मुंबई : गेले काही दिवस सोशल मीडियावर उद्योजक ललित मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांचे फोटो व्हायरल झाले होते तेव्हा सगळीकडे एकच चर्चा सुरु होती. सुष्मिता सेन आणि ललित मोदी एकमेकांना डेट करत असल्याचे समजताच अनेकांना धक्का बसला. तेव्हापासून हे दोघेही चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला तरी तो चांगलाच व्हायरल होत असलेला पहायला मिळतोय. अशातच दोघांच्या अफेअरच्या बातमीवर देशभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. त्यामुळे आपले मौन सोडत सगळ्या ट्रोलिंगवर ललित मोदींनी उत्तर दिले आहे.
ट्रोलिंग करणाऱ्यांसाठी ललित मोदींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी ट्रोलर्सची कानउघडणी करत सडेतोड उत्तर दिलं आहे. ललित मोदींनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. ज्यामध्ये चार वेगवेगळ्या बातम्या दाखवल्या आहेत आणि या चार बातम्यांपैकी एक बातमी ललित आणि सुष्मिताच्या नात्याचीही आहे. देशाच्या मोठ्या समस्यांकडे लोक कसे डोळे झाकून दुर्लक्ष करतात हे व्यंगचित्रात दाखवले आहे, मात्र प्रत्येकालाच ललित-सुष्मिताच्या नात्यात केवढा पराकोटीचा रस आहे, हे दाखवले आहे. ट्रोलर्सना अशाप्रकारे उत्तर देण्याची ही पद्धत अनेकांना चांगलीच आवडली आहे.
ललित मोदींनी या पोस्टला एक भन्नाट कॅप्शनही दिलेलं आहे, 'मी वाद निर्माण करतो, मात्र अशाप्रकारे', असं म्हणत ललित मोदींनी ट्रोलर्सना चांगलाच टोला लगावला आहे. या पोस्टवरही नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
१४ जुलैला ललित मोदी यांनी ट्विटरवर एका पोस्टद्वारे सुष्मिता सेनसोबतचे नाते जाहीर केले होते. तर एका ट्विटमध्ये त्यांनी सुष्मिताला आपले बेटरहाफ म्हणजे अर्धांगिनी म्हटलं होतं. त्यामुळे अनेकांना त्यांनी लग्न केलं असंच वाटलं. त्यामुळे दोघांचंही लग्न झाल्याच्या बातम्यांना देखील उधाण आले होते.. परंतु, दुसऱ्या एका पोस्टमध्ये ललित मोदींनी हे दोघे सध्या एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले. ललित मोदींनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुष्मिता सेनच्या हातात अगंठी दिसत होती.