आयुष्याला कलाटणी देणारे प्रसंग आपल्या जीवनात कधी येतील, हे सांगता येत नाही. परंतु, हे प्रसंग आपल्याबरोबर इतरांचेही जीवन बदलण्यास मदत करणार्या सोपान काळे यांच्याविषयी...
सामान्यांतील असामान्य लोक आपल्याला कधी, कुठे, कसे सापडतील, हे आपण स्वतःदेखील सांगू शकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा अशी माणसं आपल्या सभोवतालीच असतात, ज्यांच्याशी आपण कामाव्यतिरिक्त संवाद साधायचा सहसा संबंधही येत नाही. परंतु, जर कधी मनापासून त्यांच्याशी संवाद साधला, तर एक संपूर्ण जीवनपट, दृष्टीचे नवे दालनच आपल्यासमोर खुले होते. असेच एक सामान्यांतील असामान्य व्यक्तिमत्त्व मला सापडले ते ठाणे शहरातील एका साध्या फुलविक्रेत्यामध्ये. ही व्यक्ती म्हणजे सोपान सदू काळे.
ठाण्यात गेली 35 वर्ष सोपान फुले विक्रीचा व्यवसाय करत आहेत. खरे तर समारंभासाठी, देवाच्या आराधनेसाठी, शुभकार्यासाठी- तसेच प्रत्येक कार्यासाठी फुलांची विक्री करणे, हे एक पवित्र काम. परंतु, याहूनही महत्त्वाचे आणि पवित्र कार्य सोपान यांच्या हातून त्यांच्याही अगदी नकळत घडू लागले.
फुलविक्रीचे सत्कार्य करत असताना सोपान यांच्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी अचानक ’दारू’ नावाचे वादळ आले आणि त्याने त्यांचे संपूर्ण आयुष्यच ढवळून टाकले. आत्तापर्यंत जे काही मिळवण्याचे प्रयत्न केले होते, त्याला साहजिकच उतरती कळा लागली होती. परंतु, जर भक्त आपली वाट भरकटला असेल,तर देवच त्याला आपले बोट पकडून सद्मार्गावर आणतो. आपली वाट भरकटलेल्या सोपान यांनी या व्यसनातून लवकरात लवकर स्वतःला बाहेर काढले आणि यातून त्यांनी ‘स्व’चा शोध घेतला. जर आपल्या या व्यसनामुळे माझ्या कुटुंबाला यातना झाल्या असतील, तर आज आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी कुटुंब आहेत, ज्यांना याचा सामना करावा लागत आहे आणि अशा विचारातून त्यांच्या मनाने वेध घेतला तो, व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याचा!
व्यसनाधीन व्यक्तींचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त असल्यामुळे सोपान यांनी, सर्वप्रथम आपल्या गावातील कुटुंबाना व्यसनमुक्त करण्याचे, पहिले पाऊल उचलले. शहरात तर हे प्रमाण आहेच परंतु, ग्रामीण भागात जनजागृती करणे जास्त आवश्यक आहे. म्हणून त्यांनी पुणे जिल्ह्यातील आपले गाव बोरी खुर्द, साळवाडीमध्ये ‘व्यसनमुक्ती’ केंद्र सुरू करण्याचा निर्धार केला. स्वतः फुलविक्रेते असल्यामुळे थेट केंद्र सुरू करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते. त्यामुळे आपल्या गावातील-अशा प्रत्येक घरात जाऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली.
शिवाय-ग्रामीण भागात गरिबीचे प्रमाण तुलनेने अधिक असल्यामुळे चोरी करणं, दारूकरिता घरातील स्त्रियांचे दागिने गहाण ठेवणे, अथवा फसवून पैसे घेणे हे प्रमाण काहीसे अधिक होते. त्यामुळे, त्या घरातील भगिनींस जागृत करणे सर्वप्रथम आवश्यक होते आणि अशाप्रकारे जागृती करत सोपान यांनी, कधी घरोघरी जाऊन, कधी सामाजिक कार्यक्रमांमधून जनजागृती करत, आपल्या गावातील जवळजवळ चार हजारांहून अधिक व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्त केले.
एवढ्यावरच सोपान थांबले नाहीत; तर हे कार्य करत असताना त्यांना गावातील आजूबाजूच्या आणखी काही समस्या जाणवल्या आणि त्यांचे निरसन होणे आवश्यक होते. आपल्या गावातच अनेक गरीब आणि अनाथ बालके आहेत, ज्यांना राहायला आसरा नाही, शिक्षणाची सोय असली तरी वह्या-पुस्तके नाहीत. अशा मुलांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी अनाथाश्रमाची पायाभरणी केली. या मुलांना हक्काचा आसरा, शिक्षणासाठी वह्या-पुस्तके तर दिलीच. परंतु, बालवयात त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेत, समाजातील वाईट प्रवृत्तींपासून लांब राहावेत, यासाठी सोपान यांनी मुलांसाठी संस्कार वर्गदेखील सुरू केले. एवढेच नाही, तर मुलांच्या जोडीने गावात असे काही वयोवृद्ध होते, ज्यांची मुले त्यांना गावी ठेवून परदेशी गेली आहेत वा कामानिमित्ताने बाहेरगावी आहेत किंवा अन्य कारणामुळे हे आजी-आजोबा येथे एकटे आहेत, अशा असाहाय्य आजी-आजोबांसाठी सोपान यांनी वृद्धाश्रमाची स्थापना केली.
आपल्या गावाचा विकास करताना त्यांनी आपल्या या व्यवसायाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. किंबहुना, रात्रंदिवस मेहनत करून, अधिकाधिक फुलविक्री करून, तसेच ज्यावेळी ते व्यसनमुक्तीचे कार्य करत होते तेव्हा लोकांनी दिलेल्या स्वेच्छानिधीतून त्यांनी गावातील आपल्या जमिनीवर या सर्वांसाठी 2011 साली एका छोट्या इमारतीची पायाभरणी केली.
स्वतःची आर्थिक परिस्थिती सामान्य असली तरीही, आयुष्याला कलाटणी देणार्या घटनेनंतर त्यांचे झालेले परिवर्तन हे असामान्य होते.
त्यामुळे सोपान काळे हे आपल्या गावकर्यांसाठी ’सोपान महाराज’ झाले. खचून न जाता आपल्या गावाच्या प्रगतिपथाचे आलेख त्यांनी कायमच चढता ठेवला. आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग आपल्या जीवनात कधी येईल, हे आपल्याला सांगता नाही येणार. परंतु, हे प्रसंग आपल्याबरोबर इतरांचेही जीवन बदलण्यास मदत करतात, हे सोपान काळे यांनी सिद्ध केले आहे.