देवेंद्र फडणवीस : कार्यकर्त्यांना आधार देणारा लोकाभिमुख नेता

    22-Jul-2022
Total Views | 126
 
devendra fadanvis
 
 
राजकारणात राहून सुसंस्कृतपणा जपणं अत्यंत अवघड काम असतं. नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि विधानसभेच्या आमदारांपासून ते विरोधी पक्षनेतापर्यंत, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पदं भूषविली. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात त्यांनी सत्तारूढ पक्षाला हलवून सोडले होते. त्यामुळे देवेंद्रजी कुठे अडचणीत येऊ शकतील, यासाठी अनेकांनी जंग जंग पछाडले. परंतु, एकही डाग त्यांच्यावर लागला नाही. मला वाटतं, हीच त्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कामाची पावती आहे.
 
 
राजकीय जीवनात किती उंची गाठायची, याचा विचार करू नका, जनतेसाठी आणि पक्षासाठी आपण किती उंचीचे काम करू शकतो, याचा विचार सातत्याने मनात ठेवा आणि त्यासाठी झोकून देऊन काम करा,’ असे विचार सातत्याने आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवणारे गुरुतुल्य मार्गदर्शक, उपमुख्यमंत्री, आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवसाप्रित्यर्थ सर्वप्रथम मी अभीष्टचिंतन करतो.
 
 
भाजपने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिल्यानंतर खर्‍या अर्थाने ही जबाबदारी पार पाडण्याचे बळ आणि मार्गदर्शन मला त्यांच्याकडून लाभले. या काळात अत्यंत जवळून या विविधांगी व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याचे भाग्यही मला मिळाले. राज्यातील अनेक प्रश्न आम्ही त्यांच्याकडे घेऊन जायचो. जात, धर्म, पंथ, पक्ष, आपला, परका यापलीकडे जाऊन त्या प्रश्नांचा अभ्यास करणे आणि त्यावरील उपाय शोधणे, ही त्यांची साधी कार्यपद्धती आहे आणि म्हणूनच पक्षातीलच नाही, तर अन्य पक्षातीलही नेते, कार्यकर्ते त्यांचा सल्ला कधी उघडपणे, तर कधी अपरोक्षपणे घेताना आम्ही पाहिले आहे. जनतेच्या प्रश्नांच्या बाबतीत किंवा विकासकामांच्या बाबतीत त्यांनी राजकारण कधी आडवे आणले नाही. ओबीसी, मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, एसटी कर्मचार्‍यांचा प्रश्न निर्माण झाला, महिला अत्याचाराच्या संदर्भातील कायदा करण्याचा विचार आला, कोरोना महामारीसारखी किंवा चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्तीसारखे संकट राज्यावर आले, त्यावेळी जेव्हा जेव्हा सरकारने विरोधी पक्षाचे सहकार्य मागितले, त्या त्या वेळी त्यांनी ते देण्याचेच नाही, तर सरकारला साहाय्यभूत ठरतील, अशा विधायक सूचना करण्याचे कामही केले, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो.
 
 
 
पण, त्याचवेळी सरकारच्या धोरणातील विसंगती, चुका, भ्रष्टाचार, अनियमितता, जनतेच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष याबाबतीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारची लक्तरे वेशीवर टांगण्यासही मागेपुढे पाहिले नाही. अधिवेशनात सरकारला घाम फोडण्याचे कामही त्यांनी चोख बजावले. व्यक्तिगत हेव्यादाव्यांना त्यांच्याकडे थारा नसतो. त्यामुळे पक्षीय असो वा इतर पक्षातील नेत्यांशी व्यक्तिगत संबंध कधी बिघडले नाहीत.
 
 
देवेंद्र हे ‘ग्रासरूट’वर काम करणारे, जनमानसातील नेते. कोकणावर लागोपाठ आलेल्या चक्रीवादळाचे संकट, राज्यातील विविध भागांत आलेल्या नैसर्गिक आपत्ती, सातारा, सांगली, कोल्हापुरात आलेला महापूर आणि अलीकडेच आलेलं ‘कोविड’चं संकट असेल, अशा सर्व काळात देवेंद्र हे घरात बसून नव्हते तर ते जनतेच्या दारात आणि शेतकर्‍यांच्या बांधावर होते. कोल्हापूरच्या महापुराचे संकट त्यांनी ज्याप्रकारे हाताळलं, तो प्रशासनासाठी एक मानदंड ठरला आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मदतीचा काढलेला शासन निर्णय आजही ‘आयडियल’ समजला जातो.
 
