पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात फिलिपाईन्स किंवा फिलिपिन्स हा एक चिमुकला असंख्य बेटांचा देश आहे. सैनिकीदृष्ट्या त्याचं स्थान इतकं मोक्याचं आहे की, अमेरिकेने जवळपास त्या सगळ्या देशालाच आपला नाविकतळ बनवलेला आहे. फिलिपाईन्सच्या पश्चिमेकडे पॅसिफिक समुद्राचा जो भाग आहे, तो चीनच्या दक्षिणेकडे येतो, म्हणून त्याला म्हणतात ‘दक्षिण चिनी समुद्र.’
समुद्रातल्या हालचाली हवाई कशा असतील? त्या सागरीच असायला हव्यात. नव्हे का? सैनिकी क्षेत्रातलं तंत्रज्ञान आता इतकं प्रगत झालंय की, प्रत्येक देशाचं वेगळं हवाई दल तर आहेच, पण भूदल आणि आरमार दल यांची पुन्हा वेगवेगळी हवाई दलं आहेत. पूर्वी कसं होतं की, भूदल म्हणजेच लष्कराकडे जमिनीवरून चालणारे सैनिक आणि रणगाडे, चिलखती गाड्या, तोफा इत्यादी यंत्रसाम्रगी असे. आरमार म्हणजेच नौदलाकडे समुद्रात हालचाली करणार्या युद्धनौका, पाणबुड्या आणि त्यांच्याद्वारे युद्ध करणारी माणसं असतं. या दोन्ही दलांना आकाशातून लागेल ती मदत करण्यासाठी हवाई दल म्हणजेच वायूदल निर्माण झालं. पुढे वायूदलाची परिणामकारकता, प्रभाव इतका वाढला की, अधिकाधिक क्षमतेची विमानं निर्माण होऊन त्यांनी युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावली.
पण, आता तंत्रज्ञान आणखी पुढारलंय. लष्कर आणि आरमार या दलांच्या हुकमतीखाली त्यांची-त्यांची स्वतंत्र वायूदलं आहेत. देशाच्या मुख्य वायुदलाच्या समन्वयाने पण स्वतंत्रपणे त्यांची काम चालतात. आता पॅसिफिक महासागराचं उदाहरण घ्या. पृथ्वीवरचा सर्वांत विशाल महासागर असणार्या पॅसिफिमध्ये पोलेनेशियन, मेलेनेशियन, मायक्रोनेशियन, हवाईयन या नावांनी ओळखले जाणारे द्वीपसमूह आहेत. त्यातल्या कित्येक बेटांवर अमेरिकेने आपला अधिकार प्रस्थापित केलेला आहे. आपल्या हिंदी महासागराचं उदाहरण घ्या. आपल्या भारत देशाचं दक्षिण टोक असलेल्या कन्याकुमारीपासून थेट दक्षिणेला किंवा किंचित नैऋत्येला, १७९६ किमी अंतरावर भर महासागरात ‘दिएगो गार्सिया’ नावाचं फक्त ३० चौ. किमी क्षेत्रफळाचं एक बेट आहे. ब्रिटन आणि अमेरिका यांनी मिळून १९६८ साली तिथे एक भक्कम नाविकतळ उभारला.
अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून दूरदूर अंतरावर समुद्रात असणार्या अशा आरमारी तळांवर वाहतूक करण्यासाठी अमेरिकन नौदलाकडे वेगवान नौका तर आहेतच, पण त्या नौकांना साहाय्यक म्हणून पुन्हा नाविक हवाईदल आहे. अमेरिकन नाविकदल हे एवढं अजस्त्र आहे की त्यांच्याकडे पॅसिफिक महासागर क्षेत्राचा म्हणून एक वेगळा खास नौसेनाप्रमुख-अॅडमिरल आहे.
पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात फिलिपाईन्स किंवा फिलिपिन्स हा एक चिमुकला असंख्य बेटांचा देश आहे. सैनिकीदृष्ट्यात्याचं स्थान इतकं मोक्याचं आहे की, अमेरिकेने जवळपास त्या सगळ्या देशालाच आपला नाविकतळ बनवलेला आहे. फिलिपाईन्सच्या पश्चिमेकडे पॅसिफिक समुद्राचा जो भाग आहे, तो चीनच्या दक्षिणेकडे येतो, म्हणून त्याला म्हणतात ‘दक्षिण चिनी समुद्र.’
