धनगर वंजारी एकीचा नारा बुलंद करणार !

इतिहासाची पुनरावृत्ती होणारच - आ. गोपीचंद पडळकर

    01-Aug-2022   
Total Views |
 
Gopichand Padalkar MLC
 
 
 
मुंबई : 'परळी वैद्यनाथ ही क्रांतीची आणि क्रांतीवीरांची भूमि आहे. इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या धनगर आणि वंजारी समाजातील अनेक विरपुरुषांना जाणीवपूर्वकरित्या पुढे आणले गेले नाही. त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांचे कर्तृत्व जगासमोर आणण्यासाठी येत्या काळात धनगर आणि वंजारी एकीचा नारा बुलंद करणार,' अशी घोषणा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. नुकतेच त्यांनी परळीच्या गोपीनाथगड येथील स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले, तेव्हा ते बोलत होते.
 
 
आ. पडळकर म्हणाले की, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संतश्रेष्ठ भगवान बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाने उजळून निघालेल्या या परळीच्या भूमीला क्रांतिवीरांच्या लढाईचा मोठा इतिहास आहे. ही भूमि एका क्रांतीविराच्या लढ्याची साक्षी आहे. इंग्रज निजाम या दोन्ही शत्रुंना एकत्र लोळवणाऱ्या धर्माजी मुंडे नाईकांची शौर्यकथा ग्रामस्थ जाणतात पण ती राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर शालेय पाठ्यपुस्तकांचा आणि संशोधनाचा विषय होऊ शकला नाही, कारण प्रस्थापितांच्या मनात या समाजाविषयी अजूनही दहशत आहे.
 
 
इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही
एकाच वेळी निजामाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या रामोशी, कोळी, वंजारी, धनगर, भिल्लांच्या मराठवाडा मुक्तीसंग्रामातील योगदानाचा उल्लेख टाळला जातो. या सर्व जातींनी खास करुन वंजारी-धनगरांनी एकत्र लढा दिला. नवसाजी नाईक आणि धर्माजी नाईक एकत्र लढले हे जर वंजारी धनगरांना कळलं तर वर्तमानात सुद्धा हे लोक एकत्र लढतील आणि त्यातून इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही पडळकरांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
मागण्या मान्य करवून घेऊ
पडळकर म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात आपले सरकार आहे. माझे वंजारी बांधव राजकीय प्रगल्भ आहेत. धनगर सध्या राजकीय हिस्सेदारी मागत आहेत. प्रस्थापितांचा जुलमाला गाडायचे असेल तर आपण सोबत येऊ आणि आपण सोबत आलो की इतिहास घडतो याची साक्ष इतिहास पानापानावर देतो. त्याची पुनरावृत्ती नक्कीच होईल. नवसाजी नाईकांनी पैनगंगा भागात आपलं राजं चालवलं. या नदीवरच्या ईसापूर धरणाला 'आद्यक्रांतीवीर नवसाजीराजे नाईक' नाव द्यावं आणि वंजारी विरांच्या सन्मानासाठी परळी अहिल्यानगर एक्सप्रेसला 'धर्माजीराजे मुंडे एक्सप्रेस' नाव मिळावं. ही मागणी आता मान्य करवून घेऊ.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.