 
नैसर्गिक आपत्तीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एकत्रितपणे केलेल्या दौर्‍यातील एक प्रसंग मला आठवतो. त्याच काळात महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीही पाहणी दौर्‍यावर होते. माध्यमांनी या दोन दौर्‍यांची तुलना आपापल्या पद्धतीने केली होती. पावसाचा जोर खूप होता. सगळीकडे पाणीच पाणी होते, रस्त्यावरून किंवा टेकडीवरून पाहणी न करता देवेंद्रजी स्वतः नदीत उतरले. चिखल तुडवत शेतकर्‍यांच्या बांधावर गेले. नुकसानीबाबत चर्चा केली. त्यांचे दुःख समजून घेतले आणि दुसर्‍या बाजूला सोलापुरात तत्कालीन मुख्यमंत्री स्टेजवर अतिवृष्टीचा आढावा घेत होते. कुणावर टीका करणे, हा उद्देश नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत सांगण्याचा हा प्रयत्न आहे. मला आठवतंय, २०१९ आणि २०२० मध्ये राज्यात चक्रीवादळ, महापूर, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला.
 
 
देवेंद्र यांना विरोधी पक्षनेते असताना त्यांच्याकडे ‘पॉवर सेंटर’ म्हणून पाहिले जात होते, एवढा वचक त्यांनी त्यांच्या कामातून निर्माण केला होता. विरोधी पक्ष नेता म्हणून सभागृहात आज देवेंद्रजी काय बोलतील, कुणाची लक्तरे वेशीवर टांगतील, शासन, प्रशासनातील कोणता भ्रष्टाचार बाहेर निघेल, याची भीती सत्तारूढ पक्षाला आणि अधिकार्‍यांमध्ये होती. गिरीश महाजन यांच्या विरोधातील षड्यंत्राचा पदार्फाश करणारे पुरावे देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्हच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांना दिले किंवा नवाब मलिकांच्या अतिरेक्यांशी संबंधांचा पर्दाफाश केला असेल किंवा ‘अँटेलिया’ प्रकरण दाबले जात असल्याचे पुरावे सभागृहात मांडले असतील, अशा अनेक प्रसंगात कणखर विरोधी पक्षनेता आपण त्यांच्यात पाहिला.
 
 
आजकाल प्रत्येक जाहिरातीत २४*७ असे छापलेले असते, म्हणजे त्यांची सेवा आठवड्यातील २४ तास उपलब्ध असते. देवेंद्र फडणवीस हेदेखील कार्यकर्ते, नेते आणि जनता यांच्यासाठी २४ तास उपलब्ध असतात. मुख्यमंत्री असताना दिवसाचे १८-१८ तास ते काम करायचे, याचा अनुभव सर्वांनी घेतला. पण, विरोधी पक्षनेते असतानाही ते १८-१८ तास व्यस्त असायचे, हा अनुभव खरंच विरळा आहे.
 
 
देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाची परिसीमाही महाराष्ट्राच्या राजकारणाने पाहिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका झाली. यात केवळ कार्यकर्ते नव्हते, तर काही राजकीय पक्षाचे मोठे नेतेदेखील होते. परंतु, प्रत्येक वेळी त्यांनी ही टीका संयमाने पचवली. त्यांचे एकच ‘प्रिन्सिपल’ आहे आणि ते आम्हालाही सांगतात की, ‘टिकेला, टिकेने उत्तर देऊ नका, आपल्या कामाने उत्तर द्या!’
 
 
देवेंद्र फडणवीस यांना अनेक वेळा टोकाच्या टीकेला सामोरे जावे लागले, अनेक वेळा त्यांना टोमणे मारले गेले. मला आठवते, विधानमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘बजेट’च्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणात असे म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीस सरकारी पैशातून कार्यक्रम करतात.” मला हा टोमणा जिव्हारी लागला होता. पण, अशा टीकाटिप्पणीने विचलित होणार्‍यातले देवेंदजीनाहीत, हे अनेक उदाहरणांतून आपण पाहिले आहे. निवडणुकीतील ‘मी पुन्हा येईन’ या वाक्यावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका झाली. परंतु, टीकेला टीकेने उत्तर देण्याऐवजी त्यांनी आपल्या कामातून उत्तर दिले आणि सरकार आणून दाखवले. देवेंद्रजी पुन्हा तर आलेच, पण सगळ्यांना भुईसपाट करून आले.
 
 
महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळही पाहिला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने सर्वाधिक लक्षवेधी काळ कोणता असेल, तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा काळ आहे, असे म्हणण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. ज्या जलदगतीने केवळ साडेचार वर्षांच्या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक विकासाभिमुख प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली, त्यांची सुरुवात केली, पूर्णत्वास नेले, याची नोंद इतिहासात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकासाचे ‘व्हिजन’ आहे.
 
 
मुंबई, पुणे, नागपूरला मेट्रो, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी, मराठवाड्याला सुजलाम् सुफलाम् करू शकणारा मराठवाडा ‘वॉटर ग्रीड प्रकल्प’, दुष्काळ नाहीसा होण्यासाठी कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्याचा प्रकल्प, शाश्वत शेतीसाठी जलयुक्त शिवार, अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची मुहूर्तमेढ त्यांनी महाराष्ट्रात रोवली. मोठे प्रकल्प असो किंवा छोटी कामे, तेव्हढेच गांभीर्य ते त्या कामात दाखवतात, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक वेगळा पैलू आहे. ६०० पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्ती देण्याचा विषय अनेक वर्षं प्रलंबित होता. थोडा किचकट प्रश्न असतानाही त्यांनी त्यातून मार्ग काढला आणि या ६०० पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्त्या दिल्या.
 
