मुंबईवर २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी! विरारहून एक ताब्यात
20-Aug-2022
Total Views |
मुंबई : मुंबई वाहतुक पोलिसांच्या व्हॅाट्सअप वर पाकिस्तानच्या क्रमांकावरुन मुंबईत पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्यात येईल. अशी धमकी शुक्रवारी दि. १९ ऑगस्टला रात्री आल्याने सर्वत्र खळबळ उडली. शहरात पुन्हा घातपात होऊ नये, म्हणुन पोलिस प्रशासन सतर्क झाली आहे. याप्रकरणी विरार मधुन एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे. एटीएस आणि मुंबई पोलिस याबाबत अधिक तपास करत आहे.
पोलिसांनी सर्व क्रमांक ट्रॅक करण्याचे काम सुरु केले. यातील बरेच क्रमांक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ट्रॅक झाले आहे. त्यातील एक क्रमांक विरार येथे असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी पोलिसांचे पथक रवाना झाले. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. तो व्यक्ती कोण आहे? काय काम करतो? त्याचं बॅकग्राऊंड काय? त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. त्या व्यक्तीचा क्रमांक पाकिस्तानमध्ये बसलेल्या व्यक्तीला कसा मिळाला? याचा तपास करण्यात येणार आहे. तो व्यक्ती दोषी आढळला तरच त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. जर तो दोषी आढळला नाहीतर त्याला सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त विवेक फणसळकरांची पत्रकार परिषद
याबाबत मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. आम्हांला जो धमकीचा मेसेज आला आहे त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत. यामुळे मुंबई आणि मुंबईकरांना कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होणार नाही, यासाठी आम्ही सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क करत आहोत. पाकिस्तानच्या क्रमांकावरुन हा मेसेज आल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. याबाबत सखोल तपास चालु आहे. असे फणसळकर यावेळी बोलले.
धमकीच्या मेसेजनंतर पोलिस यंत्रणा सतर्क
मुंबईत पुन्हा एकदा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्यात येणार असून त्यासाठी भारतातील ६ जणांची मदत घेतली जाणार असल्याचे त्यात म्हटले आहे. शुक्रवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा मेसेज करण्यात आला आहे. यामागे कोणाचा हात आहे त्याचा शोध घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक(एटीएस) आणि इतरही सुरक्षा यंत्रणा काम करत आहे. मुंबईच्या सुरक्षेबाबतही पोलिस यंत्रणा सतर्क आहे.