विठ्ठल : एक महासमन्वय

    09-Jul-2022   
Total Views |

aashadhee 
 
 
 
आज आषाढी एकादशी. ‘विठ्ठल...विठ्ठल’ या संकीर्तनात अवघा महाराष्ट्र दुमदुमून जातो. या विठूमाऊलीविषयी, तिच्या भक्तप्रेमाविषयी अनेक कथा आपण ऐकतो. परंतु, मुळात ही देवता कशी निर्माण झाली, तिचा विकास कसा झाला याची अधिकृत माहिती बहुतेकांना नसते. विविध पंथांचा समन्वय अशा या विठ्ठल देवतेमध्ये दिसतो. त्यामुळे रा. चिं. ढेरे जेव्हा विठ्ठलाला ‘महासमन्वय’ म्हणतात, ते यथार्थच. विठ्ठलावर अनेक संशोधकांनी संशोधन केलेले आहे. तेव्हा, आजच्या या लेखातून विठ्ठलाच्या आध्यात्मिक आणि तात्त्विक अभ्यासाची केलेली ही मांडणी...
 
 
मुळात ‘विठ्ठल’ या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती मिळालेली नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘विठ्ठल’ हा शब्द ‘विष्ठल’ म्हणजे ‘दूर रानावनात असलेली जागा’ या शब्दापासून निर्माण झाला आहे, असे म्हटले आहे. या व्युत्पत्तीनुसार विठ्ठलदेव हा दूर, रानावनात असणारा देव ठरतो. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मते, ‘विष्णू’ या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप ‘विट्टि’ असे होते आणि ‘विट्टि’ वरूनच ‘विठ्ठल’ हे रूप तयार झाले. ‘शब्दमणिदर्पणा’च्या अपभ्रंश प्रकरणातील ३२व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित यांनी विष्णूचे ‘विट्टू’ असे रूप कसे होते, हे दाखवले आहे. या रूपालाच प्रेमाने ‘ल’ हा प्रत्यय लावला की, ‘विठ्ठल’ असे रूप तयार होते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. संस्कृतच्या अंगाने बघितले, तर विदा (ज्ञानेन), ठीन् (अज्ञजनान्), लाति (गृह्णाति) म्हणजे ‘अज्ञ जनांना ज्ञानाने स्वीकारणारा, तो विठ्ठल’ अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते. या व्युत्पत्तीतील ‘विठ्ठल’ या नावातील प्रत्येक अक्षराला तात्त्विक अर्थ प्राप्त करून देण्यात आलेला आहे. ‘विदि (ज्ञाने) स्थलः (स्थिरः)’ ‘म्हणजे जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल’, अशी एक व्युत्पत्ती वि. कृ. श्रोत्रिय यांनी दिली आहे. ‘इटु‘, ‘इठु‘, ‘इटुबा’, ‘इठुबा’ ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतील नामोच्चारणे आहेत आणि विठ्ठलाचे रूप कमरेवर हात ठेवलेले, असे आहे. श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे यांनी ‘इटु’ असा शब्द तामिळ भाषेत असून त्याचा अर्थ ‘कमरेवर हात ठेवलेला’ असा असल्याते प्रतिपादन केले आहे. ‘विटेवर जो उभा, तो विठ्ठल’अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते.
 
 
विठ्ठल ही एक वैष्णव दैवता मानली जाते. विठ्ठल हे उपास्य दैवत असलेला वारकरी संप्रदाय हा भागवत धर्मातच अंतर्भूत होतो. विठ्ठलाच्या भोवती वैदिकतेचे वलयही आहे. वारकरी संप्रदायाचे एक थोर प्रचारक कीर्तनकार शं. वा. ऊर्फ सोनोपंत दांडेकर म्हणतात, “हा पंथ पूर्ण वैदिक आहे. किंबहुना, सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी ही एक शाखा आहे, असे म्हटले तरी चालेल.” या पंथांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याकरिता ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की, याचे तत्त्वज्ञान वैदिक आहे. या पंथास ‘भागवत धर्म’ ही म्हणतात. कारण, याचे उपास्य दैवत हे श्रीकृष्णाचे बालस्वरूप समजले जाते. असे असले, तरी विठोबाच्या निर्देश श्रुतिस्मृतिपुराणांत आढळत नाही. विष्णूच्या सहस्रनामांतही विठ्ठलाचे नाव नाही. विष्णूचे जे २४ अवतार पुराणांनी सांगितले आहेत, त्यातही विठ्ठलाचा उल्लेख दिसत नाहीच.
 
