नवी दिल्ली : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या जैश - ए - मोहम्मद आणि तहरीक - ए - तालिबानचा अतिरेकी मोहम्मद नदीमला दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या सहारणपूर येथून अटक केली आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनानंतर मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. त्यातच नुपूर शर्मा यांची हत्या केली जाणार होती असा सगळं प्लॅन मोहम्मदच्या अटकेनंतर उघडकीस आला आहे.
मोहम्मदने त्याच्या चौकशीत या कटाची तसेच नुपूर शर्मा यांच्या हत्येची सुपारी जैश - ए - मोहम्मद आणि तेहरीक - ए - पाकिस्तान यांच्याकडून मिळाली होती असे कबूल केले आहे. मोहम्मद हा गेली चार वर्षे म्हणजे २०१८ पासून या दहशतवादी संघटनांचा सक्रिय कार्यकर्ता होता. त्याने दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षणही घेतले होते, असेही या तपासात उघड झाले आहे.
नुपूर शर्मा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल काढलेल्या उद्गारांमुळे त्या अनेक दहशतवादी संघटनांच्या रडारवर आल्या आहेत. नुपूर शर्माच नव्हेत तर त्यांचे समर्थन करणारेही दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात अमरावती येथील उमेश कोल्हे यांचीही हत्या नुपूर यांचे समर्थन केल्यामुळेच झाली होती. नदीमच्या अटकेनंतर या प्रकरणात अजूनही मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.