वैदिक परंपरा आणि साधना

    17-Aug-2022
Total Views |
spiritual
 
 
 
आजचे युग हे विज्ञान युग मानले जाते. विज्ञान संशोधनाद्वारे प्रगत होत असते. वैज्ञानिकांना आपल्या मनाच्या एकाग्रतेमुळे अशी संशोधने करणे शक्य झाले आहे. सर्व थोर वैज्ञानिक आधुनिक ऋषीच होत. आपले मन ध्यानाद्वारे एकाग्र करून ऋषी आध्यात्मिक चिंतन करीत आणि त्याद्वारे ज्ञानविज्ञानातील गहन तत्त्वे समाजासमोर ठेवित असत. वेदांमध्ये बरेच ज्ञानविज्ञान साठविले आहे. परंतु, दुर्दैवाने आज वेद म्हणजे केवळ मंत्र मानले जातात. वैदिक परंपरेने केवळ ज्ञानाचा किंवा विज्ञानाचाच एकांगी बडेजाव केला नाही, तर ज्ञानाची पूर्ती होण्याकरिता विज्ञानालाही महत्त्व दिले.
 
 
 
गीता या बाबतीत स्पष्टच सांगते. ‘ज्ञानविज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्षसे शुभात्।’ (अ.९-१) म्हणजे मुक्तीकरिता ज्ञानासह विज्ञानाचीसुद्धा आवश्यकता आहे. भारतीय परंपरेने विज्ञानाकडे लक्ष दिले नाही, असे मत प्रतिपादन करणार्‍यांनी गीतेचे वरील वचन लक्षात ठेवावे. एवढेच नव्हे, तर त्या काळाला धरून जी काय वैज्ञानिक प्रगती शक्य असेल, त्याचा पाठपुरावा भारतीय वैज्ञानिकांनी केला, असे इतिहास साक्ष देतो. परंतु, केवळ भौतिकतेला सर्वस्वी प्राधान्य वैदिक परंपरेने कधीच दिले नाही. केवळ वैज्ञानिक जीवन परंपरेलाच प्राधान्य देणार्‍या आजच्या पाश्चिमात्य राष्ट्रांच्या निराशामय लोकजीवनाप्रमाणे भारतीय जीवन कधीच विस्कळीत व आत्मविघातक बनले नाही. मन:शांतीकरिता देश-विदेशातून भारताकडे येणारा तरूण-तरुणींचा लोंढा याची साक्ष देत आहे.
 
 
 
कोणत्याही जड पदार्थाला केवळ त्याचे दिसणारे त्रिमात्रात्मक जड अस्तित्वच नसून त्यापलीकडील चौथ्या कालमात्रेत त्याचे खरे अस्तित्व असते, असा महनीय सिद्धांत आईनस्टाईनने प्रथमच प्रस्थापित केला. त्यावरून सर्व वस्तुजाताला व प्राणिजाताला बाह्यरूपाने दिसणार्‍या त्रिमात्रात्मक अस्तित्वापेक्षा आणखी एक चतुर्थ मात्रेतील अस्तित्व असते, असा सिद्धांत रुढ झाला. एवढेच नव्हे, तर त्या चतुर्थमात्रेतील अस्तित्वच त्रिमात्रात्मक अस्तित्वाचे नियामक कारण आहे, असेही सत्य त्यातून बाहेर निघाले. वैदिक परंपरेने केवळ त्रिमात्रात्मक जडशरीरापेक्षा त्यापलीकडील दिव्य अशा जीवात्म्याला व आत्म्याला म्हणूनच सकारण प्राधान्य दिले आहे.
 
 
 
इतर अवैदिक परंपरेत जड जीवनालाच प्राधान्य असल्यामुळे त्या नश्वर अशा जडजीवनाचे व इंद्रिय सुखप्राप्तीचे चोचले पुरविण्यावरच भर दिला. भारतीय परंपरेने मात्र आत्मा आणि परमात्मा या दिव्य-दिव्यतर सत्य जीवनांचा मागोवा घेऊन त्यांनाच प्राधान्य दिले. केवळ भौतिक त्रिमात्रात्मक जीवन जगणार्‍या पाश्चिमात्यांना त्या जीवनाचा आता कंटाळा आला आहे व भकास वैफल्याच्या दृष्टीने ते भारताकडे पाहत आहेत. भारतीय तरुण-तरुणींनी या पार्श्वभूमीत स्वत:कडे पाहणे आवश्यक आहे.
 
 
प्रकाशवेग व त्यापलीकडील दिव्यवेग
 
प्रकाशालासुद्धा वेग असून जड जगताच्या व्यवहारात प्रकाश वेगापेक्षा अधिक वेग असा कोणताच नाही, असा ठोकळ सिद्धांत आईनस्टाईनने प्रस्थापित केला. जे अस्तित्व वा माणूस प्रकाशवेगापेक्षा कमी वेगाने प्रवास करेल त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान काळ राहून कालावस्थेचा परिणाम म्हणून त्या अस्तित्वाला मृत्यू म्हणजे नाश राहील, असा त्यातून महत्त्वाचा उपसिद्धांत निघत होता. त्यामुळे सर्वच वस्तुजाताला मरण आहे, या वैदिक सिद्धांताला पुन्हा उजाळा मिळाला.
 
