
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर खुनी हल्ला झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे सगळे जग शोकाकुल झाले आहे. या पाश्वर्र्भूमीवर कोरोना फेम चीनमध्ये काय दृश्य आहेत? तर, चीनच्या ‘विबो’ या समाजमाध्यमांवर चिनी नागरिक शिंजो आबेंच्या मृत्यूवर चक्क आनंद व्यक्त करत आहेत. ते एकमेकांचे अभिनंदन करून संदेश लिहित आहेत की, “आज आम्ही एक प्लेट जास्त भात खाऊ.” तर काही चिन्यांनी मत व्यक्त केले आहे की, जे शिंजो आबेंबरोबर झाले, तेच जपानच्या विद्यमान पंतप्रधान तसेच दक्षिण कोरियांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत सुद्धा होऊ शकते. असे का? तर याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. चीन आणि जपान एकमेकांचे सख्खे शेजारी आणि तितकेच पारंपरिक शत्रू. जपान आणि चीनच्या युद्धाबरोबरच ‘तनाका स्मरणपत्र’ हे जपान आणि चीनच्या शत्रुत्वाचेही एक कारण. १९२७ साली ई. में बैरन तनाका जपानचे पंतप्रधान झाले. जपानला जागतिक महाशक्ती बनवावे, अशी तनाकांची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी त्यांनी एक गुप्त संमेलन घेतले. या संमेलनाचा निष्कर्ष म्हणून एक स्मरणपत्रिका तयार करण्यात आली. या स्मरणपत्रिकेलाच ‘तनाका स्मरणपत्र’ म्हणतात. या स्मरणपत्रिकेत म्हंटले होते की ”जपानला जर खरेच विकास करायचा असेल, तर सगळ्यात आधी चीनवर कसाही कब्जा करायला हवा,” तर हे ‘तनाका स्मरणपत्र’ आजही जपान्यांसाठी श्रद्धेचा विषय आहे. जेरूसलेम वसवणे जसे ज्यूंचे स्वप्न, तसे ‘तनाका स्मरणपत्रा’ची पूर्तता करणे जपान्यांची श्रद्धा. यानुसार चीन जपानमध्ये पारंपरिक शत्रुत्व आहे. त्यामुळेच सख्खे शेजारी असलेल्या चीनला जपानने कधीही भीक घातली नाही.
असो. चिनी ड्रॅगनची आजूबाजूच्या देशांवर असलेली आक्रमणकारी नजर तर अगदी जगजाहीर. चीनच्या या कृतीबद्दल शिंजो आबेंनी नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली. दि. १ डिसेंबर, २०२१ रोजी तैपेई येथे बुद्धिजीवींसमोर त्यांनी मत व्यक्त केले की,”चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीने चुकीच्या मार्गावर जाऊ नये, म्हणून जगाने प्रयत्नशील असले पाहिजे. चिनी कम्युनिस्ट पार्टीने सैन्याचे दु:साहस हे जगाच्या दृष्टीने आर्थिक आत्महत्येसारखे असेल.” दि. २३ एप्रिल रोजी ‘लॉस एंजेलिस टाईम्स’मध्ये अमेरिकेला उद्देशून शिंजो आबे यांनी लेख लिहिला. त्या लेखात त्यांनी लिहिले की, ”चीनमुळे तैवानची परिस्थितीही युक्रेनसारखी आहे. आता वेळ आली आहे की, अमेरिकेने तैवानच्या सुरक्षिततेसाठी स्पष्ट भूमिका घ्यावी.” शिंजो आबे यांच्या या लेखामुळे चीनचा तीळपापड झाला. याच काळात कोरोनामुळे चीनची नाचक्की झाली होती. दुसरीकडे मदतीचा हात दाखवून छोट्या देशांना अस्थिर करण्याचे काम चीन करत होता. चीनच्या या विकृत विस्तारवादालाशिंजो आबे यांनी जगापुढे उघडे केले. चीनला कवडीचीही किंमत न देणारे शिंजो आबे भारताशी त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आंतरराष्ट्रीय राजकारणापलीकडची मैत्री ठेवून होते. त्यातूनच भारत आणि जपान या दोन देशांमध्ये अणुऊर्जा, समुद्री सुरक्षा, बुलेट ट्रेन, ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’आणि इंडो-पॅसिफिक रणनीति अशा अनेक मुद्द्यांवर सामंजस्य करार झाला.
जपानची ‘सेल्फ-डिफेन्स फोर्स’ आणि भारताचे सशस्त्र बल यांच्यामध्ये परस्पर आदानप्रदान सामंजस्य करारही झाला. वाराणसी येथील ‘रूद्राक्ष’ प्रकल्पासाठी ‘जपान इंटरनेशन कोऑपरेशन एजन्सी’ने फंडिंग केले. भारतातबुलेट ट्रेन व्यवस्थेसाठी शिंजो आबे यांनी जपानी प्रशासनातर्फे ८८ हजार कोटी रुपये ०.१ प्रतिशत व्याज दराने द्यायचा निर्णयही घेतला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, प्रशांत महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाशीमुकाबला करण्यासाठी भारताला सहकार्य करण्याबाबत शिंजो आबे यांनी सहमती दर्शवली. तसेच चीनला भारत आणि जपानही मैत्री खटकत होती. भारताच्या शेजारी राष्ट्रांना भारताविरोधात भडकवणे, भारताला अस्थिर करणे असल्या कामात चीन मग्न होता. मात्र,शिंजो आबे यांनी चीनच्या या प्रयत्नाला खीळ घातला. यामुळे चीन आणि चिनी कायमच शिंजो आबे यांना आपला शत्रू मानत राहिले. शिंजो आबेंच्या निधनामुळे चिन्यांना विकृत आनंद झाला आहे. शिंजो आबे यांच्या खुन्याला पकडले आहे. त्याने खुनाचे थातूरमातूर कारण दिले आहे. पण, चीनची कुटीलता आणि विकृतपणा पाहता, या खुनाचे धागेदोरे कुठपर्यंत जोडले जातील, हे येणारा काळच सांगेल.