भारतीय स्त्रियांचा ‘वीकपॉईंट’ म्हणजे साडी. प्रत्येकीला नटायला आवडतेच. आजच्या फॅशनच्या युगातही स्त्रियांची पहिली पसंती असते ती साडीलाच. साड्यांच्या पारंपरिकतेला एक वेगळा साज देऊन आजच्या स्त्रीला आवडेल, अशा गोष्टींचा मिलाफ साधून ‘अनीक सारीज्’ हा ब्र्रॅण्ड नावारुपाला आणणार्या अनुजा काकतकर यांच्याविषयी...
अनुजा मूळच्या कर्नाटकमधील बेळगावच्या. तिथेच त्यांचे बालपण गेले. पुढे लग्नानंतर मुंबईला स्थायिक झाल्यानंतर घरातूनच त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. विशेषतः त्यांच्या पतींची म्हणजे अश्विनीकुमार यांची साथ होतीच. सुरुवातीला वर्षभर अनुजा यांनी साड्यांचा व्यवसाय केला, पण नंतर ‘ब्युटी सलोन’च्या व्यवसायात रुची निर्माण झाल्याने त्यांनी त्या व्यवसायात उडी घेतली. ‘ब्युटी स्पॉट’ नावाने त्यांनी स्वतःचा ब्रॅण्ड तयार करून २२ वर्षे या क्षेत्रातच व्यवसाय केला. तरी अनुजा यांचे साड्यांचे प्रेम कायम होतच. त्या त्यांच्या सलोनमध्ये कायम नवीन-नवीन साड्या नेसत असत. त्यावेळी त्यांच्या या पेहरावाबद्दल त्यांना त्यांच्या ग्राहकांकडून कायम पसंतीची पावती मिळत असे. यातूनच पुन्हा एकदा अनुजा यांच्या मनात आपण साड्यांच्या व्यवसायात काहीतरी पुन्हा एकदा करून बघावे, असा विचार आला. सुरुवातीला त्यांना थोडीशी भीती वाटत होती की, आता २२ वर्षांनंतर आपल्याला हे जमेल का? वगैरे प्रश्नही समोर होते. पण, इथेही घरच्यांचा पाठिंबा मिळाला आणि अनुजा यांनी आपल्या या साड्यांच्या व्यवसायाला पुन्हा एकदा सुरुवात केली.
आपल्या साड्यांच्या ब्रॅण्डचे नाव काहीतरी हटके आणि तितकेच पारंपरिकही असायला हवे, असा अनुजा यांचा आग्रह होता. त्यामुळे तशा नावाचा शोध चालू होता. यावेळी त्यांच्या मोठ्या सुनेने त्यांना ‘अनीक हे नाव सुचवले. अनीक हे गणपतीचे नाव. त्याचा संस्कृतातील अर्थही ‘ग्रेसफुल’ असाच आहे. त्यामुळे नवीन कामाच्या सुरुवातीला गणपतीचे आणि अनुजा यांच्या संकल्पनेत फीट बसणारे नाव त्यांना सापडले म्हणून हेच नाव कायम केले. याच नावाने अनुजा यांनी २०१९ साली आपला हा नवीन व्यवसाय सुरु केला. त्याच दरम्यान संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट घोंगावायला लागले होते. अनुजा यांचे त्यांच्या ‘ब्युटी सलोन’च्या व्यवसायामुळे आधीच चांगले नाव तयार झाले होते. त्यांच्या ग्राहकवर्गाशीही त्या चांगले संबंध ठेवून होत्या. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाच्या प्रारंभी त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागला नाही. त्यांच्या त्या ग्राहकवर्गातूनच त्यांना सुरुवातीचे ग्राहक मिळण्यास सुरुवात झाली. एकाकडून दुसर्याकडे, दुसर्याकडून तिसर्याकडे असे अनुजा यांच्या ब्रॅण्डची कीर्ती पसरत गेली आणि व्यवसाय वाढीस लागला.
ज्या वेळी अनुजा यांनी नवीन व्यवसायाला सुरुवात केली, त्यावेळी नुकताच कोरोना महामारीचा भारतात प्रवेश झाला होता. अचानक सर्व व्यवहार ठप्प झाल्याने आता पुढे काय, हा प्रश्न सर्वच व्यावसायिकांसमोर आ वासून उभा होता. ऑनलाईन व्यवसाय करायचा, पण तो नेमका कसा, ग्राहकांपर्यंत आपला माल नेमका कसा पोहोचवायचा, हे सर्वच छोट्या व्यावसायिकांपुढे आव्हान होते. यावेळी अनुजा यांच्या मदतीला त्यांचा या आधी ग्राहकवर्गाशी त्यांनी ठेवलेला संपर्क कामी आला. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या साड्यांचे फोटो ग्राहकांना पाठवायला सुरुवात केली. त्या फोटोज्मध्ये त्या एखाद् -दुसरा ‘सॅम्पल’ दाखवू शकायच्या, पण त्यामुळेही त्यांचे ग्राहक एवढे प्रभावित व्हायचे की, जेव्हा ते प्रत्यक्ष साडी विकत घ्यायला यायचे, तेव्हा एका साडीऐवजी चार चार साड्या खरेदी करायचे. अशाच पद्धतीने अनुजा यांचा व्यवसाय क्रमाक्रमाने वाढत गेला. त्यातूनच पुढे अनुजा यांनी ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात त्यांचा स्वतःचा ‘स्टुडिओ’ उभारला.
