भारताचे आज जगभरातील देशांसोबत उत्तम परराष्ट्र आणि व्यापारी संबंध प्रस्थापित झालेले दिसतात. खासकरून 2014 साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर परराष्ट्र धोरणाची चक्रही वेगाने फिरू लागली. पंतप्रधानांच्या दौर्याइतकेच महत्त्व परराष्ट्र मंत्र्यांच्या दौर्यांना, त्यांनी देशविदेशात मांडलेल्या भूमिकांना प्राप्त झाले. आधी सुषमा स्वराज आणि सध्या एस. जयशंकर यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणनिर्मितीत आणि त्याच्या प्रत्यक्ष कृतिपरिवर्तनात मोलाची भूमिका बजावली. नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिण अमेरिकेतील पेराग्वे या देशात नवीन भारतीय दूतावासाचे उद्घाटन केले. त्यानिमित्ताने भारत आणि दक्षिण अमेरिका संबंधांचा धावता आढावा घेणे क्रमप्राप्त ठरावे.
अमेरिका म्हंटल की, साहजिकच विकसित राष्ट्र असलेल्या सर्वसंपन्न ‘युनायडेट स्टेट्स ऑफ अमेरिके’चे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण, या विकसित उत्तर अमेरिका खंडाच्या दक्षिणेला वसलेल्या दक्षिण अमेरिका अथवा लॅटिन अमेरिकेतील चित्र मात्र पूर्णत: भिन्न. एकूण 33 देश या दक्षिण अमेरिका खंडात असून त्यापैकी ब्राझील, अर्जेंटिना, व्हेनेझ्युएला, पेरु यांसारख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत देशांची नावे आपल्याला सांगता येतील. पण, त्याउपर येथील देश, संस्कृती यांच्याशी आपण युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलिया इतके जोडलेलो नाही.
आफ्रिका खंडातील एकूण 54 देशांशी तुलना करता, दक्षिण अमेरिकेतील हे देश तुलनेने विकसित असले तरी भारताप्रमाणेच या विकसनशील देशांमध्ये साम्यही आढळते. जसे की, गरीब-श्रीमंत दरी, विकास आणि संसाधनांमधील असमतोल, प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार, आघाड्यांचे राजकारण वगैरे. तसेच द. अमेरिकेतील बहुसंख्य देश हे फे्ंरच, स्पेन, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या पूर्वी ताब्यात असल्याने वसाहतवादाची भारतासारखीच मोठी किंमत या देशांनाही मोजावी लागली.
त्यानंतर डावी सत्ता, रशिया, चीनच्या कच्छपी लागलेले देश आणि अमेरिकेचे मित्रदेश असेही तिथे गटातटाचे राजकारण. पण, तरीही या देशांसोबत अगदी 1947 पासून भारताचे संबंध वृद्धिंगत होत राहिले. परंतु, द. अमेरिकेतील व्यापारी स्पर्धेतहीचीनने बाजी मारलेली दिसते. एका आकडेवारीनुसार, भारत-दक्षिण अमेरिका व्यापाराच्या तब्बल सहापट अधिक व्यापार चीनसोबत आहे. त्यामुळे आफ्रिकेप्रमाणेच भारताला द. अमेरिकेतही व्यापाराच्या मोठ्या संधी असून, त्या विस्तारण्यासाठी मोदी सरकारने पावले उचललेली दिसतात.
त्याअंतर्गत पेराग्वे या देशात भारतीय दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले. दूतावासाचे उद्घाटन केले म्हणजे या देशात भारतीयांची संख्याही मोठी असेल, असा एक समज निर्माण होणे साहजिकच. परंतु, तसेही नाही. पेराग्वेमध्ये केवळ 600 भारतीय वास्तव्यास असल्याची नोेंद असून त्यापैकी बहुतांशी हे गुजराती, सिंधी ‘एनआरआय’ व्यापारी आहेत. पेराग्वेशी भारतीय आयात-निर्यातीतही कालपरत्वे वाढ झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता स्पष्ट होते.
निर्यातीमध्ये ऑरगॅनिक केमिकल, वाहनांचे सुटे भाग, मशिनरी, प्लास्टिक, अॅॅल्युमिनियम, रबर उत्पादने यांचा समावेश आहे, तर आयातीमध्ये 94 टक्के प्रमाण हे एकट्या सोया-सूर्यफूलाच्या तेलाचे आहे. तेव्हा पेराग्वेसह इतर द. अमेरिकेतील देशांमध्ये प्रामुख्याने भारतीय औषध कंपन्यांची मोठी बाजारपेठ आहे. परंतु, इतर व्यापाराच्या बाबतीत मात्र चीनच्या तुलनेत आपण पिछाडीवर आहोत, हे वास्तव मान्य करावेच लागेल.
याचे एक प्रमुख कारण म्हणजे द. अमेरिका खंडाशी असलेले भारताचे भौगोलिक अंतर. त्यामुळे आजही भारतातून द. अमेरिकेत थेट ‘कनेक्टिव्हिटी’ असलेली हवाईसेवा उपलब्ध नाही. परिणामी, पर्यटकांची संख्याही तितकीच मर्यादित. तेव्हा, भविष्यात द. अमेरिकेतील जवळपास 600 दशलक्ष मध्यमवर्गीय ग्राहकांची बाजारपेठ काबिज करून भारतीय उत्पादने ही चिनी उत्पादनांना एक सक्षम पर्याय ठरू शकतात.
परंतु, त्यासाठी गरज आहे ती द. अमेरिकेतील लहानातल्या लहान देशापासून ते ब्राझीलसारख्या मोठ्या देशांशी संबंधांची नाळ अधिक दृढ करायची. तसेच, व्यापारी पातळीवरही शुल्क सवलती, व्यापारी परिषदा वगैरे माध्यमातूनही दक्षिणेकडची झेप भरारी ठरू शकते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची