देशासमोर असलेल्या काही ठळक समस्या सोडवण्यासाठी आपण आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. एक सुजाण आणि जबाबदार नागरिक बनून राष्ट्रभक्तीच्या शिडीवर आपण एक पायरी आणखी वर जाण्याचा आज संकल्प करूया.
प्रत्येकाने स्वतःला एकदा नक्की विचारा, ‘मी या देशासाठी काय करतो?’ देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. त्यामागे कारणे अनेक आहेत. आपण साधे देशातले नियम पाळू शकत नाही. नियम मोडणे हेच आपल्याला स्वातंत्र्य वाटते. इतर विकसित देशांची तुलना करता, त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही. ते देशाचे नियम पाळतात, ते नियम मोडणार्याला, मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी, त्याला शिक्षा होते. ते न चुकता कर भरतात, प्रशासनाने जी चौकट घातली आहे, ती त्यांना बंधन वाटत नाही.
आपण मात्र अगदी याच्या उलटे वागतो. ‘येथे शांतता राखा’ असे लिहिले असेल तिथे हमखास कलकलाट असतो. ‘येथे थुंकू नये’ असे लिहिलेल्या पाटीवरच लाल पिचकार्यांची रांगोळी असते. ‘नो पार्किंग’ची पाटी असते, तिथेच गाड्या आडव्यातिडव्या लावलेल्या असतात. ‘कृपया रांगेची शिस्त पाळा’ असे लिहिलेल्या ठिकाणीच झुंबड असते. ‘येथे स्वच्छता राखा’ असे लिहिलेल्या पाटीखालीच कचर्याचा डोंगर असतो. म्हणजे नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशी आपली धारणा!
आजकाल अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे देशातले सगळ्यात मोठे स्वातंत्र्य असल्याचा समज समाजमाध्यमांनी पसरविला आहे आणि हे स्वातंत्र्य दाबले जाते आहे, म्हणून ओरडाही केला जात आहे. म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली मी काहीही लिहू शकतो, बोलू शकतो, याला जर कुणी अटकाव करण्याचा प्रयत्न केला, तर अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आल्याची ओरड!
या सगळ्यात भारतीय काही वेगळा विचार करतात का? देशावर त्यांचे प्रेम आहे, पण ते फक्त स्वातंत्र्य दिन किंवा 26 जानेवारीलाच उफाळून येते. एरवी ‘मी, माझे करिअर, माझी नोकरी.’ म्हणूनच प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, ‘मी या देशासाठी काय करतो?’
जबाबदार नागरिक
भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बर्याच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे, हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा नागरिकांना सपशेल विसर पडतो. परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील आपली जबाबदारी आहे, पण रस्त्यावर आपण सर्रास कचरा टाकतो. आपण इतके बेजबाबदार आहोत की, काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी राजकीय नेतेच जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढण्याचा प्रयत्न करतो.
राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही. पण, तरीही नाल्यांना ‘डम्पिंग ग्राऊंड’चे रुप आलेले दिसते. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात. तरीही हा नियम लोकांनी पायदळी तुडवला. वाहतुकीचे नियम जितके आपल्याकडे मोडले जात असतील, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ‘ओव्हरटेक’ करणे या गोष्टी अगदी छातीटोकपणे आपल्याकडे केल्या जातात.
नियम मोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित असे दोघेही आघाडीवर! शिकून माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही. त्यामुळे नियम पाळण्यासाठी गरज कडक कायद्यांची नाही, तर गरज आहे सदसद्विवेकबुद्धीची. गरज आहे पालकांनी नियम पाळण्याची आणि मुलांवर उत्तम नागरी संस्कार करण्याची.
आपापलं काम व्यवस्थित करणं हीदेखील देशभक्ती
रस्त्यावरील सिग्नल पाळणं ही देशभक्ती आहे, रस्त्यावर न थुंकणं ही देशभक्ती आहे, स्त्रियांचा आदर करणं ही देशभक्ती आहे, दिलेला शब्द पाळणं ही देशभक्ती आहे, भ्रष्टाचारास उत्तेजन न देणं ही देशभक्ती आहे, लाच न देणं ही देशभक्ती आहे, सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं ही देशभक्ती आहे, आपल्याआधी लोकांचा विचार, ही देशभक्ती आहे, रस्त्यावरील वाहतूक अडवून लग्नाच्या मिरवणुकीत न नाचणं ही देशभक्ती आहे.
जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार न करणं ही देशभक्ती आहे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे, मतदान करणं ही देशभक्ती आहे, योग्य उमेदवार निवडणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गाने यशस्वी होणं, ही देशभक्ती आहे, वाद न घालता काम करणं ही देशभक्ती आहे, इतिहासापासून शिकणं ही देशभक्ती आहे, गतकालातील गोष्टींवर वाद न घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं ही देशभक्ती आहे, महाराज-बाबा-नेते-अभिनेते-कार्यकर्ते-पक्ष-धर्म-विचारसरणी अशा कोणाचेही स्तोम न माजवणं ही देशभक्ती आहे, चांगल्या कामात कोलदांडा न घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:पलीकडे पाहणं ही देशभक्ती आहे आणि ‘सुजाण नागरिक’ बनण्याचा प्रयत्न करणं ही देशभक्तीच आहे. प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित करणं हीच आजच्या काळातली देशभक्ती आहे.
साध्या साध्या हजारो कामांची यादी
रस्त्यानं नीट आणि वेग मर्यादित ठेवून वाहन चालवणं, रस्ता क्रॉस करणार्यांना रस्ता ओलांडू देणं, आपल्या वाहनाची धडक बसून कोणी पडणार नाही अशी सावधगिरी बाळगणं, रस्त्यांवरचे दिवे लावणं आणि सूर्योदयाला ते बंद करणं, शिक्षकांनी नीट शिकवणं, परीक्षकांनी उत्तरपत्रिका नीट तपासून परीक्षांचे निकाल वेळच्या वेळी लावणं, सरकारी कार्यालयातली काम नियमानुसार करणं, अचानक संप अथवा बंद पुकारून सामान्य माणसांना वेठीला न धरणं, कार्यालयीन कामं भराभर संपवणं, वरकमाई’चा मोह न धरणं अशी हजारो कामे.
समाजातील प्रत्येक व्यक्ती दक्ष राहिली
सामान्य माणसाने जास्त जागरूक राहण्याची वेळ आली आहे. सरकार आणि पोलीस यांच्यावर सर्व जबाबदारी टाकून चालणार नाही. दहशतवादी स्लिपर सेलच्या मदतीने हल्ले करीत असल्याने गुप्तचर यंत्रणांपुढे मोठे आव्हान आहे. नागरिकांनी जागरूक राहून आढळलेल्या प्रत्येक धोक्याची सूचना संबंधित यंत्रणांना द्यायला हवी. स्थानिक सहभागातून होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर दक्षता बाळगणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
शेजारीपाजारी, आसपासच्या इमारती, जवळचा भाग यावर लक्ष ठेवा. कान व डोळे उघडे ठेवा.सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांत मिसळा. समाजविघातक, देशविघातक प्रचार, हालचाली सुरू असतील, तर पोलिसांना कळवा. सार्वजनिक ठिकाणी वावरताना सजग राहा, दक्षता बाळगा. कोणतेही ठिकाण लक्ष्य होऊ शकत असल्याने इथे हल्ला होणे शक्यच नाही’ असे गृहीत धरू नका. सार्वजनिक मंडळे, तरुणांचे गट, विद्यार्थी संघटना, स्वयंसेवी संस्था, विविध कामगार संघटना, धार्मिक-जातनिहाय संघटना, बँक कर्मचारी किंवा व्यावसायिकांच्या संघटना या मोठ्या समूहाच्या संपर्कात असतात. त्यांनी आसपास होणारे बदल टिपणे आवश्यक. समूहगटांनी आपापसांतील वाद शमविणे आवश्यक.
स्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ़्री फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोन वरून हिंसक घटनेचे चित्रण करून पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरून हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.
शहरांमधील रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम केली जावी. वाहतूक नियम तोडणार्या नागरिकांना शिक्षा द्यावी.
चीनने आपल्या बाजारात जी घुसखोरी केली आहे, त्याला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. देशभक्ती म्हणून चिनी वस्तू वापरावयाच्या नाहीत असे ठरवू शकतो. चीनच्या बाजाराला आळा घालण्यासाठी व्यापक जनजागरण करण्याची गरज आहे.
खारीचा वाटा नक्कीच उचलू!
या गोष्टी राष्ट्रभक्तीचा केवळ एक छोटासा उपसंच आहेत. पण, राष्ट्रभक्तीचा परीघ यापेक्षा कितीतरी मोठा आहे.
देशासमोर असलेल्या काही ठळक समस्या (त्यात भर न घालता) सोडवण्यासाठी आपण आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. एक सुजाण आणि जबाबदार नागरिक बनून राष्ट्रभक्तीच्या शिडीवर आपण एक पायरी आणखी वर जाण्याचा आज संकल्प करूया.
भारताच्या सरहद्दीवर आक्रमण खूप प्राचीन काळापासून होत होते, होत आहे. युद्धे झाली, यापुढेही होतील. राष्ट्रधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. राष्ट्रीय एकात्मता-ऐक्य टिकवणे, अबाधित राखणे हे केवळ शासन व सरकारचे काम नाही, तर प्रत्येक भारतीयांचे ते परम कर्तव्य आहे. मग कर्तव्याकडे पाठ का फिरवावयाची!