‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि समरसता’ या विषयावर १९ वे समरसता साहित्य संमेलन दि. २ आणि ३ जुलै रोजी नागपूर येथे संपन्न झाले. त्यानिमित्ताने या संमेलनाची अनुभूती शब्दात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
साहित्य संमेलन हा तसा महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय. काही जणांचे म्हणणे असे की, साहित्य संमेलन म्हणजे राजकीय आखाडे किंवा अर्थपूर्ण व्यवहारांचे प्रसिद्ध व्यासपीठ! तिथे कुठे काय साहित्यबिईत्य? तर काहींचे म्हणणे की, साहित्य संमेलनाच्या नावाने अनुभवाच्या वेगळ्या चुली मांडल्या जातात. कधी अभिजात, कधी मागासवर्गीय, कधी वनवासी विद्रोही, कधी मुस्लीम तर कधी शेतकरी कधी कष्टकरी वगैरेमध्ये साहित्याची विभागणी करतात. ही साहित्य संमेलने खरंच साहित्यासाठी असतात की स्वार्थासाठी? आणि विशिष्ट मत समाजावर लादण्यासाठी? या सगळ्या चर्चा आणि प्रवादांना पुरून उरत आपले सरल समरस साहित्यिक वैशिष्ट्य दमदारपणे मांडत १९वे समरसता साहित्य संमेलन नुकतेच नागपूरला थाटात पार पडले. संमेलनाचा विषय होता- ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि समरसता’. समरसतेच्या भावाने उभे आयुष्य झिजवणारे पद्मश्री गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दादा इदाते, रमेश महाजन, रमेश पांडव या ज्येष्ठांचे या संमेलनास मार्गदर्शन आणि आशीर्वाद होतेच.
दि. २ जुलै - साहित्य संमेलनाचा पहिला दिवस. सकाळीच प्रथेनुसार ग्रंथदिंडीने संमेलनाचा श्रीगणेशा झाला. नागपूरमधील तरुणाई आणि महिलावर्गअक्षरशः ‘दिवाळी घरी आली’ या भावनेनेग्रंथदिंडीत सामील झाले होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे होते, तर या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे होते. माजी संमेलनाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे प्रमुख पाहुणे होते. संमेलनाच्या उद्घाटनाला व्यासपीठावर समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदपुरे, कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, निमंत्रक सुनील वारे, सहनिमंत्रक डॉ. सुनील भडंगे, प्रा. संजय गायकवाड, संमेलनाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे उपस्थित होते. संमेलनाचे माजी अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी विद्यमान अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांना संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. त्यानंतर तरुण विजय यांच्या हस्ते संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनानिमित्त विचार व्यक्त करताना तरुण विजय म्हणाले की, ”दुर्लक्षितांच्या वेदनांचा हुंकार झालेल्या अनेक महापुरूषांनी देशाच्या इतिहासाला सकारात्मकतेची कलाटणी दिली. मात्र, हा इतिहास आपल्यापासून कायम लपविला गेला. देशाला जोडणार्यांना बाजूला सारून देशाची शकले पाडत मानवी मूल्य पायदळी तुडविणार्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला, हे आपलेदुर्दैव आहे.” संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसन्न पाटील यांनी, तर सुनीलवारे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विवेक अलोणी आणि शलाका जोशी यांनी केले. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी आभार मानले, तर डॉ. जयश्री शास्त्री यांनी पसायदान सादर केले. हे साहित्य संमेलन माझेच आहे. माझ्यासाठीच याचे आयोजन झाले आहे, असे वाटावे इतके या साहित्य संमेलनाचे आयोजन व्यवस्थित आणि आपुलकीने ओतप्रेत होते. या सगळ्यांचे श्रेय नागपूरकरांना जाते. या आयोजनावर आणि व्यवस्थेवर उपस्थितप्रत्येकजण अक्षरशः फिदाच झाला.
असो. संमेलन खर्या अर्थाने गाजले ते संमेलनातील विषय आणि वक्त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण विषयमांडणीमुळे. ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीयता’ हा पहिला परिसंवाद डॉ. अरविंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यामध्ये डॉ. भास्कर म्हरसाळे, डॉ. कोमल ठाकरे, शिवा कांबळे, डॉ. विजय तुंटे यांनी आपले विचार व्यक्त केले. दुसरा परिसंवाद ‘अण्णा भाऊ साठे : समतेचा पथिक’ या विषयावर होता. परिसंवादाचे अध्यक्ष होते पद्मश्री डॉ. नामदेव कांबळे. या परिसंवादामध्ये डॉ. धनंजय भिसे, डॉ. अंबादास सकट, डॉ. उज्ज्वला हातागळे, हेमंत चोपडे सहभागी होते. संमेलनामध्ये सा. ‘विवेक’चे सहसंपादक रवींद्र गोळे यांचे विषयनिष्ठ भाषणही होते.