 
अकराव्या-बाराव्या शतकापासून विठ्ठलाला फार मोठी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. ही प्रतिष्ठा हा एक विकसनप्रक्रियेचा परिपाक असून विठ्ठलाचे मूळ रूप कोणत्या तरी लोकदेवतेचे असले पाहिजे, असे अनेक अभ्यासकांना दीर्घकाळ वाटत आले. त्या दिशेने काही संशोधनही झाले. विठ्ठलाच्या मूर्तीचे ‘कटिवर कर’ हे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या मूर्ती महाराष्ट्रात-कर्नाटकातील अनेक गावांत आढळतात.
 
 
विठ्ठल ही मूळ एक लोकदेवता असली, तरी अन्य अनेक लोकदेवतांप्रमाणे त्याची कीर्ती मर्यादित न राहता ती सतत वाढत गेली. आजवर बहुतांशी लोकदेवतांना शास्त्र साहित्यात स्थान दिलेले आढळत नाही. परंतु, विठ्ठलाच्या बाबतीत असे नाही. पंढरपूरची स्थळपुराणे प्रसिद्ध असलेल्या तीन संस्कृत पांडुरंगमाहात्म्यांची रचना हा विठ्ठलाच्या उदात्तीकरण प्रक्रियेचाच एक महत्त्वाचा भाग होय, असे रा. चिं. ढेरे म्हणतात. ही माहात्म्ये रचताना अनेक लोककथांना पुराणकथांचे रूप देण्यात आले आहे.
श्रीज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे आणि चांगदेवपासष्टीचे संस्कृतमध्ये रूपांतर करण्यात आले. विठ्ठल ही वैदिक देवता आहे, हे दर्शवण्यासाठी ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ‘द्वे विरूपे चरतः...’ अशा शब्दांनी सुरू होणार्‍या सूक्ताचा अर्थ विठ्ठलाशी संदर्भित आहे, असे प्रयत्न पंढरपूर येथील एक धर्मपंडित काशिनाथ उपाध्याय ऊर्फ बाबा पाध्ये यांच्या ‘विठ्ठलऋङ्मंत्रसारमाष्यम्’ या ग्रंथात करण्यात आलेला आहे. विठ्ठलशास्त्री धारूरकर यांनी आपल्या ‘पंढरीतत्त्वविवेक’ या मराठी ग्रंथात ऋग्वेदाच्या ९५ सूक्तातील पाच ऋचांचा विठ्ठलपर अर्थ दिला आहे.
 
 
श्रीगोपाळाचार्य यांनी ‘श्रीमद्विठ्ठलभूषण’ ही सात पानांची पोथी लिहिली आहे. त्यात निरनिराळ्या संस्कृत ग्रंथातील विठ्ठलविषयक संदर्भ संग्रहित आहेत. ‘द्वे विरूपे’ हे ऋग्वेदातील सूक्त या पोथीतही विठ्ठलपर लावून दाखविलेले आहे. ‘विदा ज्ञानेन ठान् शून्यान् लाति गृहणाति विठ्ठलः’ म्हणजे ‘जो अज्ञ जनांचा ज्ञानाने स्वीकार करतो, तो विठ्ठल’ अशी ‘विठ्ठल’ या नामाची निरूक्ती या पोथीत दिलेली आहे.
 
 
परमविष्णुभक्त पुंडलिकासाठी वैकुंठाचा देव विष्णू हा पंढरपुरी आला, असे मानले जाते. पंढरपुरात पुंडलिकाचे मंदिरही आहे. पुंडलिककथा इतिहासात सापडत नाही, ती पुराणांत सापडते. पुंडलिक हा मुळात पुंडरीकेश्वर होता. संक्षेपाने त्याला ‘पुंडरिक’ म्हटले जात होते. स्कंदपुराण, पद्मपुराण, नृसिंहपुराण अशा पुराणांतून विष्णुभक्त पुंडरिकाच्या कथा आलेल्या आहेत. परंतु, पुराणांमधील पुंडरिक हा पंढरपूरचा पुंडरिक नाही. पुराणांतील पुंडरिक-कथांच्या प्रभावाच्या आधारे, विठ्ठलाच्या वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत, पंढरपूर येथील पुंडलिकाची वा पुंडरिकाची कथा उभी करण्यात आली, असे डॉ. रा. चिं. ढेरे यांचे मत आहे. डिंडीरव वनातील (दिंडीरवनातील) डिंडीरवनामक दैत्याचे पारिपत्य करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुनाचे (शिवाचे) रूप घेतले, अशी कथा पाद्म पांडुरंगमाहात्म्यात आलेली आहे.
 
