होय, आम्ही हिंदुत्ववादी! ‘मोदी सैनिक’ आणि ‘शिवसैनिकां’चे सरकार

भाजप कार्यकारिणीत फडणवीसांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तर विरोधकांवर हल्लाबोल

    24-Jul-2022
Total Views |

devendra
 
मुंबई: “तिघांचे मिळून सरकार येईल असे वाटले तेव्हा त्यांनी आमचा फोनही घेतला नाही. काही हरकत नाही. त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत झाली, त्याचवेळी आजच्या परिस्थितीचे बिजारोपण झाले,” अशी घणाघाती टीका उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली. पनवेल येथे आयोजित प्रदेश कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि भाजप कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक केले. बाळासाहेब ठाकरेंचा खर्‍या हिंदुत्वाचा विचार घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळेच, हे सरकार खर्‍या अर्थाने भाजपचे ‘मोदीसैनिक’ आणि बाळासाहेबांचे ‘शिवसैनिक’ यांचे सरकार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात आश्चर्य घडले
“विकासाची गती कमी झाली, प्रगतीचे सर्व कार्यक्रम ठप्प, स्थगिती. जे चांगले आहे ते करायचेच नाही, अशी भूमिका घेत केंद्राने कोट्यवधी रुपये देऊन सुरू केलेले प्रकल्प बंद करण्याचे काम आघाडी सरकारने केले. खुर्चीसाठी नाही, खुर्च्या येतात जातात,” असे फडणवीस म्हणाले. “या महाराष्ट्रात आश्चर्य घडले. सत्तेत एक ताकद असते, लोहचुंबक असते. राज्यात पहिल्यांदा 50 आमदारांनी, त्यात नऊ मंत्री यांनी सरकार सोडून विरोधकांसोबत येण्याचा निर्णय केला. ज्या प्रकारे वागणूक मिळत होती, सरकार सुरू होते. त्यांना माहीत होते की, सरकार असेच चालवले, तर पुढच्या निवडणुकीत दिसणार नाही,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हे ठरवूनच
ज्या दिवशी हे ठरले त्यादिवशी काय होणार हे मलाही आणि त्यांनाही माहिती नव्हते. अनेक कथा-कहाण्या तयार झाल्या. आपल्यापैकीही अनेकांना माहिती नव्हते की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. पण हे अचानक घडले नव्हते, तर सगळे काही ठरवून होते. केवळ आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे, म्हणून आम्ही सरकार पाडतो असे नाही. त्यावेळी शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली. ती शिवसेना म्हणजे आता जी अल्पमतात आहे. आता खरी शिवसेना आपल्यासोबत आहे. मी स्वत: त्यांच्यासोबत बसलो आणि खर्‍या अर्थाने काय बोलायचे हे ठरले त्यानुसार मी बोललो. प्रत्येक सभेत पंतप्रधान मोदी सांगायचे की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आपण लढतोय. अमितभाई सांगायचे, खुद्द उद्धव ठाकरेही सांगायचे. आमचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न झाले. आम्ही बंडखोर मागे घेतले होते. पण त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आधीच ठरले होते. ते फक्त नंबर गेमची वाट पाहत होते. ज्यावेळी तिघांचे मिळून सरकार येईल असे वाटले तेव्हा त्यांनी आमचा फोनही घेतला नाही. काही हरकत नाही. त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत झाली, त्याचवेळी आजच्या परिस्थितीचे बिजारोपण झाले, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.
 
एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला
फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, मी मनापासून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करेल. एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला. एवढे सगळे लोक नसते आले, तर त्यांचे सामाजिक, राजकीय जीवन, इतक्या वर्षांची त्यांची पुण्याई संपवण्यात आली असती. पण त्यांनी ठरवले की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांच्या विचारांशीच फारकत घेतली गेली असेल, ज्यांच्याविरोधात आम्ही लढलो, त्यांच्यासोबतच जावे लागत असेल, ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जावे लागत असेल, इतकेच नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात बोलणार्‍यासोबत, दाऊदसोबत संबंध असलेल्यांसोबत जाणे बाळासाहेबांचा शिवसैनिक सहन करू शकत नव्हता.
 