या दक्षिण चिनी समुद्रातून उत्तरेकडे जपानकडे जाण्याच्या सागरी मार्गावरच हाँगकाँग हे अत्यंत भरभराटलेलं शहर वसलेलं आहे. म्हणजे उत्तरेला हाँगकाँग, पूर्वेला फिलिपाईन्स, पश्चिमेला व्हिएतमान आणि दक्षिणेला मलेशिया अशी दक्षिण चिनी समुद्राची स्थिती आहे, व्यापारीदृष्ट्या अत्यंत मोक्याची म्हणूनच संवेदनशील.
आता चीनने हाँगकाँगवर तर केव्हाच ताबा मिळवलाय. हाँगकाँगच्या नैऋत्येला हैनान नावाच्या बेटावर चीनने फार मोठा नाविकतळ उभारला आहे. चीनने गेल्या काही वर्षांत अनेक भारी आणि मध्यम युद्धनौका बांधून नि मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ भर्ती करून आपलं नौदलही भूदलाप्रमाणेच बलाढ्य बनवलं आहे. या नौदलाचं स्वत:चं वेगळं वायूदल आहे.
या बलाढ्य नौदलाचा वापर करून चीनने दक्षिण चिनी समुद्रात एक वेगळाच खेळ आरंभला आहे. कोणत्याही देशाच्या किनारपट्टीपासून समुद्रांत २०० सागरी मैल एवढ्या अंतरापर्यंतचा समुद्र, त्यातली बारीक-सारीक बेट प्रवाळ खडक आणि समुद्र तळातील सागरी जैवसंपत्ती ही त्या-त्या देशाच्या मालकीची समजली जाते. तसा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. २०० सागरी मैलपलीकडचा समुद्र मात्र कुणाच्याच मालकीचा नसता. फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि पुढे इंडोनोशियापर्यंतसमुद्रात अक्षरशः हजारो छोटी-मोठी बेटं सर्वत्र पसरलेली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून चीनने असा उद्योग सुरू केलाय की, अशी कुणाच्याच सागरी हद्दीत नसणारी बेटं हुडकून काढून त्यावर एखादा छोटासा धक्का झटपट उभा करायचा नि स्वत:चा मालकी हक्क प्रस्थापित करायचा. हा धक्का इतका छोटा असतो की, त्याला एखादा छोटा पडाव किंवा होडीच लागू शकेल. काही प्रवाळ बेटं तर इतकी छोटी आहेत की, विनोदाने असं म्हटलं जात की, त्यावर फक्त झेंडा उभारण्याइतकीचं जागा आहे. तरीही चीनने ती हाताखाली घालून ठेवली आहेत.
या विरोधात ओरड झाल्यावर चीनने सबब पुढे केली की, यामागे आमचा कोणताही सैनिकी विस्तारवाद वगैरे नसून आमच्या मच्छीमारांसाठी आम्ही विसाव्याच्या जागा निर्माण करीत आहोत, असल्या खुलाशांवर विश्वास ठेवायला अमेरिका किंवा मलेशिया वगैरे छोटे देश म्हणजे पंडित नेहरू नव्हेत. सगळेच चीनला पुरेपूर ओळखून आहेत. मग तरीही अमेरिका चीनविरोधात फार कठोर भूमिका घेत नाही, असे का? याचे कारण आहे चीनची प्रचंड बाजारपेठ, जी अमेरिकेला हवी आहे. त्यामुळे अमेरिका-चीन संबंध सतत नरम-गरम असतात.
१९८६ साली अमेरिकन अभिनेता टॉम क्रूझ याचा ‘टॉप गन’ नावाचा चित्रपट संपूर्ण जगभर प्रचंड गाजला होता. नायक पीट मिशेल हा नौदलातील वायूदलाचा झुंजी वैमानिक असतो इत्यादी. आता तब्बल ३६ वर्षांनी त्याचा दुसरा भाग ‘टॉप गन मॅव्हरिक’ हा मे २०२२ पासून सर्वत्र गर्दी खेचतो आहे. ‘मॅवरिक’ म्हणजे विक्षिप्त. पहिल्या भागात नायक आणि त्याचे वरिष्ठ यांच्यातील समज-गैरसमजांचे नाट्य रंगवले होते. आता दुसर्या भागात पीट मिशेल इस्लामी अतिरेकी किंवा चीनचं आव्हान यांच्याशी भिडतोय, असं दाखवलं जाईल, अशी लोकांची अपेक्षा होती.
