‘ऑल इंडिया प्लास्टिक मन्युफॅक्चरिंग असोसिएशन’चा शैक्षणिक आणि रोजगार मेळावा संपन्न

    24-Jul-2022
Total Views |
melava
 
 
 
 
 
मुंबई: ‘ऑल इंडिया प्लास्टिक मन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्यावतीने अंधेरी ‘एमआयडीसी’मधील अरविंद मेहता तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्र येथे शैक्षणिक आणि रोजगार मेळावा शनिवार दि. 23 जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी देशातील शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दरी दूर करून आजचे शिक्षण जास्तीत जास्त रोजगाराभिमुख कसे होईल, या विषयावर प्रामुख्याने प्लास्टिक निर्मिती उद्योगाशी संबंधित चर्चासत्रे झाली.
देशातील उद्योग क्षेत्राच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे समजून घेऊन विद्यार्थ्यांनी नव नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे मत ‘एआयपीएमए’चे माजी अध्यक्ष आणि अरविंद मेहता तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्राचे अध्यक्ष अरविंद मेहता यांनी मांडले. या संपूर्ण मेळाव्यात प्लास्टिक उद्योगाशी संबंधित सर्व उद्योगांवर सखोल चर्चा झाली, तसेच अनेक यशस्वी उद्योजकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. अरविंद मेहता तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्राच्यावतीने चालवण्यात येणार्‍या सर्व अभ्यासक्रमांची माहितीही देण्यात आली.
प्लास्टिक क्षेत्राशी संबंधित शिक्षण संस्थांचे मान्यवर प्राध्यापकही या कार्यक्रमास उपस्थित होते आणि त्यांनीही त्यांच्याकडे असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्लास्टिक निर्मिती क्षेत्रातील विविध यशस्वी उद्योजकांनी या क्षेत्रात रोजगार मिळवण्यासाठी तसेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की कोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरकरणही केले. या कार्यक्रमाला पुणे विद्यार्थी गृह तसेच इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘ऑल इंडिया प्लास्टिक मन्युफॅक्चरिंग असोसिएशन’चे अध्यक्ष किशोर संपात यांनी केले. अरविंद मेहता तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्राच्या केंद्र प्रमुख अमेया जाधव यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली होती. कार्यक्रमाच्या शेवटी अरविंद मेहता तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्रांचे सहाध्यक्ष जयेश रंभिया यांनी आभार प्रदर्शन केले.