राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : भारताकडून दिमाखदार कामगिरीची अपेक्षा

    28-Jul-2022
Total Views |

cwg
 
 
२०२२ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आज दि. २८ जुलैपासून ८ ऑगस्ट या कालावधीत इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे रंगणार आहे. तब्बल ४,५०० खेळाडू विविध स्पर्धांमध्ये आपले कसब पणाला लावणार आहेत. यंदाची स्पर्धा अनेक अर्थाने नाविन्यपूर्ण आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच महिलांच्या टी-ट्वेन्टी स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने...
 
 
एकेकाळी ब्रिटनच्या साम्राज्याखाली असणार्‍या देशांमध्ये क्रीडा गुणवत्तेचा उत्सव साजरा करण्यासाठी १९३० साली पहिल्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचेआयोजन करण्यात आले. गेल्या ९२ वर्षांत अनेक जागतिक घडामोडी घडल्या. गुलामगिरीच्या जोखडातून अनेक देश स्वतंत्र झाले. जागतिक संदर्भही बदलले. पण, राष्ट्रकुल देशातील सौहार्दाची वीण खेळाच्या मैदानावर आजही कायम आहे. खरे तर या राष्ट्रकुलातील देशांची संख्या आजपर्यंत आहे ५४, पण यंदाच्या या स्पर्धेत एकूण संघ उतरणार आहेत ७२! कारण, या ५४ देशांव्यतिरिक्त स्वतंत्र १८ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. अगदी यजमान ग्रेट ब्रिटनचे चार संघ या स्पर्धेत स्वतंत्र झेंड्याखाली उतरणार आहेत. त्यात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्थन आयर्लंडचा सहभाग आहे.
 
 
२०२२ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आज, दि. २८ जुलैपासून ८ ऑगस्ट या कालावधीत इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे रंगणार आहे. तब्बल ४ हजार, ५०० खेळाडू विविध स्पर्धांमध्ये आपले कसब पणाला लावणार आहेत. यंदाची स्पर्धा अनेक अर्थाने नाविन्यपूर्ण आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच महिलांच्या ‘टी-२०’ स्पर्धेचासमावेश करण्यात आला आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि बार्बाडोस संघांमध्ये महिला क्रिकेटची चुरस रंगणार आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाच्या समावेशाच्या दृष्टीने पडलेले हे पहिले सकारात्मक पाऊल ठरेल, अशी अपेक्षा आहे.
 
 
भारताला हमखास पदक मिळवून देणारा हुकमी असा नेमबाजी खेळ मात्र स्पर्धेतून यंदा वगळण्यात आला आहे. आजवर झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतनेमबाजी स्पर्धेतील ५०३ पदकांपैकी भारताने तब्बल १३५ पदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल-२०२२ स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नसल्यामुळे खरे तर भारताची पदकांची मोठी संधी हुकली आहे, असे म्हणता येईल.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नुकताच ३२२ सदस्यीय चमू राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पाठवला आहे, यात २१५ अ‍ॅथलिट आणि १०७ अधिकार्‍यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील १६ जणांचा समावेश असून त्याची यादी पुढीलप्रमाणे आहे.(१४+ २ पॅरा)
 
 
खेळाडूंची यादी
 
२०१८ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्यपदकांसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर होता. भारतीय खेळाडू १५ क्रीडा प्रकारांमध्ये आणि चार पॅरास्पर्धेत सहभागी होणार आहेत. पदक मिळवून देण्याची क्षमता आणि अपेक्षा असलेले पुढील काही खेळाडू आहेत.
 
 
नीरज चोप्राचे ‘मिशन ९०’
 
नीरजने २०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत जागतिक पटलावर आपल्या आगमनाची वर्दी दिली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्येही त्याने सुवर्णपदकाची कमाई करत भालाफेकीतील आपल्या साम्राज्याची अधिकृत मुहूर्तमेढ रचली. हरियाणाच्या नीरजने नुकत्याच स्टॉकहोम येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत ८९.९४ मीटर दूर भालाफेक करीत त्याचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. येत्या राष्ट्रकुल स्पर्धेत९० मीटर पार भालाफेक करायचा त्याचा मानस होता. मात्र, नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे नीरजने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे भारत एका हुकमी पदकाला मुकला आहे.
 
  
शटल क्वीन सिंधु
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारी पी. व्ही. सिंधू सध्या ऐन ‘फॉर्मा’त आहे. २०१४च्याराष्ट्रकुल स्पर्धेत तिला कांस्य, तर २०१८ मध्ये रौप्यपदक मिळाले होते. यंदा सुवर्ण पदक जिंकून ‘हॅट्ट्रिक’ करायची तिला नामी आणि सर्वोत्तम संधी आहे.
 
 
या स्पर्धेत उतरणारा भारताचा पुरुष आणि महिला बॅडमिंटन संघ हा आजवरचा सगळ्यात तगडा संघ असणार आहे. नुकत्याच झालेल्या ‘थॉमस कप’ स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे यंदा सांघिक आणि मिश्र प्रकारातही भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत. पुरुष विभागात किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, एचएस प्रणोय एकेरीत तर दुहेरीत सात्विक साईराज आणि महाराष्ट्राचा चिराग शेट्टी यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.
 