किमान एप्रिल २००१ मधल्या अमेरिकन नौदलीय वायूदल आणि चिनी नौदलीय वायूदल यांच्यातील जोरदार टक्कर दाखवली जाईल,अशी सर्वांची अपेक्षा होती. पण, तसं काही न घडता पीट मिशेल आणि त्याचा पुतण्या यांच्यातील समज-गैरसमजाची टिपिकल फिल्मी कहाणीच दाखवण्यात आली आहे.
प्रत्यक्ष घटना घडली ती अशी: दि. १ एप्रिल, २००१ या दिवशी एक अमेरिकन नौदलीय वायूदल विमान दक्षिण चिनी समुद्रात हैनान नाविक अड्ड्याच्या आसपास घिरट्या घालताना चिनी नौदलाला आढळलं. अशी विमानं हेरगिरी करीत असतात, हे उघड गुपित आहे. लगेच चिनी नौदलीय वायूदलाच्या एका झुंजी जेट विमानाने आकाशात झेप घेऊन त्या अमेरिकन विमानाभोवती घिरट्या घालायला सुरुवात केली. पण, चिनी वैमानिक जरा फाजिल आत्मविश्वासाने उड्डाण करताना त्या विमानाच्या प्रॉपेलरवरच धडकला. जेटचे दोन तुकडे झाले. वैमानिक ठार झाला.
अमेरिकन विमान एखाद्या लंगड्या गाढवाप्रमाणे रखडत, खुरडत,कंट्रोल टॉवरची परवानगी नसताना हैनान विमातळावर उतरवलं. विमानातल्या तब्बल २४ मरीन्सचे जीव वाचले. पण पुढे काय? मोठाच पेचप्रसंग उभा राहिला. यावेळी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश धाकटे यांनी पदभार सांभाळण्याला अजून तीन महिनेदेखील झाले नव्हते. पण, त्यांचे संरक्षणमंत्री कोलिन पॉवेल हे भलतेच खमके होते. १९९१च्या आखाती युद्धात जनरला कोविन पॉवेल हे अमेरिकेचे आरमाराचे सर्वोच्च सेनापती होते. नंतर राष्ट्राध्यक्षपदासाठीसुद्धा त्यांचं नाव घेतलं जात होतं.
त्याचप्रमाणे चीनमधले अमेरिकेचे राजदूत जोसेफ प्रूहर हे अगोदर अमेरिकन आरमाराच्या पॅसिफिक कमांडचे सर्वोच्च अॅडमिरल होते. पॉवेल आणि प्रूहर यांनी भराभर निर्णय घेतले. प्रूहर यांनी स्वत: चिनी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांना पत्र लिहून चिनी वैमानिकांचा मृत्यू आणि विनापरवानगी हैनान विमानतळावर विमान उतरवल्याबद्दल अमेरिकेला तीव्र खेद होत असून क्षमायाचना केली. चीननेही मोठ्या उदार अंत:करणाने क्षमा करून टाकली. लिखित इतिहासात कधीच न येणार्या फार मोठ्या घटना पडद्यामागे घडत असतात. त्यावेळी म्हणजे २००१ साली चीनला व्यापारीदृष्ट्या दोन उद्दिष्टं साधायची होती. एक म्हणजे ‘वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन’मध्ये प्रवेश आणि दुसरं २००८ सालचं ऑलिम्पिक बीजिंगमध्ये खेळवलं जाणं.
क्षमेच्या बदल्यात चीनने अमेरिकेकडून या दोन्ही मुद्द्यांबाबत संमती मिळवली. दि. १२ एप्रिल, २००१ रोजी २४ अमेरिकन मरीन्सची बाईज्जत मायदेशी पाठवणी करण्यात आली. अमेरिकेला चीनची बाजारपेठ हवीच होती. त्यामुळे तिचंही नुकसान काहीच झालं नाही. पेचप्रसंग टळल्याच्या आनंदात जॉर्ज बुश आणि जियांग झेमिन आपापल्या ठरलेल्या दौर्यांवर रवाना झाले.
आज अमेरिकेतल्या आणि चीनमधल्या सुद्धा राजकीय निरीक्षकांना वेगळीच भीती वाटतेय. ते म्हणतात की, त्या वेळेस दोन्ही बाजू खूप समजूदार होत्या. आज दोन्हीकडचे लोक इतके आक्रमक प्रवृत्तीचे आहेत की, एखादी छोटीशी घटनाही उग्र पेचप्रसंग निर्माण करू शकते. चिनी म्हणतात, ‘दूर राहा,’ तर अमेरिकन म्हणतातस “आम्ही आमची सुरक्षा बघणारच.” तेव्हा वावटळ भिरभिरते आहे. तिथं केव्हाही वादळ बनू शकतं.