जागतिक वारसास्थळातील आठव्या मानांकनात स्थित असलेल्या पश्चिम घाट आणि त्यात प्रदेशनिष्ठ असलेल्या जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जतन करण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, याच जबाबदारीची जाणीव करून देणारा हा लेख...
डामार्ग तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांचा आढावा घेऊन त्यावरील प्रमुख समस्यांचा अभ्यास करून पर्यटनासाठी प्रचलित असलेली ठिकाणे श्रीक्षेत्र नागनाथ मंदिर तेरवण मेढे, तिलारी प्रकल्प दर्शन स्थळ, उन्नेई बंधारा तेरवण-मेढे, तिलारी राखीव संवर्धन, तिलारी घाट परिसर आणि ‘वर्षा’ पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली धबधबा अशी अनेक अज्ञात पर्यटनस्थळे असून त्यांचा उपयोग आपण शाश्वत पर्यटनासाठी करून रोजगार निर्मितीचे उन्नत साधन स्थानिकांना उपलब्ध करून शेतीबरोबरच एक उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करू शकतो.
सामाजिक भान आणि निसर्गाप्रति असणारी आसक्ती सर्वसामान्यांच्या हृदयात निर्माण व्हावी, यासाठी ‘वनश्री फाऊंडेशन, सिंधुदुर्ग’ केंद्रस्थानी ठेवून जिल्हा पोलीस दल, ग्रामपंचायत गोक्रल, ग्रामपंचायत मांगेली यांच्या सहकार्याने वर्षा पर्यटनासाठी आंबोली पाठोपाठ गोवा, कर्नाटक भागातील पर्यटकांसाठी ओढ लागलेले ठिकाण मांगेली धबधबा या ठिकाणी होणारे बेशिस्त पर्यटन, हुल्लडबाज मनोवृत्ती आणि विकृत मानसिकता त्यांच्या विरोधात तहसीलदार दोडामार्ग, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे दोडामार्ग यांच्याशी आलेल्या चर्चेचे फलित म्हणून रविवार, दि. 24 जुलै रोजी ‘भारतीय वनसंवर्धन दिन’च्या निमित्ताने पर्यटकांनी सामाजिक भान राखत जैवविविधतेच्या नीतिमूल्यांचा विचार करून शाश्वत जीवनशैलीवर आधारित पर्यटनासंबंधी पर्यटकांना कुठचाही त्रास न देता केवळ शांततेच्या मार्गाने ’वनश्री फाऊंडेशन, सिंधुदुर्ग’ जनजागृती मोहीम केली.
सदर मोहिमेत जनजागृती सूचना फलक ग्रामपंचायत खोक्रल व मांगेली येथे लावण्यात आले, तेथील अन्नपुरवठा करणारे स्थानिक व्यवसायिकांना कचरा संकलन व निर्मूलन यासाठी मार्गदर्शन केले. परंतु, पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छतेवर व कचरा संकलनावर काहीच उपाययोजना नाहीत.
कचरा निर्मूलनाच्या सर्व उपायोजना येथे फोल ठरत असल्याचे सरपंच विश्वनाथ गवस यांचे म्हणणे होते. परंतु, काहीही झाले तरी ‘सिंगल युज प्लास्टिक’, प्लास्टिक बाटल्या, अॅल्युमिनियम टीन, काचेच्या बाटल्या हे घटक अविघटनशील असून हे समाजाच्या आणि निसर्गाचा र्हास होण्यास कारणीभूत ठरतील, यासाठी वेळीच यावर उपाययोजना करावी, असे सूचित केले. व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कचरा संकलनासाठी स्वतः उपाययोजना करणे गरजेचे असून त्यांची स्वतःची नैतिक जबाबदारी ओळखावी व कचरानिर्मूलन करण्याची विनंती केली.
शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दोडामार्ग पोलीस ठाणे यांच्याकडून विशेष सहकार्य व पुरेसे पोलीस दल उपलब्ध करून दिल्याने पर्यटकांच्या बेशिस्तीला मात्र लगाम बसला, सकाळी १० वाजता स्वतः पोलीस निरीक्षण ऋषिकेश अधिकारी यांनी आपल्या विशेष टीम सह खोक्रल ते मांगेली धबधब्यादरम्यान कडक बंदोबस्त करत प्रशासनाचा वचक बसवला. धिंगाणा घालून हुल्लडबाजी करून तसेच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणार्यावर तसेच बेकायदेशीर बाबीवर वचक बसवला, एकंदरीत जनजागृतीची संकल्पना ‘वनश्री फाऊंडेशन, सिंधुदुर्ग’च्या माध्यमातून जैवविविधता संवर्धन व संरक्षणाचा छताखाली जनजागृती व कचरा निर्मूलन मोहिमेच्या निमित्ताने सार्थकी लागली.
प्रशासनाच्या जोडीला ग्रामपंचायत खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, ग्रामस्थ व मित्रमंडळ तसेच मांगेली ग्रामपंचायत सरपंच विश्वनाथ गवस, ग्रामस्थ तसेच खोक्रल गावातील शालेय मुलांनी कचरामुक्त मोहिमेसाठी विशेष योगदान दिले.
निसर्गाची नीतिमूल्य जोपासून शाश्वत पर्यटनावर भर दिला, तरच स्थानिक लोकांना त्याचा फायदा होईल, नाहीतर नियोजनशून्य पर्यटन व्यवसाय डोईजड होईल. सामाजिक बांधिलकी राखून शेती व्यवसायाला जोड म्हणून पर्यटन व्यवसाय निर्माण होण्याची गरज आहे. पर्यटकांनी समाजाचे नीतिमूल्ये पायदळी तुडवून बेशिस्त वागणूक करून जैवविविधतेचा र्हास करून शाश्वत पर्यटनाची संकल्पना बदलू नये, स्वतःचा आनंद उपभोगताना दुसर्याला नाहक त्रास होऊ नये, याचेही भान ठेवावे.
मांगेली धबधबा पर्यटनस्थळ हे दोडामार्ग तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण वर्षा पर्यटन म्हणून प्रसिद्ध असून प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे म्हणून शासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे. ग्रामपंचायत क्षेत्रातील तुटपुंज्या सुविधा तसेच स्वच्छतेबाबत कुठचेही नियोजन असणे, हे खेदजनक असून यावर त्वरित उपाययोजना झाली नाही, तर पर्यावरणाबरोबरच समाजासाठी भरपूर हानिकारक आहे यासाठी ग्रामपंचायत मांगेली यांनी वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन घेऊन सुविधांची पूर्तता केली, तरच पर्यटकांवर प्रभाव पडू शकेल.
तिलारी धरण क्षेत्र, उन्नयी बंधारा तेरवण-मेढे, तिलारी राखीव संवर्धन ही पर्यटनस्थळे केवळ संबंधित यंत्रणेच्या तसेच शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओस पडलेली असून प्रदूषणाच्या विळख्यात आहेत, यावरही शास पर्यावरण संतुलन बिघडण्यास संबंधित यंत्रणा तसेच शासन जबाबदार असेल व तेच जैवविविधतेचा र्हास करण्यास कारणीभूत ठरतील.
-संजय सावंत
वनश्री फाऊंडेशन, सिंधुदुर्ग.