पुणे: आपल्या देशाचे भवितव्य आपण नालायक राजकारण्यांच्या माथी सोपवून मोकळे झालो आहेत असे वक्तव्य सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी केले आहे. पुण्यातल्या डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुबोध भावे बोलत होते.
पूर्वीच्या काळी लोकमान्य टिळक असतील आगरकर असतील, तेव्हा तरूण मुलांमध्ये चर्चा या देशाच्या उन्नती बदल आणि प्रगती बद्दल होत्या. त्या आज होताना दिसत नाहीत. आजच्या तरुण पिढीने परदेशी जाऊन परकीय चलनातले जीवन जगावे याचा विचार करण्यापेक्षा, माझा देश कसा पुढे जाईल याचा विचार करायला हवा.यावेळी सुबोध भावे यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीवर देखील आपलं मत मांडलं, 'आपण प्रत्येक जण उत्तम शिक्षण घेतो करियरच्या मागे लागतो. चांगली नोकरी कशी मिळेल या प्रयत्नात असतो. परदेशात जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत '
आज आपण देश उभारण्याचे काम, लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या माथी सोपवून मोकळे झालो आहोत. आपल्याला असे वाटते कि आपण निवडून दिलेले नालायक राजकारणी आपल्या देशाची काळजी घ्यायला उभे आहेत, पण त्यांनी काय केले आहे, गेल्या काही वर्षात ते आपण पाहतोच आहोत, असे सुबोध भावे पुढे म्हणाले. बोलण्याच्या ओघात सुबोध भावे यांनी राजकीय नेतृत्वाचा अपमान केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.