 
विठ्ठलाचे वैष्णवीकरण होण्यापूर्वी पंढरपूरचा विठ्ठल काही काळ शिवरूप झाला होता, असे डॉ. माणिकराव धनपलवार या संशोधकांनी मांडले आहे. पंढरपूर हे मुळात पुंडलिकपूर असून तिरूवारूर आणि चिदंबरम या दक्षिणेतील प्रसिद्ध शिवक्षेत्रांचे पर्यायी नाव ‘पंडरीकपूर’ असेच आहे, हे अन्य काही प्रमाणांसह या संदर्भात निदर्शनास आणतात. तथापि, पंढरपूर हे पुंडरीकेश्वरामुळे ‘पुंडरीकपूर’ झाले. पंढरीचा तोच मूळ अधिष्ठाता देव होता. वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत तो विठ्ठलाच्या परिवारात समाविष्ट झाला. परंतु, पंढरपूरचा विठ्ठल हा मात्र शिव बनलेला नव्हता, असे डॉ. ढेरे यांचे मत आहे. परंतु, प्रत्येक देवतेच्या उन्नयप्रक्रियेत आधी शैव आणि मग वैष्णव रूप होणे, अनिवार्य नाही.
 
 
पंढरपूरचा विठोबा आणि तिरूमलाई (आंध्र प्रदेश) येथील व्यंकटेश देवता या दोन देवांमधील साम्य लक्षणीय आहे. विठ्ठलाप्रमाणेच व्यंकटेश देवता हाती शस्त्र नसलेली आणि मौनी (शांत) आहे. त्याचा डावा हात कमरेवर असून, उजवा हात त्याच्या भक्तांना वर देत आहे. विठ्ठलाच्या काही मूर्ती अशाच प्रकारच्या आहेत. विठ्ठलाच्या संस्कृत ‘पांडुरंगमाहात्म्या’प्रमाणेच व्यंकटेशाशी संबंधित अशा तिरूमलाईचीही संस्कृत माहात्म्ये आहेत. रूसलेल्या रूक्मिणीची समजूत काढण्यासाठी विठ्ठल पंढरपूरला आला. त्याचप्रमाणे व्यंकटेशही रूसलेल्या लक्ष्मीसाठी तिरूमलई येथे आला. तेथे त्याने ‘पद्मतीर्थ’ खोदले व त्यातून पद्मावती (जी व्यंकटेशाची पत्नी आहे) प्रगट झाली, अशी कथा सांगितली जाते. विठ्ठल आणि व्यंकटेश या दोन्ही देवांना कांबळे (घोंगडी) अत्यंत प्रिय आहे. तसेच, या दोन्ही देवांच्या समारंभात चिंचेच्या झाडांना फार महत्त्व आहे. व्यंकटेश हा व्यंकटाचलावर एका चिंचेच्या झाडाखाली असलेल्या वारूळातून प्रकट झाला, अशी कथा सांगितली जाते. पंढरपूर येथील दिंडीरवन हे चिंचेच्या झाडांचे वन होते.
 
