बहिरंग योग व त्याचे चार प्रकार याची माहिती घेतल्यावर आता अंतरंग योगाची माहिती घेऊया. अंतरंग योगाचेदेखील चार प्रकार आहेत. प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी.
प्रत्याहार
मनाचा संबंध शरीरातील प्रत्येक पेशीशी क्षणोक्षणी येत असतो. या संबंधातून संवेदना तयार होतात. मनाच्या स्थितीप्रमाणे या संवेदना सुखद किंवा दु:खद असू शकतात. सुखद संवेदना असेल, तर आपले शरीर त्या संवेदनेचा हेवा करू लागते व दु:खद संवेदना असेल, तर त्याचा द्वेष करू लागते. यातूनच मन मग बाहेरील प्रलोभने, व्यसने, कुसंगत यात रमू लागते. शरीरातील पेशी व मन यांच्या संबंधातून निर्माण होणार्या संवेदनांचा तटस्थपणे अभ्यास करणे म्हणजे प्रत्याहार. मनाच्या बाहेरील जगाशी जास्त संबंध येण्यापेक्षा मन शरीरातील आंतरिक अवयवांच्या क्रियेत रमविले व त्यातून निर्माण होणार्या संवेदनांचा लोभ व द्वेष न ठेवता तटस्थपणे अभ्यास केल्यास मनावर नियंत्रण येते. चांगल्या वा वाईट गोष्टींची जाण प्रगल्भ होते.
आरोग्य सुदृढ राहून मन आनंदित व प्रफुल्लित राहते. भगवान गौतम बुद्धांनी मन:शांतीचा हा मार्ग विपश्यनेद्वारे जगास दिला. आनापान सत्ती व विपश्यनेचा नियमित अभ्यास केल्यास चित्त नियंत्रणात राहते. चित्ताची प्रसन्नता शरीराच्या आतून निर्माण होते. ऐहिक सुख, पैसा, ऐश्वर्य, सत्ता याने शरीराच्या सुखसोयीत वाढ होऊ शकते, पण मन प्रसन्नच राहील याची खात्री देता येत नाही. बहिरंग योग व प्रत्याहाराचा नियमित अभ्यास केल्यास शरीर सुदृढ व मन प्रसन्न राहते.
प्रत्याहाराचा अभ्यास चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली करावा. धम्मगिरी, इगतपुरी येथे दहा दिवसांचे विपश्यना निवासी शिबीर भरविले जाते. तेथील वातावरण, अनुशासन, आनापान सत्ती, विपश्यना व मंगलमैत्रीचा अभ्यास केल्याने आपल्याला आपल्या मनाची व शरीराची ओळख नव्याने होते. जगण्याची कला अवगत होते. अनेक सबबीने आपण असल्या शिबिरास जाण्याचे टाळतो. मी फार व्यस्त आहे. दहा दिवस मौन धारण करणे मला जमणार नाही. पहाटे ४.३० वाजता कोण उठेल? इत्यादी अनेक सबबी दिल्या जातात. या सर्व सबबींवर मात करून जर आपण शिबिरात पोहोचलात, तर आपणास मनुष्य जीवनाचा अर्थ कळण्यास सुरूवात होईल. आपण अनेक प्रकारे अध्यात्मात गुंतलेले असतो. तरीपण प्रत्येक वाचकाने आयुष्यात किमान एकदा तरी विपश्यना निवासी शिबिराचा अनुभव घ्यावा, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
धारणा
मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवणे म्हणजे धारणा. मन हे अतिचंचल असते. कधी ते आपल्याबरोबर असते तर क्षणात ते सातासमुद्रापलीकडे असते. कधी दु:खाच्या खोल सागरात बुडालेले असते. कधी भक्तिमार्गात रमलेले असते, तर कधी रानटी व सैतानी विचारात गुंतलेले असते. या चंचल मनास मर्यादा घालणे म्हणजे धारणा. मनाला मुक्त विचार करण्याचे स्वातंत्र्य असावे, पण हे विचार सात्त्विक, आनंददायी व व्यवहार्य असावेत. चंचल मनाचा त्रास शरीरास होऊन शारीरिक व्याधी निर्माण होतात. चंचल मनाला कुंपण घालता आले, तर जीवन सुखकारक होते. त्याचे उदाहरण द्यायचे झाले, तर खुंटीला बांधलेला गाईचा बछडा. गळ्यात बांधलेली दोरी लांब असल्यामुळे बछड्यास अंगणात बागडता येते. परंतु, एका ठरावीक मर्यादेच्या बाहेर जाता येत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केला तर बछड्याच्या मानेला झटका बसतो. मनाच्या चंचलतेवर ताबा मिळविण्यासाठी ओंकार-प्रणवचा अभ्यास परिमाणकारक आहे. हा अभ्यास चांगल्या योगगुरूच्या मार्गदर्शनाखाली करावा.