अनुजा यांचा हा ‘स्टुडिओ’ तसा अगदी वैशिष्ट्यपूर्ण. अगदी पारंपरिक ‘इंटेरिअर’ त्यांनी ठेवले आहे. ‘रिटेल शॉप’ असल्याने त्यांचे कुठेही ‘मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ नाही. अनुजा यांनी त्यांच्या त्या ‘स्टुडिओ’ची रचनाच इतकी सुरेख केलेली आहे की, तिथे आलेल्या ग्राहकाला आत दुकानात जावेसेच वाटते. कित्येकदा त्या रस्त्याने कुठल्यातरी वेगळ्याच कामासाठी जाणारा ग्राहकही आत येऊन साडी विकत घेऊन गेलाय, असे असंख्य अनुभव अनुजा यांच्याकडे आहेत. अनुजा यांचा कायम कटाक्ष हाच राहिला आहे की, जे दुसरीकडे मिळणार नाही ते आपल्याकडे मिळाले पाहिजे. त्यामुळे साड्यांचे कापड, त्यांवरील कलाकुसर या सर्व गोष्टींकडे त्या अगदी जातीने लक्ष घालतात आणि आपली कलादृष्टी कायम जपत राहतात, हेच अनुजा यांचे वैशिष्ट्य. आजकालच्या ऑनलाईनच्या जमान्यात ग्राहकांना सर्वच गोष्टी अगदी घरबसल्या मिळवण्याची सवय लागली आहे.
अनेक ऑनलाईन बिझनेस पोर्टल्समुळे ग्राहकांना सर्वच गोष्टी अगदी घरबसल्या उपलब्ध होतात. परंतु, या सर्वच गोष्टींमध्ये बर्याचदा ग्राहकांची फसवणूक होण्याचीही शक्यता असते. बर्याचदा आपल्याला अशा तक्रारी ऐकायला मिळतात की, अमुक अमुक प्रकारचे आणि ब्रॅण्डचे कपडे आम्ही मागवले, पण आमची फसवणूक झाली. यावर उपाय म्हणून अनुजा यांचे यावरचे मत असे आहे की, “जरी सर्व ऑनलाईन उपलब्ध आहे, सर्वच तुम्हाला घरबसल्या मिळत आहे, तरीही तुम्ही स्वतः येऊन खरेदी करण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण, जोपर्यंत तुम्ही स्वतः येऊन आपल्याला हवा असलेला कपडा बघत नाही, त्याची निवड स्वतः जातीने करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची खरी ओळख पटणार नाही. त्यामुळे या ऑनलाईनच्या जमान्यातही आपल्याला स्वतः दुकानात येऊन खरेदी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे आपल्या या व्यवसायात पारंपरिकता आणि आधुनिकता यांचे मिश्रण असण्याची गरज आहे,” असेच अनुजा सांगतात.
“या संपूर्ण प्रवासात आपल्या कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा लाभला, हे आपले भाग्य आहे,” असेच अनुजा सांगतात. त्यांच्या आधीच्या ‘सलोन’च्या तसेच या साड्यांच्या, अशा दोन्ही व्यवसायांत अनुजा यांना त्यांच्या कुटुंबाचे सहकार्य खूप मिळाले. त्यांच्या पतींनीही त्यांना सक्रिय मदत केली. जेव्हा साड्यांचा व्यवसाय त्या सुरु करत होत्या, तेव्हा त्यांच्या मनात धाकधूक होती, पण त्यांच्या पतींनी आणि मुलांनी त्यांचा उत्साह वाढवला. त्यांच्या नाव संशोधनातही त्यांच्या सुनांनी मदत केली. त्यामुळे आपल्या व्यवसायातील प्रगतीचे आणि यशाचे सर्व श्रेय हे आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यालाच आहे, असे अनुजा अभिमानाने सांगतात. “प्रत्येक स्त्रीने आपल्या अंगातील सुप्त गुणांना, क्षमतांना कायम वाव कसा मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. मुळात धाडस केले पाहिजे, स्वतःच्या संकल्पांनवर विश्वास ठेवला पाहिजे. कुठलाही व्यवसाय हा आर्थिक नियोजनाशिवाय मोठा होऊच शकत नाही. त्यामुळे कुठल्याही स्त्रीने आपला व्यवसाय उभा करत असताना, या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवल्याच पाहिजेत,” असा प्रेमाचा सल्ला अनुजा नव उद्योजक स्त्रियांना देतात.
पारंपरिक व्यवसायात आपल्या कल्पकतेने बदल करत स्वतःचा ठसा उमटविणार्या अनुजा यांचा प्रवास अत्यंत वाखाणण्याजोगा आहे.
- हर्षद वैद्य