायात गुंतलेले यांची माहिती सुरक्षा यंत्रणेला देणे हे सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य समजले पाहिजे.