ध्यान साधना
मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान (मेडिटेशन) साधनेस बसल्यास सुरुवातीला आपणास जाणवते की, अनेक विचार, अनेक दृश्य आपल्या दृष्टिपटलासमोर येऊन जातात. या अवस्थेत गुंतून न पडल्यास पुढील काही मिनिटांत हे विचार व दृश्य कमी होऊन जातात व शांत मनाची एक वेगळीच अनुभूती जाणवते. अशा अवस्थेत धीरगंभीर आवाजात (चॅन्टिंग) चांगल्या विचारांचे स्मरण केले, तर ते मनात खोलवर रुजतात व मनशुद्धी करण्याची प्रक्रिया सुरू होते. ध्यान साधना चांगल्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली शिकावी. कारण, नियमितपणा व श्रद्धा यावरदेखील मनाचे शुद्धीकरण अवलंबून आहे. ब्रह्मविद्येचा अभ्यास ध्यानधारणेसाठी उपयुक्त ठरू शकतो. योगिक श्वसन प्रकार व ध्यानधारणा यांचे योग्य मार्गदर्शन ब्रह्मविद्येत आढळते.
भारतभूमीत निर्माण झालेली ही विद्या सहाव्या शतकापर्यंत नालंदा विद्यापीठात नियमित शिकवली जात होती. परकीय आक्रमणामुळे ही विद्या लुप्त होते की काय, अशी शंका निर्माण झाली. अशा वेळेस तेथील गुरुंनी तिबेटसारख्या डोंगराळ व दुर्गम प्रदेशाचा आसरा घेऊन मानवतेच्या कल्याणाची ही विद्या गुरू-शिष्य परंपरेने जागृत ठेवली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिश पत्रकार गुरू डेंग ले मी यांनी इंग्लंड-सिंगापूर-तिबेट असा खडतर प्रवास करून आपल्या वयोवृद्ध गुरूंकडून ही विद्या आत्मसात केली. नंतर ते अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झाले.
आपल्या हयातीत सुमारे २ लाख, १६ हजार नागरिकांना त्यांनी जीवन सुखी करण्याची ब्रह्मविद्या शिकवली. भारतामधील गुरू श्री जोतिर्मयानंद हे ब्रह्मविद्येने प्रभावित झाले होते. त्यांनी ही विद्या आत्मसात करून तिचा भारतात प्रसार करण्याचे कार्य सुरू केले. श्री जोतिर्मयानंद यांच्यानंतर गुरू जयंत दिवेकर यांनी १९९७ साली ‘ब्रह्मविद्या साधक संघा’ची स्थापना करून ब्रह्मविद्या प्रसाराच्या पवित्र कामास सुरुवात केली. गेल्या दोन दशकांत ब्रह्मविद्येचा प्रसार झपाट्याने झाला. सध्या मुंबई व आसपासच्या परिसरात सुमारे ४० ठिकाणी हे प्रशिक्षण अत्यल्प दरात दिले जात आहे. सेवाभावी शिक्षकांची मोठी टीम उभारण्यात ब्रह्मविद्येला यश आले आहे. ब्रह्मविद्येचा प्रसार हा मुंबईबाहेर व महाराष्ट्राबाहेरदेखील झपाट्याने होत आहे.