 
 
जे-जे जड असेल ते नश्वर असून जे त्यापलीकडील आहे, ते ईश्वर स्वरूप आहे. या वैदिक विज्ञानाची महती जगाला कळली म्हणून केवळ नश्वर जीवनाच्या मागे न लागता ईश्वरस्वरूप परम अस्तित्वाच्या अनुरोधाने जीवनाची रचना करावी, असा आग्रह वैदिक परंपरेने सदा धरला. भौतिक सुखांना पाश्चिमात्य कंटाळले आहेत. त्यांना त्यातून मार्ग सापडत नसल्यामुळे ते जीवन भकास व अत्याचारी बनत आहे. भारतीयांनी यापासून अवश्य बोध घेण्यासारखा आहे. कारण, त्यांची परंपरा उच्च आहे.
 
 
 
 
प्रकाशवेगापेक्षा कमी वेग असणार्‍या अस्तित्वाला नाश राहील, तर प्रकाशवेगाने जाणार्‍या अस्तित्वाला नाश न राहता ते अस्तित्व सदा वर्तमानकाळातच राहील, असा एक महत्त्वाचा सिद्धांत यातून निघतो. प्रकाशाला म्हणून भूत व भविष्य काळ नाही. तो सदा वर्तमानातच राहील. म्हणून आत्म्याचे वर्णन करताना गीता सांगते की, ‘अजो नित्य:शाश्वतोऽयं पुराणो। नायं भूत्वा भवितावान भूयः॥’ म्हणजे आत्मा अमर असून त्याला भूतकाळ नाही की भविष्यकाळ नाही. तो नित्य आहे. त्या आत्मरूपाला साक्ष ठेवून व त्याचा ध्यानाद्वारे प्रत्यक्ष अनुभव घेऊन जीवनाची रचना केल्यास जीवन पूर्ण व सुंदर बनेल, हा महान सिद्धांत वैदिक परंपरेने जगासमोर मांडला. सापेक्षतावादाच्या सिद्धांताला धरून वरील वैदिक सिद्धांत किती समर्पक आहे, याची कल्पना सर्व बुद्धिमंताना येऊ शकेल. वैदिक परंपरा अतिशय शास्त्रीय आहे.
 
 
‘एडिंगटन’चे प्रमेय
 एडिंगटन नावाच्या एका विख्यात वैज्ञानिकाने सापेक्षतावादाचा आधार घेऊन असे प्रमेय मांडले की, जे अस्तित्व वा व्यक्ती प्रकाशवेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करेल, त्याला घडणार्‍या घटनांचा प्रत्यय उलट क्रमाने येईल. एडिंगटनचे हे म्हणणे समजण्याकरिता आपल्याला व्यवहारातील एक उदाहरण घ्यावे लागेल. प्रकाशवेगापेक्षा कमी वेगाने जाणार्‍याला बालकावस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था व शेवटी मृत्यू अवस्थासुद्धा येईल.
 
 
 
जे जे निरीक्षक त्याच वेगावस्थेत असतील त्यांनासुद्धा त्या व्यक्तीचे दर्शन त्याच क्रमाने म्हणजे बाल्यावस्थेपासून प्रौढावस्थेत व वृद्धावस्थेपासून मृत्यू अवस्थेद्वारे होईल. परंतु, जो निरीक्षक प्रकाशवेगाने जाईल त्याला दिसणार्‍या व्यक्ती सदा बाल्यावस्थेत वा तारुण्यावस्थेत दिसतील. नवसिद्ध बालखिल्य ऋषी सदा बालकच होते, अशा कथा पुराणात आहेत. वैदिक देवता सदा तरुणच दाखविल्या जातात. त्यामुळे त्यांना दाढीमिशा कधीच दाखवित नसतात, यातील रहस्य आता साधकांना व बुद्धिमंताना कळायला हरकत नाही.
 
 
 
एडिंगटनचे प्रमेय घेऊन पलीकडील प्रकाशवेगापेक्षा अधिक वेगात गेल्यास आपणास एखाद्या व्यक्तीचे जीवनदर्शन अगदी उलटक्रमाने दिसेल. म्हणजे ती व्यक्ती बाल्यावस्थेतून वृद्धावस्थेत जाताना दिसणार नाही, तर वृद्धावस्थेतून बाल्यावस्थेकडे जाताना दिसेल. ती व्यक्ती तिरडीवरून उठून म्हातार्‍या स्वरूपात वावरताना दिसेल, त्यानंतर तरुण झालेली दिसून किशोरावस्थेकडे त्या व्यक्तीची वाटचाल झालेली दिसेल.
 
 
 
शेवटी बालक बनून परत आपल्या मातृगर्भात प्रवेश करताना दिसेल. प्रकाशवेगापेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या अस्तित्वाचे असे विपरित अनुभव राहतील. असल्या दिव्य अवस्थेत असणार्‍या व्यक्तीला ‘आधी कळस मग पाया रे’ असा अनुभव आल्याविना राहणार नाही. गीतेत वर्णन केल्याप्रमाणे त्या व्यक्तीला ‘उर्ध्वमूलम् अधःशाखम्’म्हणजे झाडाचे मूळ वर असून त्याच्या शाखा खाली असलेल्या दिसतील. असल्या जडजीवनक्रमाचे उलट असलेल्या दिव्य दृष्टीचे वर्णन संत मीराबाई आपल्या भाषेत करते, ‘उलट भई मोरे नयननकी मोरी लागी लटक गुरुचरननकी
- योगीराज हरकरे