मुंबई(प्रतिनिधी): मुंबईच्या उत्तरेकडील गोराई किनाऱ्यावर दि. १९ जुलै रोजी 'मेलन हेडेड व्हेल' हा दुर्मिळ समुद्री प्राणी वाहून आला. सोमवारी दि. १८ रोजी गोराई येथील किनाऱ्यावर हा प्राणी जिवंत अवस्थेत वाहून आला होता, तेव्हा त्याला पाण्यात सोडण्यात आले होते. परंतु मंगळवारी दि. १९ जुलै रोजी 'मेलन हेडेड व्हेल' या डॉल्फिन सदृश दिसणाऱ्या दुर्मिळ समुद्री सस्तन प्राण्याचा मृतदेह वाहून आला.
'मेलन हेडेड व्हेल' हा समुद्री सस्तन प्राणी खोल समुद्रात आढळून येतो. डॉल्फिन पेक्षा आकाराने थोडा मोठा असणारा हा समुद्री प्राणी, ब्लॅकफिश या कुळातील आहे. लक्ष्वदीप बेटालगतच्या समुद्रात तसेच अरबी समुद्रात २५० ते ३०० मीटर खोली पर्यंत हा प्राणी वास्तव्य करतो. या प्राण्याचे असे वाहून येण्यामागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. तसेच या प्राण्याचा मृतदेह तपासणी आधीच पुरून टाकण्यात आला. यामुळे हे कारण अस्पष्ट आहे. परंतु. हवेच्या बदलामुळे, किंवा दिशा चुकल्यामुळे, किंवा आजारपणामुळे हा प्राणी वाहून आला असण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे मत आहे. या मेलन हेडेड व्हेलचा मृतदेह आधीच पुरला असल्यामुळे या मृतदेहाचा पुढील तपास होऊ शकला नाही असे समुद्री शास्त्रज्ञ माही माणकेश्वर म्हणाल्या.