वन्यप्राणी बचाव कार्याची संकलित माहिती शासनाकडे जमा होणार
उभय प्रणालींच्या माध्यमातुन वनसंवर्धन व संरक्षण तसेच वन्यप्राणी संरक्षणाची प्रक्रिया अधिक गतीमान होईल - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
18-Aug-2022
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी): वन्यप्राणी बचाव व्यवस्थापन प्रणाली आणि राज्य सनियंत्रण प्रणाली या माध्यमातुन वनांचे शाश्वत व्यवस्थापन, संरक्षण, संवर्धन तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वन्यप्राणी बचाव व्यवस्थापन करणे सहज सुलभ व्हावे यादृष्टीने आयसीटी प्रकल्पाच्या माध्यमातुन विकसित करण्यात आलेल्या या दोन्ही प्रणाली अतिशय महत्वाच्या आहेत. या माध्यमातुन वनसंवर्धन व संरक्षण तसेच वन्यप्राणी संरक्षणाची प्रक्रिया अधिक गतीमान होईल असा विश्वास राज्याचे वन व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मंत्रालयात राज्य योजना संनियंत्रण प्रणाली व वन्यप्राणी बचाव व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दि. १७ ऑगस्ट रोजी करण्यात आले. या उपक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या. राज्याच्या वनविभागात सन २०१२ पासून आयसीटी प्रकल्प कार्यान्वीत आहे. या प्रकल्पाअंतर्गत वनांचे शाश्वत व्यवस्थापन, संरक्षण, संवर्धन व त्यास संलग्न असलेल्या विविध विषयांचे माहिती व्यवस्थापन करण्यासाठी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
राज्य योजना सनियंत्रण प्रणाली
वन विभागातील विविध योजनांसाठी क्षेत्रीय स्तरातून प्रस्ताव मागवून त्यांच्यावर झालेले शासन निर्णय या सगळ्याची माहिती आता एकाच प्रणालीमध्ये मिळणार आहे. विभागीय कार्यालयापासून मंत्रालय स्तरापर्यंत कागद विरहीत प्रस्ताव सादर करण्याची सुविधा, प्रस्ताव संनियंत्रणाकरिता प्रदर्शने फलक सुविधा, प्रस्ताव सादर करण्यासंबंधी तसेच अनुदान विनियोग संबंधी अधिका-यांना नियमित एसएमएस सुचना पाठविण्याची सुविधा ही या प्रणालीची ठळक वैशिष्टये आहेत.
वन्यप्राणी बचाव व्यवस्थापन प्रणाली
मागील काही वर्षापासून राज्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. प्रामुख्याने वाघ व बिबट यांच्या संख्येत सुध्दा मोठी वाढ झाली आहे. जेव्हा वन्यप्राणी मानवी वस्तीत प्रवेश करतात तेव्हा मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी रेस्क्यु करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांचे रस्ते अपघात, खुल्या विहीरीत पडणे इत्यादी कारणांमुळे वन्यप्राण्यांचा बचाव करणे आवश्यक असते. अशा प्रकारची माहिती एकत्रीतपणे उपलब्ध व्हावी यादृष्टीने वन्यप्राणी बचाव व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे.
या दोन्ही प्रणालींच्या कार्यान्वयन प्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रविण श्रीवास्तव, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक के. पी. सिंग, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मीक) विकास गुप्ता, मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) डॉ. रविकिरण गोवेकर, अपर मुख्य वनसंरक्षक कांदळवन विरेंद्र तिवारी, अपर मुख्य वनसंरक्षक एफडीसीएम एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पा शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनलसंरक्षक अर्थसंकल्प, नियोजन व विकास प्रदिप कुमार, सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिता सिंग, वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये, संचासलक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मल्लीकार्जुन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक उदय ढगे, वनविभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, कक्ष अधिकारी. वि.श. जाखलेकर उपस्थित होती.