दुसर्या दिवसाच्या पहिल्या परिसंवादाचा विषय होता- ‘नव्वदोत्तर साहित्यातील समरसता.’ परिसंवादाच्या अध्यक्षा होत्या डॉ. श्यामा घोणसे, तर वक्ते होते डॉ. शंकर धडके, डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. अरुण ठोके, श्रीकांत उमरीकर. या नंतर दुसरा परिसंवाद होता ‘अण्णा भाऊंचे साहित्यविश्व : आकलन आणि आस्वादन’ या विषयावरचा. या परिसंवादाचे अध्यक्ष होते डॉ. बळीराम गायकवाड. यामध्ये नारायणी शेंडे, स्वर्णिमा कमलवार, सौरभ खोत, अभिजित खोडके, भार्गवी बाबरेकर, अथर्व गोगायन सहभागी होते. सर्व परिसंवादांचे सूत्रसंचालन माझ्यासह गजानन होडे, काशिनाथ पवार, महेश अहिरराव यांनी केले. संमेलनामध्ये ‘संवाद : सामाजिक सृजनाशी’ या नावाने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रमही होता. यवतमाळचे प्रदीप वडनेरकर यांची मुलाखत विवेक कवठेकर यांनी, तर आळंदीच्या अशोक देशमाने यांची मुलाखत डॉ. रमा गर्गे यांनी घेतली.
१९वे समरसता साहित्य संमेलन हे खर्या अर्थाने साहित्य आणि समाजमनाचा बंध साधणारेसमरस साहित्य संमेलन होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे समाजसत्याने आणि संस्काराने रत्नमंडलीत झालेले बावनकशी सोने. समाजाच्या सर्वच स्तरातील सकारात्मक विचार करणार्या, न्यायासाठी मानवी शाश्वत मूल्यांची कास घेऊन लढणार्यांचा आवाज बनणारे अण्णा भाऊंचे साहित्य. त्यात समाजाचे संस्कार आहेत, वेदना आहेत, प्रश्न आहेत आणि त्यावर सर्वसामान्यातील असामान्यांनी काढलेला मार्गही आहे. अंधारावर नेहमीच प्रकाशाची मात होते. निराशेच्या गर्तेतही एक आशावाद माणसालाजगण्याचा बळ देतो, हे मांडणारे अण्णा भाऊंचे साहित्य आहे, असे अतिशय स्पष्टपणे मांडणारे हे साहित्य संमेलन. या संमेलनाच्या अतिशय यशस्वी आयोजनाबद्दल समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील म्हणतात की, ”समरसता साहित्य परिषदेच्या प्रत्येकाच्या प्रामाणिक प्रयत्नांतून आणि समर्पण भावनेतून समरसता साहित्य संमेलनाचे आव्हान आम्ही उत्तमपणे पार पाडू शकलो आहोत.समरसतेचे आपण सगळे समरस सहप्रवासी आहोतयाची प्रचिती संमेलनातून मिळाली.” ‘सरल ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ अशी अनुभूती देणारे हे साहित्य संमेलन अत्यंत संस्मरणीय होते हे नक्की!
अण्णाभाऊंच्या साहित्यात जसा भटक्या- विमुक्तांचा आवाज बुलंद होतो, तसाच वंचितांचा पिचलेल्यांच्याही वेदनेलाही पाझर फुटतो. अण्णाभाऊंच्या साहित्यातून प्रकट होणारी स्त्रीदेखील संघर्षाचा अंगार घेऊन उभी राहते. अण्णाभाऊंचे साहित्य खर्या अर्थाने समाजाशी एकरूप झालेले आहे.
- पद्मश्री, गिरीश प्रभुणे
अण्णाभाऊंच्या साहित्याचा विलक्षण प्रभाव त्यांच्या नंतरच्या दलित साहित्यिकांवर पडला. पण, केवळ दलित किंवा साम्यवादीच नाही, तर जीवनवादी लेखकांसाठीही अण्णाभाऊंचे साहित्य आदर्श दीपस्तंभाप्रमाणे आहे, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा समरसतेशिवाय होऊच शकत नाही. ही समरसरता परस्परांशी असलेला कळवळा, करुणा हे वेदनेतून निर्माण होते.
- डॉ. अक्षयकुमार काळे
या संमेलनातून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या अनेक पैलूंवर प्रभावीपणे प्रकाश टाकला. पूर्वग्रह बाळगूनया संमेलनाला अनुपस्थित राहणार्यांनी या संमेलनामधील अण्णाभाऊंच्या साहित्यावरील भाषणे कुठे उपलब्ध होत असतील, तर नक्कीच ऐकावित, पाहावीत म्हणजे त्यांच्यातील वैचारिक पूर्वग्रहदूषित मनभेद/मतभेद दूर होतील याची मला खात्री आहे.
- रवींद्र वानखेडे, अध्यक्ष, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संगीत व कला अकादमी.