शिवसेनेकडून बेईमानी, भाजपच्या जागा कमी
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने बेईमानी केल्यानेच भाजपच्या जागा कमी आल्या, तर दुसरीकडे भाजपने पक्षातील नाराजी दूर करून शिवसेनेला मदत केली. पक्षाचा विश्वास आणि आमच्या भोळेपणाचा फायदा शिवसेनेने घेतला. कारण त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अगोदर ठरले होते. युतीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून झालेले बंड आम्ही जागोजागी मिटवले. एवढेच नाहीतर सर्व ती मदत करण्यात आली. पण त्यांचे अगोदरच ठरल्याने ही अनैसर्गिक युती जनतेच्या नशिबाला आल्याचे त्यांनी सांगितले.
 
पहिल्या दिवसापासून मनात गाठ मारली
मी सांगायचो की, सरकार चाललेय ते भगवान भरोसे चाललेय. त्यामुळे राज्याची विकासाची गती खुंटली होती. आता झालेले परिवर्तन सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आहे. प्रगतीची सगळी कामे ठप्प होती. केंद्र सरकारने, मागील सरकारने सुरू केलेली विकासाची कामे बंद करण्याचे काम त्या सरकारने केले. आपण पहिल्या दिवसापासून मनात गाठ मारली की, एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि विरोधात बोलले की मारहाण करायची तर एकही दिवस यांना झोपू द्यायचे नाही. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. एका कार्यकर्त्यावर तर 30 गुन्हे दाखल केले, असेही फडणवीस म्हणाले.
 
पहले भी तुफानों को मोड चुका हुँ
एकीकडे भ्रष्टाचार करायचा, दुसरीकडे सूड उगवायचा, असा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकारने सुरू केला होता. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन करण्यात आल्याचे फडणवीस यांनी बैठकीच्या कार्यकारिणीत सांगितले. घराबाहेर पाऊल ठेवले तरी गुन्हा दाखल व्हायचा. ‘मेरी हिंमत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कही तुफानो को मोड चुका हुँ मैं’, असा टोलाही फडवीसांनी शिवसेनेला लगावला.
 
महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे
फडणवीस म्हणाले की, सत्ता हे आपले सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. हा सत्तेचा गड जिंकलो आहोत. विकासाच्या यात्रेत गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र मागे पडलाय. पुन्हा एकदा महाराष्ट्र विकासाच्या वाटचालीत आणायचा आहे. राज्याला देशात पहिला क्रमांकावर आणायचे आहे. हा गड जिंकायचा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
कार्यकर्त्याला त्यागाची भूमिका स्वीकारावी लागते
विचाराने कार्य करणार्‍या कार्यकर्त्याला त्यागाची भूमिका स्वीकारावी लागते. अनेक लोक नंतर मला विचारतात त्याग आम्हीच करायचा का? पण कुणालातरी करावाच लागेल. त्यामुळे आपल्याकडील ही परंपरा आपल्याला कुठल्याही स्थितीत पुढे घेऊन जायची आहे. मी आपल्याला एवढेच आश्वस्त करु इच्छितो की आपल्याला प्रामाणिक, स्वच्छ आणि लोकाभिमुख सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या जनतेच्या समस्या आहेत, आशा, आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही स्वच्छ मनाने करू, असेही फडणवीस यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले.
 
पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक उभे राहतील
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. आपल्या पक्षात या विस्तारात येऊ शकणारे पात्र असलेले नेते खूप आहेत. कारण मोठा पक्ष आहे. अनुभवी, चांगले नेते आहेत. असेही काही आमदार आहेत जे मंत्री झाले नाहीत पण त्यांनी कामाची चुणूक दाखवली आहे. सगळ्यांचा विचार करावा लागेल पण विचार करायला तेवढ्या जागाच नाहीत. त्यामुळे तिथेही काही तडजोड आपल्याला करावी लागेल. पण मला निश्चितपणे विश्वास आहे की, जो निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक उभे राहतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.