 
भारतासाठी यशस्वी भारोत्तोलन
 
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक यशस्वी ठरलेला क्रीडा प्रकार म्हणजे वेटलिफ्टिंग. आजवर भारताने तब्बल १२५ पदके या क्रीडा प्रकारात जिंकली आहेत. टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती आणि राष्ट्रकुल चॅम्पियन मिराबाई चानू हिच्यासह भारताचा १५ सदस्यीय चमू भारोत्तोलनसाठी सज्ज आहे. अर्थात, मिराबाईचे मिशन असेल ते सुवर्णपदकाचे. ती ‘हॅट्ट्रीक’साठी सज्ज झाली आहे. ती नव्या विक्रमासह पदक जिंकते का, याकडे क्रीडा जगताचे लक्ष असेल.
 
 
कुस्तीत वर्चस्वाची लढाई
 
कुस्तीत १२ सदस्यीय चमू भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. विनेश फोगट, अंशू मलिक, साक्षी मलिक, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा रवी कुमार दहीया आणि कांस्य पदक जिंकणारा बजरंग पुनीया यांच्यावर पदकाची भिस्त असणार आहे.
 
 
बॉक्सिंगध्ये झरीनच्या कामगिरीवर लक्ष
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती लोवोलिना बोर्गोहेन, पाच वेळा आशियाई पदक जिंकलेला शिवा थापा, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते अमित पनघल आणि मोहम्मद हुस्माद्दीन यांच्याडून अपेक्षा आहेत. भारताची सुपर बॉक्सर निखत झरीनवर सगळ्यांचे लक्ष असेल. झरीनने मेमध्ये जागतिक स्पर्धा जिंकत अपेक्षा उंचावल्या आहेत.
 
 
टेबल-टेनिस
 
टेबल टेनिसमध्ये आठ सदस्यीय भारतीय चमू सहभागी होत आहे. मनिका बात्राकडून पुन्हा ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे. २०१८च्याराष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत मनिकाने इतिहास घडवला होता. यंदा त्या यशाची पुनरावृत्ती ती करू शकते. जी. सतियान आणि शरथ कमलकडूनही पदकाच्या अपेक्षा ठेवता येतील. शरथने पदक जिंकल्यास त्याचे हे आठवे पदक असेल.
 
 
इतर
 
भारताचे एकूण ३७ अ‍ॅथलिट स्पर्धेत सहभागी होत आहेत. नीरज चोप्रासह यंदा धुती चंद, हीमा दास, गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग, लांब उडीत केरळचा श्रीशंकर आणि तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेकडून पदकाच्या अधिक अपेक्षा आहेत. ओरेगा येथे नुकत्याच झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत श्रीशंकरने अंतिम फेरीत धडक मारली होती. २७ वर्षीय अविनाश साबळेने तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत यंदाच्या मार्चपासून स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम तब्बल दोनदा मोडला आहे. जूनमध्ये डायमंड लिगमध्ये त्याने ८ मिनिटे १२.४८ सेकंदाच्या नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे.
 
 
सांघिक क्रीडा प्रकारात हॉकीमधून भारताच्या पुरुष आणि महिला संघाकडून भारताला पदकाची खात्री आहे. टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले होते, तर महिलांच्या संघाचे पदक अगदी थोडक्यात हुकले होते. भारतीय पुरुष हॉकी संघाला दोन वेळा (२०१०, २०१४) मध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते तर भारतीय महिला हॉकी संघाने २००२ मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. याशिवाय ज्युदो-सहा सदस्यीय चमू, स्कॅवाश- नऊ सदस्यीय चमू, जलतरण-चार सदस्य, ट्रायथॉलॉन, सायकलिंग या प्रकारात भारत सहभागी होत आहे.
 
 
जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक्स. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा येतात. या सगळ्या स्पर्धा दर चार वर्षांनी होतात, हा यातील समान धागा. इतर दोन्ही स्पर्धांप्रमाणेच भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतीलकामगिरीचा आलेख चढाच राहिला आहे. या स्पर्धेत भारत प्रथम १९३४ मध्ये सहभागी झाला आणि भारताने आत्तापर्यंत ५०० हून अधिक पदके मिळवली आहेत. २०१० साली दिल्लीत झालेल्या एकाच स्पर्धेत भारताने पदकांचे शतक पार केले होते. ऑस्ट्रेलियात २०१८ साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने २६ गोल्ड मेडलसह एकूण ६६ मेडल जिंकत पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले होते. त्यामुळे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताच्या कामगिरीचा आलेख उंचावलेलाच असेल यात शंका नाही.
 
 
गेल्या काही वर्षांत सरकारच्या क्रीडानुकूल धोरणांचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीतून प्रतिबिंबित होताना दिसत आहे. केंद्रीय क्रीडा व्यवहार व युवा मंत्रालयाकडून खेळाडूंना मिळणारे भत्ते, सुविधा आणि इतर सवलतींसाठी नुकतेच ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
 
 
स्टार खेळाडू नीरज चोप्रा, पी. व्ही. सिंधु, मिराबाई चानू, रवी दहिया, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, विनेश फोगाट, लोवोलिना बोर्गोहेन, भाविना पटेल यांच्यासह अनेक खेळाडूंना परदेशी प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या भारतीय चमूसोबत संवाद साधून त्यांचा हुरुप वाढवला. या सर्वांचा परिणाम भारतीय पदकतालिकेवर नक्कीच दिसून येईल, अशी अपेक्षा करूया.
 
 - प्रज्ञा जांभेकर