खेळ, संगीत आणि कला यांना कोणत्याही प्रकारची सीमा नसते. हीच अशी माध्यमे आहेत की, जी आंतरराष्ट्रीय संबंधात सौहार्द निर्माण होण्याची शक्यता प्रतिपादित करत असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार्या क्रीडा स्पर्धा या केवळ खेळ नसून जागतिक बंधुभावाची वीण घट्ट करण्यात मोलाची भूमिका बजाविणारे एक व्यासपीठ असते.
सध्या तामिळनाडूत ‘जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड’चे आयोजन करण्यात आले आहे. यात पाकिस्तानने जी कृती केली, त्याबद्दल आश्चर्य वाटण्याची खरेतर गरज नाही. कारण, पाकिस्तानने जे वर्तन केले, ते करण्यासाठी कोणत्याही तर्काची गरज भासत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पाकिस्तानला कायमच बेछूट प्रतिक्रिया देण्याची सवय जडली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सामान्य नैतिकतेची काळजी घेतली जाईल, असे समजणे म्हणजे आपलाच भ्रमनिरास होण्यासारखे असल्याचे आजवर अनेकदा दिसून आले आहे.
तामिळनाडू येथील मामल्लापुरम येथे गुरुवारी सुरू झालेल्या ४०व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पाकिस्तानने घेतलेली भूमिका त्यांच्या नेहमीचा सवयीचा भाग असल्याचे दिसून आले. या स्पर्धेत खुल्या गटातील ११८ संघ आणि महिला गटात १६२ संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानचा संघही सहभागी होता आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतातदेखील झाला होता. पण अखेरच्या क्षणी पाकिस्तानने या ‘ऑलिम्पियाड’मधून माघार घेण्याची घोषणा केली. भारत काश्मीरमधून या स्पर्धेची ‘रिले मशाल’ बाहेर काढण्याच्या बहाण्याने या स्पर्धेचे राजकारण करत असल्याची कथित तक्रार पाकिस्तानच्यावतीने मांडण्यात आली आहे.
जर भारताने ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’च्या ‘रिले मशाल’ला आपल्या सार्वभौम प्रदेशाच्या कोणत्याही भागातून जाण्याचा मार्ग बनवला, तर इतर कोणत्याही देशाला त्याचा त्रास का व्हावा, हाच प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. पण गेल्या अनेक दशकांच्या अनुभवानंतर पाकिस्तानच्या संदर्भात आता हा प्रश्न अगदीच फुटकळ जरी वाटत असला, तरी पाकिस्तान आपल्या बुद्धिहीन वर्तनाने जगाचे लक्ष पुन्हा एकदा काश्मीरकडे वळवू पाहत आहे. हे मात्र यातून सिद्ध होत आहे. पाकिस्तानचा भारताविषयी एक विशिष्ट प्रकारचा तिरस्कार भरलेला असल्याने, विनाकारण कोणत्याही बहाण्याने वाद निर्माण करणे, हा त्याचा स्वभाव बनला आहे. पण हे करत असताना पाकिस्तानच्या अशा कृत्यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा कशी असेल, याचीदेखील चिंता आता पाकिस्तानला सतावत नाही, हेच यावरून दिसून येते.
‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’मधून माघार घेण्याच्या पाकिस्तानच्या घोषणेनंतर भारताने त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून कोणतेही कारण नसताना पाकिस्तान या खेळाचे राजकारण करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानच्या या निर्णयावर स्पर्धेत सहभागी इतर देशांनी टीका केली आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी देशांच्या मनात पाकिस्तानबद्दल कोणत्या प्रकारचे मत तयार झाले असेल, याची प्रचिती नक्कीच येते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघा’ने आमंत्रित केले होते. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित करूनही संपूर्ण जग काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग मानते, हे उघड आहे. ही वस्तुस्थिती पचवणे पाकिस्तानला आता कठीण जात आहे. त्यांच्या याच वृत्तीमुळे त्यांना अनेकदा आंतरराष्ट्रीय मंचांवर समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शेजारी देश असल्याने पाकिस्तानने कोणत्याही निराधार मुद्द्यावरून संकटे निर्माण करू नयेत, असा भारताचा नेहमीच प्रयत्न असतो.
दहशतवादी संघटनांना आश्रय देण्यापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणात अनावश्यक असलेल्या कोणत्याही मुद्द्यावर वाद निर्माण करण्यापर्यंत भारताची गैरसोय करण्याचा पाकिस्तानचा नेहमीच प्रयत्न असतो. मुख्य प्रवाहातील राजकीय आणि धोरणात्मक आव्हानांचा सामना करताना, दोन देश किंवा पक्षांमधील संबंध सुधारण्याचा एक मार्ग म्हणूनही क्रीडा जगताकडे पाहिले जाते. परस्पर तणाव असूनही भारत आणि पाकिस्तानचे संघ वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होत आहेत. यामुळे नात्यात सहजता येण्याची आशा राहते. पण खेळातील सहभागाचेही राजकारण होऊ लागले, तर जागतिक परिस्थितीत ते कसे दिसेल, याचा विचार या निमित्ताने होणे आवश्यक आहे.