बालतस्करी से आझादी...

    10-Aug-2022
Total Views |
police

 
 
 
 
 
 
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘बाल तस्करी से आझादी...` हे अभियान राबविण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये या अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी लाभली. त्याबद्दलचा अनुभव येथे मांडत आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या अध्यक्षतेखाली ‘बाल तस्करी से आझादी...` हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण भारतातील 75 जिल्ह्यांत हे अभियान राबविले जात आहे. उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्वांचलमधील जिल्ह्यातील गावांचा यात समावेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या ‘बाल तस्करी से आझादी` या अभियानाची जबाबदारी पार पाडताना मला खूप काही अनुभव आणि शिकायला मिळाले आहे. उत्तर प्रदेशमधून अनेक मुले ‘समतोल फाऊंडेशन`च्या संपर्कात येत असतात. यातील अनुभव, प्रत्यक्ष काम, प्रशासनाला मार्गदर्शन, बाल कल्याण, पोलीस पथक व इतर सर्व बालकांशी संबंधित अधिकारी यांना प्रशिक्षण म्हणून कार्यशाळा सुरू झालेल्या आहेत. सात जिल्ह्यांत कार्यशाळा दि. १ ऑगस्ट ते दि. ७ ऑगस्टपर्यंत आहेत. समाज बालप्रेमी करून बालव्यापार थांबला पाहिजे, हे मुख्य उद्दिष्ट यात असेल.
 
उत्तर प्रदेशमध्ये अनेक जिल्ह्यांच्या सीमारेषा नेपाळला लागून आहेत. त्यामुळे जंगल, नद्या, नैसर्गिक साधनसंपत्ती जरी खूप असली तरी ती धोकादायकसुद्धा आहे. ज्यामध्ये बहराईच, श्रावस्ती, कुशीनगर लखीमपुरी, पिलबीत, बलरामपुरी, गाझियाबाद अशा जिल्ह्याचा समावेश आहे. थोडे मागासलेले, अशिक्षित, बेरोजगार असलेले या जिल्ह्यांत खूप समस्या तर आहेच, शिवाय याच जिल्ह्यातील बालकांची तस्करी ही समस्या जास्त प्रमाणात आहे. मुंबई/ठाणे यांसारख्या शहरांमध्ये मुले वेगवेगळ्या कारणांनी मोठ्या प्रमाणावर येतात. कारणे वेगळी असली, तरी ‘ट्रॅफिकिंग` होते. ‘समतोल फाऊंडेशन` गेली 18 वर्षे या विषयावर सातत्याने काम करते. २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य बाल आयोगावर सदस्य म्हणून पदाधिकारी असताना बालकांचे प्रश्न आणि समस्या यांचे विश्व किती भयाण आहे, याची खोलवर जाणीव झाली. आपला देश अमृत महोत्सवी वाटचाल करीत आहे. खरंतर देशाची प्रगती झाली आहे का? देश विकसनशील होत आहे का? देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय अनेक गोष्टी सक्षम आहेत का? एवढेच नव्हे, तर वैज्ञानिक, वैद्यकीय, वैचारिक विकास कसा आहे, याबाबतीत
 
अनेक विचारवंत आता चर्चा करतील. त्याची सुरुवातसुद्धा झाली आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये समस्येवर बोलताना अनेक गोष्टी पुढे येतील. परंतु, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्यांना आपण देशाचे भविष्य म्हणून बघतो, त्या लहान मुलांच्या समस्येवर बोलताना जास्त महत्त्वाचे वाटते. भूक, आजारपण, अशिक्षितपणा, बालमजुरी, तस्करी, स्थलांतर, व्यापार, नशेच्या सवयी असे अनेक विषय आजही मुलांच्या बाबतीत संपलेले दिसत नाही. केंद्रातील भाजप सरकार त्यातही पंतप्रधान मोदींच्या विशेष प्रयत्नांनी बालकांसाठी विविध योजना अस्तितवात आल्या. मात्र, त्या योजना प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरल्या, तरच ते फायदेशीर ठरेल. अन्यथा फक्त योजना येतात आणि जातात, एवढेच होईल. काही राज्यात यावर प्रत्यक्ष कृती सुरू झाली आहे. मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल राष्ट्रीय बाल आयोग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो. मी माझा अनुभव पणाला लावून ‘बाल तस्करी से आझादी...`हे अभियान यशस्वी करेन, अशी खात्री देतो.