मुंबई : “आजच्या तरुणांनी उद्योजकतेकडे फक्त स्वतःच्या संपन्नतेचे साधन म्हणून बघण्यापेक्षा, ब्रिटिश येण्यापूर्वी जो संपन्न, समृद्ध असा भारत होता, तो परत कसा तयार करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,” असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी दिला. ‘शिक्षण प्रसारक मंडळी`च्या ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट` आणि ‘लघु उद्योग भारती` यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता प्रोत्साहन संमेलन माटुंगा येथील ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट` येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आले होते. या संमेलनातून उद्योजकांना प्रोत्साहन, तसेच विविध संधींची माहिती करून देणे हा उद्देश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत घेतल्या जाणाऱ्या ‘स्वावलंबी भारत` अभियानांतर्गत हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या नात्याने कृष्णगोपाल यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट`चे संचालक उदय साळुंखे या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. “जो इतिहासाचा खोलवर धांडोळा घेऊ शकतो, तोच उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहू शकतो. त्यामुळे आजच्या उद्योजकांनी तेव्हाचा भारत काय होता, हे आधी अभ्यासले पाहिजे,” असे आपल्या संदेशात कृष्णगोपाल यांनी सांगितले. आपल्या प्राचीन भारतातील अनेक गोष्टी उदा. सारनाथ येथील अशोकस्तंभ असेल, भारताचे प्राचीन वेदवाङ्मय असेल, हे सर्व आपल्या त्यावेळच्या भारतात किती उच्च कोटीचे तंत्रज्ञ, तत्त्वज्ञ होते हेच दाखवतात. सर्वच विषयांमध्ये भारत त्यावेळी खूप प्रगत होता. त्यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेच्या ३४ टक्के इतका वाटा हा एकट्या भारताचा होता. हीच परिस्थिती इंग्रज येईपर्यंत होती. त्यानंतर भारताचे इतके शोषण झाले की कोणे एकेकाळी ३४ टक्के असलेला भारताचा वाटा अवघ्या दोन टक्क्यांवर पोहोचला.
“जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताकडे सर्वच जग संशयाने बघत होते, कित्येक लोक तर भारताचे विघटन होईल, एक कमजोर राष्ट्र होईल, असेच भाकीत वर्तवत होते. या सर्वांना खोटे ठरवत आज भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. आपण कित्येक क्षेत्रांत प्रगती केली आहे पण उद्योजकता याच क्षेत्रात तो मागे राहिला आहे. ही जबाबदारी आजच्या तरुणांची आहे. भारताच्या एकूण प्रकृतीशी सुसंगत असे उद्योग आपल्याकडे उभे राहिले पाहिजेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा तसाच विचार होणे गरजेचे आहे. तसा विचार जेव्हा आजचे तरुण करतील तेव्हा भारताला परत एकदा वैभवसंपन्न होण्यापासून कोणीच रोखु शकणार नाही,” असे आपल्या संदेशात कृष्णगोपाल यांनी सांगितले.
धाडस, ज्ञान आणि नियोजन ही त्रिसूत्री महत्त्वाची
“आजच्या उद्योजकांनी कायम धाडस, ज्ञान आणि नियोजन ही त्रिसूत्री लक्षात ठेवली पाहिजे, या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यानेच यश मिळेल,” असा संदेश ‘लघु उद्योग भारती’चे महाराष्ट्राचे महामंत्री भूषण मर्दे यांनी दिला. “भारताला सशक्त आणि ‘आत्मनिर्भर’ व्हायचे असेल तर आजच्या तरुणांनी उद्योजकतेची कास धरायला हवी. ज्या विषयात उद्योग सुरू करायचा आहे त्याचे संपूर्ण ज्ञान, हिंमत आणि पैशांचे योग्य नियोजन याच मार्गाने वाटचाल करणे गरजेचे आहे. कुठल्याही व्यवसायात सुरुवातीचा संघर्षाचा काळ येतोच, पण तो जर नेटाने पार केला तर यश आपलेच असते,” असे आपल्या संदेशात मर्दे यांनी सांगितले.