कोरोना ‘लॉकडाऊन’च्या काळातदेखील ब्रह्मविद्येचे ऑनलाईन वर्ग सुरू राहिले.कोरोनाच्या निराशमय काळात शेकडो लोकांना ब्रह्मविद्येचा आधार मिळाला. प्रसार माध्यमांमुळे व ऑनलाईन क्लासमुळे भारताबाहेरील साधकांनादेखील ब्रह्मविद्या शिकता आली. आज या विद्येचा प्रसार जगभर होताना दिसतो आहे. निरोगी व सुदृढ समाज निर्माण करण्याचे महान कार्य ब्रह्मविद्या करीत आहे. त्यांच्या प्रकल्पाला मन:पूर्वक शुभेच्छा...!
समाधी
भगवान गौतम बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग, पातंजल योगमधील बहिरंग योग व अंतरंग योग, ब्रह्मविद्येतील अत्युच्च शिखर या सर्वांमध्ये समाधीचा उल्लेख आढळतो. अध्यात्माचा नियमित व मनापासून अभ्यास केल्यास समाधी अवस्था प्राप्त होते. दिव्यज्ञान कदाचित यालाच म्हणत असावेत. ध्यान साधना करताना शरीराच्या अस्तित्वाचे भान न राहणे म्हणजे समाधी. शरीर व मन काम, क्रोध, मद, मत्सर, मोह व भीती यापासून मुक्त होते व एका वेगळ्या प्रकारचा आनंद व शांती आपण अनुभवतो.
संसारी माणसाचा योग : आरोग्याच्या चांगल्या सवयी, अष्टांग योग या संबंधी माहिती येथे दिली आहे. प्रश्न असा पडतो की, हे कुणी करायचे? केव्हा करायचे आणि कशासाठी करायचे? शरीर सुदृढ राहावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी व्यायाम करावा, चालणे वाढवावे, अध्यात्माकडे झुकावे, असे बर्याच मध्यम वयातील नागरिकांना वाटत असते. त्यांची मुख्य सबब असते ती आम्हाला वेळ कुठे आहे. काही अंशी ते खरेदेखील असेल. परंतु, यात इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. आपल्यापैकी बरेच जण हौसेने महागड्या व्यायामशाळेचे पैसे भरतात, पण दोन-चार दिवसांतच तेथे जाणे बंद करतात. सुदृढ आरोग्यासाठी मार्ग आहे. परंतु, तो खडतर आहे व त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. संसारिक माणूस हा त्याचा व्यवसाय, नोकरी व प्रापंचिक विवंचना यात व्यस्त आणि त्रस्त असतो.
यासाठी वेळ काढावा लागतो. २४ तासांतील किमान दोन तास मी माझ्या स्वत:साठी व्यतित करेन, असा प्रत्येकाने संकल्प करावा. यात ‘मॉर्निंग वॉक’, योग, धारणा, ध्यानसाधना, चिंतन, वाचन, मनन, श्रवण व लिखाण यापैकी आपल्या आवडीच्या गोष्टींचा समावेश असावा. उशिरा उठल्यावर किंवा आळस आल्यास पहिली गदा ‘मॉर्निंग वॉक’ व योगसाधनेवर पडते. यात खंड जास्त पडला की, ती चक्क बंद होते. रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, आपल्या कुटुंबीयांसमवेत थोडा तरी वेळ घालविणे व त्याचबरोबर आपल्यासाठी रोज दोन तास दिले, तर आपले धकाधकीचे जीवन सुसह्य होईल, हे स्वानुभवावरून सांगतो.
हल्लीच्या पिढीला आणखी एक व्यसन लागले आहे ते म्हणजे टीव्ही व मोबाईलचे. टीव्हीवरील प्रत्येक सीरियल फक्त माझ्यासाठी आहे, असा काहींचा गोड गैरसमज असतो. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर आपण निरर्थकपणे तासन्तास घालवतो. उलट या माध्यमांचा उपयोग आपल्या व्यवसायातील प्रगतीसाठी, संपर्क वाढविण्यासाठी कसा करता येईल, याचा विचार करावा.
सांसारिक माणसाच्या साधनेत खंड पडणे स्वाभाविक आहे. परंतु, आपला नित्य दैनंदिन क्रम लवकरात लवकर सुरू करणे शहाणपणाचे असते.
- डॉ. मिलिंद शेजवळ