शनिवार, दि. १३ ऑगस्ट... पाकिस्तानचे लाहोर शहर... पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या... माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या जलशासाठी तुफान गर्दी जमली होती. यावेळी आपल्या भाषणात खान यांनीही ‘लाव रे तो व्हिडिओ’चा प्रयोग केला. त्यांनी यावेळी ना स्वत:चा व्हिडिओ त्या मोठ्या स्क्रिनवर लावला ना इतर कुठल्या पाकिस्तानीचा. तो व्हिडिओ होता भारताचे पररराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या एका मुलाखतीचा अंश... त्यामुळे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाने अशाप्रकारे भारताच्या परराष्ट्र मंत्र्यावर चक्क त्याचा व्हिडिओ लावून स्तुतिसुमने उधळण्याचा प्रकार हा इतिहासात पहिल्यांदाच घडला.
खरंतर यापूर्वीही इमरान खान यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये वारंवार भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तोंडभरून कौतुक केले. त्यातही मोदींचे नाव टाळून वेळोवेळी इमरान खान यांनी जयशंकर यांच्यावरच कौतुकवर्षाव केला. आता इमरान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे गोडवे गायले म्हणजे त्यांना भारताबरोबर चांगले संबंध हवे आहेत वगैरे मुद्दा नाहीच. मूळ मुद्दा आहे तो केवळ आणि केवळ पाकिस्तानच्या विद्यमान सत्ताधार्यांना, त्यांच्या दृष्टीने ‘इम्पोर्टेड हुकुमत’ला त्यांची जागा दाखवण्याचा.
कारण, इमरान खान सत्ताच्युत झाल्यापासून याच आरोपावर ठाम आहेत की, त्यांनी रशियाला भेट दिल्याचे अमेरिकेला रुचले नाही आणि अमेरिकेने कट रचून खान यांची सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे अमेरिकेविरोधात इमरान खान यांचा राग आळवणे अद्याप सुरूच आहे. म्हणजे एकीकडे पाकिस्तानी जनतेला शाहबाज शरीफ सरकार कसे नाकर्ते आहे ते प्रत्येक सभेत सांगायचे आणि दुसरीकडे ‘मी अमेरिकेच्या दबावासमोर झुकणारा नव्हतो,’ हे सांगत पाकिस्तानी आवामची सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न करायचा, असा हा दुहेरी प्रयत्न.
आता भारताच्या परराष्ट्र मंत्र्याची लाहोरपासून ते इस्लामाबादच्या गल्लोगल्ली इतकी चर्चा का बरं? तर कारण स्पष्ट आहे - पाकिस्तानातील इंधनाचे गगनाला भिडलेले दर. पाकिस्तानमध्ये पेट्रोलची प्रती लीटर किंमत २४८ रुपये, तर हायस्पीड डिझेलची किंमत 276 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे महागाईने उच्चांक गाठला असून, पाकिस्तानचे डोळे आता ‘आयएमएफ’च्या मदतीकडे लागून आहेत. अशावेळी भारतात मात्र रशिया-युक्रेन युद्धाचा फारसा परिणाम जाणवला नाही.
कारण, अमेरिकेने भारताला रशियाकडून तेलखरेदी करू नका, तो पैसा रशिया युद्धात वापरून युक्रेनला संपवेल म्हणून तेलखरेदी बंद करण्यासाठी डोळेही वटारले. पण, भारताने मात्र ‘आमच्या देशवासीयांसाठी आम्हाला जे योग्य वाटेल, तेच आम्ही करू,’ असे प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या धमकीला भीक घातली नाही. एवढेच नाही, स्लोव्हाकिया येथील ३ जून रोजीच्या एका परिषदेत रशियाकडून तेल खरेदी करणे म्हणजे युद्धाला वित्तपुरवठा करणे नाही का, असा प्रश्न जयशंकर यांना विचारण्यात आला. त्यावर जयशंकर यांनी मुलाखतकाराला आकडेवारीसह सडेतोड प्रत्युत्तर दिले.
जयशंकर म्हणाले होते की, “जेवढे तेल भारत रशियाकडून एका महिन्यात खरेदी करतो, तेवढेच तेल अख्खा युरोप रशियाकडून एका दिवसांत खरेदी करतो.” त्यामुळे विकसित देशांना एक न्याय आणि विकसनशील देशांना दुसरा, या अमेरिकेच्या भेदभावपूर्ण विचारसरणीला जोरदार धक्का जयशंकर यांनी दिला. एवढेच नाही, तर ‘भारतीयांसाठी, देशात महागाईचा भडका उडू नये म्हणून जे जे आम्हाला करावेे लागेल, ते करू’ म्हणत जयशंकर यांनी अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनाही जो संदेश द्यायचा होता, तो अगदी स्पष्ट शब्दांत दिला.
जयशंकर यांच्या याच मुलाखतीची क्लिप खान यांनी लाहोरला आपल्या सभेत लावली आणि भारताच्या कणखर भूमिकेचे कौतुक केले. त्यानंतर पाकिस्तानातही आपसुकच त्यांचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो आणि भारताचे जयशंकर यांची तुलना झाली नसती तरच नवल! त्यामुळे पाकिस्तानात झरदारीचा पुत्र या एकमेव निकषावर एक व्यक्ती परराष्ट्र मंत्री होते आणि भारतात परराष्ट्र सचिव म्हणून आधी कामाचा दांडगा अनुभव असलेली बुद्धिमान व्यक्ती पररराष्ट्र मंत्री होते. भारताची बाजू जागतिक पातळीवर परखडपणे मांडते आणि ‘राष्ट्रहित सर्वोपरी’चा संदेश देते; यावरूनच दोन्ही देशांचा स्वातंत्र्यानंतरचा प्रवास अधोरेखित होतो, हे मात्र नक्की!