 
व्यंकटेश आणि विठोबा यांच्यातील साम्य लक्षात घेता, हे दोन्ही देव एकाच लोकदेवाची विठ्ठल-वीरप्पाची दोन वेगवेगळी, पण एकमेकांशी लक्षणीय साम्यही राखून असलेली उन्नत रूपे असली पाहिजेत, असे डॉ. ढेरे यांना वाटते. विठ्ठल-वीरप्पा या जोडदेवाचाही चिंचेच्या झाडाशी संबंध आहे. विठ्ठल-वीरप्पा हा जोडदेव पहिल्यांदा पट्टणकोडोलीला आला, तेव्हा तो चिंचेच्या झाडाखाली येऊन थांबला, अशी धनगरांची श्रद्धा आहे. एका धनगरी कथेनुसार विठ्ठलाची पत्नी विठ्ठलावर रूसून वनात गेली आणि चिंचेच्या बुंध्यापाशी येऊन गतप्राण झाली. व्यंकटेशाची उपासना आज श्रीनिवास किंवा विष्णू म्हणून केली जाते. परंतु, ७५० वर्षांपूर्वी व्यंकटेश हा वीरभद्र म्हणून पूजला जात होता, असा वीरशैष पंथांच्या अनुयायांचा दावा आहे आणि वीरप्पाचेच वीरभद्रात रूपांतर झाले, असा ग्युथर सोनथायमर यांचा निष्कर्ष आहे. आंध्र-कर्नाटक-महाराष्ट्रात वीरशैव पंथीयांमध्ये वीरभद्र उपासना केली जाते. वीरशैव पंथांचा प्रभाव वाढला, तेव्हा दक्षिण भारतातील गोपजन हे वीरशैव बनले व त्यांच्या प्रिय दैवताचे-वीरप्पाचे-वीरभद्रीकरण त्यांच्या मूळच्या देवाला त्यांनी नव्याने स्वीकारलेल्या श्रद्धाविश्वात प्रतिष्ठित करण्यासाठी वीरशैवांनी घडवून आणले, असे डॉ. ढेरे यांचे प्रतिपादन आहे.
 
 
मराठी संतांनी अनेकदा विठ्ठलाला ‘बुद्ध’ म्हणून संबोधिले आहे. संत जनाबाईने तिच्या एका अभंगात असे म्हटले आहे की, कृष्णावतारी कंसवध करणारा माझा विठ्ठल हा आता बुद्ध होऊन अवतरला आहे. विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे, असे एकनाथांनी आपल्या एका अभंगात स्पष्टपणे म्हटले आहे. विठ्ठल हा कृष्णानंतरचा विष्णूचा नववा अवतार आहे, अशी संतांची श्रद्धा दिसते. काही चित्रशिल्पांमधूनही ही श्रद्धा व्यक्त झालेली आहे. काही जुन्या पंचांगांच्या मुखपृष्ठावर छापलेल्या दशावतारांच्या चित्रांत नवव्या अवताराच्या ठिकाणी विठ्ठलाचे (रूक्मिणीसह वा तिच्यावाचून) चित्र दाखविलेले दिसते आणि त्या चित्रावर ‘बुद्ध’ असेही छापलेले आढळते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील लक्ष्मीकेशव मंदिरात कोरलेल्या दशावतांरात बुद्ध म्हणून कोरलेली मूर्ती विठ्ठलाचीच असल्याचे जाणवते. संतांनी विठ्ठलाला बुद्ध मानले, याचे कारण बुद्धाची करुणा आणि त्या करुणेचे त्यांना वाटत असलेले महत्त्व, हे आहे. बुद्धाचीच करूणाधारा विठ्ठलभक्तीच्या रूपाने संतांनी महाराष्ट्रात वाहती ठेवली.
 
 
विठ्ठल हे जैनांचे दैवत आहे, असा जैनांचा दावा अठराव्या शतकापर्यंत होता, असे दिसते. मराठी संतांनी मात्र विठ्ठलाला अनेकदा ‘बुद्ध’ म्हणून संबोधिले असले, तरी ‘जिन’ म्हणून कधीही संबोधिलेले नाही. रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी त्यांच्या भरतखंडाच्या अर्वाचीन कोशात एका जैन पंडिताने जैन तीर्थंकर नेमिनाथाच्या स्थापन केलेल्या मूर्तीचे वर्णन करणारे संस्कृत श्लोक एका जैन ग्रंथातून उदधृत केले आहेत व ते वर्णन पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मूर्तीशी जुळते, असे त्यांनी म्हटले आहे. कृष्ण आणि नेमिनाथ यांचा संबंध जैन परंपरेत जवळचा मानला गेला आहे. दोघेही यदुवंशीय असून चुलतभाऊ होते, असे ही परंपरा सांगते. त्यामुळे ज्याला कृष्णाचे बालरूप मानले जाते, त्या विठ्ठलाला जैनांनी नेमिनाथांना पाहिले असणे शक्य आहे.
सर्व भक्तांची असणारीही करुणामय विठ्ठूमाऊली, जिच्यामध्ये शैव, वैष्णव, जैव, बौद्ध या सर्वांचा समन्वय आढळतो. म्हणून रा. चिं. ढेरे विठ्ठलाला ‘महासमन्वय’ म्हणतात, ते आध्यात्मिक आणि तात्त्विकदृष्ट्या यथार्थच वाटते...
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.