आर्जवी, सत्यवादी विवेकी भक्त

    10-Aug-2022
Total Views |
 
ramdas
 
 
परमात्म स्वरूपाचे चिंतन आणि अध्यात्मतत्वांचे चिंतन-मनन करणे खर्‍या भक्ताला आवडते. त्यात आपल्याला आत्मोद्धाराचा मार्ग सापडेल, याची भक्ताला खात्री असल्याने इतर गोष्टीत तो आपला वेळ फुकट घालवीत नाही. भक्त सर्वाथाने भगवंताचा झाला असल्याने त्याच्या ठिकाणी गर्व, ताठा, ज्ञानाचा वृथा अभिमान निर्माण होत नाही. आपण मिळविलेले ज्ञान, आत्मसात केलेले गुण आपल्या उद्धारासाठी आहेत, लोकांना दाखवण्यासाठी नाहीत, हे तो भक्त जाणत असतो. आपल्या ज्ञानाचे किंवा गुणांचे प्रदर्शन मांडून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे, असा विचार तो कधी करीत नाही. तथापि जी माणसे अर्धवट ज्ञानाने हुरळून जातात, त्यांच्या ठिकाणी शाब्दिक ज्ञानाचा अहंकार निर्माण होतो. त्यात स्वानुभावाचा लेश नसतो. ‘शाब्दिक पांडित्य म्हणजेच ज्ञान’ असा समज झाल्याने ही माणसेे त्याचाच अहंकार बाळगून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. खरा ज्ञानी पुरूष या फसव्या शब्दपांडित्याला किंमत देत नाही. आपली नम्र सुवाचा तो सोडत नाही. याचा अर्थ तो हीनदीनपणे वागतो, असा नव्हे. त्या भक्ताने खरे ज्ञान जाणले असल्याने, सारासार विवेकाने केव्हा कसे वागायचे, याचे ज्ञान त्याला प्राप्त झालेले असते. तो भावनेच्या आहारी जात नाही. त्यामुळे तो भक्त इतरांना आवडू लागतो. अशा या भक्ताचे वर्णन समर्थ पुढील श्लोकात करीत आहेत-
 
सदा आर्जवी तो प्रीय सर्वलोकीं।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी।
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
 
परमार्थविषयक अभ्यासात ज्ञानीपणाचा आव आणणे उपयोगी पडत नाही. त्याने नुकसानच होते. कारण, त्यातील आवश्यक गुणविषयक आचरणात आणायचे असतात. भक्ताला ते आत्मसातकरायचे असतात. ते गुणविशेष स्वामींनी वरील श्लोकात सांगितले आहेत. हा ज्ञानीभक्त सदा आर्जवी असतो. म्हणजे तो भक्त नेहमी मृदू शब्दांनी बोलणारा आणि अंत:करणपूर्वक कळकळीने वागणारा असतो. लोकांच्या भल्याची त्याला काळजी असते. परंतु, शब्दज्ञानाचे प्रदर्शन करीत तो लोकांना उपदेशाचे डोस पाजत नाही. कोणी काही विचारले, तर विचारणार्‍याचे मन न दुखवता तो भक्त श्रोत्याचे शंकानिवारण करतो. असा हा आर्जवी स्वभावाचा भक्त विवेकी आणि सत्यवादी आहे, जे सत्य तेच तो आपल्याला सांगेल, चुकीचे सांगून तो आपली दिशाभूल करणार नाही, हा भक्त सत्यवादी असल्याने तो कोणाला फसवणार नाही. तसे तो कोणाकडून फसवलाही जाणार जाणार नाही. आपल्या सत्यप्रिय भाषणाने आणि नम्रवाणीने त्याला जनप्रियत्व मिळालेले असते. हे जनप्रियत्व त्या भक्ताला अंगच्या गुणांनी प्राप्त झालेले असते. लोकप्रियता टिकून राहावी म्हणून हा भक्त स्वार्थी हेतूने कुणाचीही स्तुती करीत नाही. त्याचे बोलणे सत्याचे व हिताचे असते, हे त्याच्या लोकप्रियतेचे रहस्य होय. जिथे अर्थबुद्धी असते, तेथे खोटेपणाला संधी मिळते. ज्याला स्वार्थ साधायचा असतो, त्याला खर्‍याखोट्याचा विधिनिषेध राहत नाही, या कारणाने खर्‍या भक्ताच्या तोंडून कधीही खोटे बाहेर पडत नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे, या भक्ताने भगवंताच्या गुणांना आपल्या अंत:करणात स्थान दिलेले असते. जो भगवंताला प्राप्त करून घेण्याचा अभ्यास करीत आहे, त्याच्या मनात असत्याला, खोटेपणाला वाव नसतो. भक्ताच्या मनात सदैव भगवंताचे ध्यान व विवेक जागृत असल्याने त्याच्या तोंडून गैर आणि विसंगत खोटी विधाने बाहेर पडत नाहीत. सत्यभाषण हा भक्ताचा सहजस्वभाव बनतो. समर्थ त्याचा उल्लेख ‘न बोले मिथ्य त्रिवाचा’ अशा शब्दप्रयोगांनी करतात. ठिकाणी ‘त्रिवाचा’ याचा अर्थ भक्ताच्या ठिकाणी खोटेपणा पूर्वी नव्हता, आता नाही आणि भविष्यातही असणार नाही, असा घेता येतो. सत्यत्व हा त्याचा स्वायीभाव असतो. असा भक्त खरोखर धन्य होय.
 
भक्ताचा भगवंताविषयी दृढविश्वास असतो. विश्वासाची ही अढळ अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी भक्ताला परमार्थतत्त्वांचा अभ्यास चिकाटीने करावा लागतो. तो किती वर्षे करावा याला मर्यादा नाही. व्यवहारात ‘एसएससी’ व्हायचे, तर दहा वर्षे अभ्यास करावा लागतो. पदवी संपादन करायची, तर आणखी चार वर्षें किंवा सहा वर्षे अभ्यास करावा लागतो. तथापि पारमार्थिक यशासाठी संयम तत्त्वे विवेकविचार इत्यादींचा सूक्ष्म अभ्यास किती वर्षे करावा, हे कुठे सांगितले नाही. आपल्याकडे असा समज आहे की, भगवंतासाठी परमार्थ साधना विवेकाचा अभ्यास ज्येष्ठ नागरिक झाल्यावर करायचा असतोे. हा फार मोठा गैरसमज आहे. समर्थांसारख्या महानविचारवंतांचे मत असे आहे की, आपल्याला समज येऊ लागल्यावर म्हणजे तरुण काळात या अभ्यासाला सुरूवात करावी. समर्थाच्या पुढील श्लोकातून हाच आशय व्यक्त होतो.
 
सदा सेवि आरण्य तारूण्यकाळी
मिळेना कदा कल्पनेचेनि गेळी।
चळेना मनी निश्चियो दृढ ज्याचा
जगी धन्य ते दास सर्वोत्तमाचा॥
 
तो भाग सविस्तरपणे पुुढील लेखात पाहता येईल. (क्रमशः)
 
 - सुरेश जाखडी