 
आपण नेहमी पाहतो की, एखाद्या सोसायटीच्या अध्यक्षाला आपलं पद सोडावसं वाटत नाही. सत्ता परिवर्तनानंतर नेतृत्वाने घेतलेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय देवेंद्र यांनी जाहीर केला आणि सत्तेबाहेर राहून सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, ज्यावेळी वरिष्ठांकडून आदेश आले, त्यावेळी शिस्तबद्ध स्वयंसेवक कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले. मोदी साहेब त्यांना म्हणाले होते की, “देवेंद्र, नेते म्हणून तुमची द्विधा मनःस्थिती मी समजू शकतो. पण, राज्याच्या भल्यासाठी तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, तुम्हाला सत्तेत राहावे लागेल.” पक्षादेश शिरसावंद्य मानून मुख्यमंत्रिपद आनंदाने दुसर्‍याला देऊन विचारधारेचा विजय त्यांनी घडवून आणला. त्यांचा हा त्याग आणि संयम यावेळी संपूर्ण देशाने पाहिला. त्यानंतरची कार्यकर्त्यांची हळहळ त्यांच्यावरील निस्सिम प्रेमाची साक्ष देणारी होती, हेही देशाने पाहिले.
 
 
देवेंद्र फडणवीस हे खर्‍या अर्थाने बहुजनांचे नेते आहेत. ’बहुजन सुखाय, बहुजन हिताय’, याचा प्रत्यय त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिला. ओबीसी आरक्षण गेल्या अडीच वर्षांत वाचवता आले नव्हते. नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पहिली बैठक जर कोणती घेतली असेल, तर ती ओबीसी आरक्षणासंदर्भात. वकिलांशी, अधिकार्‍यांशी चर्चा केली, कशा पद्धतीने न्यायालयात बाजू मांडली पाहिजे, याची रणनीती ठरवली आणि ओबीसी आरक्षण वाचवण्यात ते यशस्वी ठरले.
 
 
ते मुख्यमंत्री असताना धनगर आरक्षणाबाबतचा अभ्यास करण्यासाठी ‘टीस’ या प्रतिष्ठित संस्थेची त्यांनी नेमणूक केली होती. त्यांचा अहवाल आलाही. परंतु, त्यांचे सरकार त्यानंतर गेले आणि हा विषय मागे पडला. ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला होता. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला विश्वास दिला, कोणतीही घीसाडघाई न करता, आरक्षणासाठी हजारो पुरावे गोळा केले, आयोगाचा अहवाल घेतला, अतिशय मजबूत कायदा तयार केला आणि मराठा समाजाला आरक्षण दिले. एवढेच नाही, तर उच्च न्यायालयापर्यंत ते टिकवले. परंतु, सत्ता बदल झाल्यानंतर मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यात नंतरचे सरकार अपयशी ठरले. आजही या प्रश्नांबाबत ते संवेदनशील आहेत आणि हाही प्रश्न ते धसास लावतील, हा विश्वास मराठा समाजाला आहे.
 
  
राजकारणात राहून सुसंस्कृतपणा जपणं अत्यंत अवघड काम असतं. नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि विधानसभेच्या आमदारांपासून ते विरोधी पक्षनेतापर्यंत, अनेक पदं त्यांनी भूषविली. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात त्यांनी सत्तारूढ पक्षाला हलवून सोडले होते. त्यामुळे देवेंद्रजी कुठे अडचणीत येऊ शकतील, यासाठी अनेकांनी जंग जंग पछाडले. परंतु, एकही डाग त्यांच्यावर लागला नाही. मला वाटतं, हीच त्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कामाची पावती आहे.
 
 
संकटकाळात आपल्या सहकार्‍यांना साथ देणारा आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणारा नेता मी त्यांच्यात नेहमी बघितला. मी विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता असताना माझ्यावर खोटेनाटे आरोप केले गेले, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. या संकटाच्या काळात देवेंद्रजी सतत माझ्या पाठीशी होते, धीरोदात्तपणे या संकटाला सामोरे जाण्याचे बळ त्यांनी मला या काळात दिले.
 
 
देवेंद्र फडणवीस हे एक उत्तम प्रशासक आहेत, हे सर्वच सांगतात. सत्तेत असताना ‘साईड पोस्टिंग’ दिलेल्या चांगल्या अधिकार्‍यांना त्यांनी कार्यकारी पदांवर आणले, त्यांना विश्वास दिला, काम करण्याची संधी दिली आणि खूषमस्कर्‍या अधिकार्‍यांना बाजूला सारले. प्रशासनाचा चेहरामोहरा बदलून पाच वर्षांच्या काळात प्रशासन जनताभिमुख केले.
 
 
अलीकडचाच एक प्रसंग मला आठवतो. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर ‘सागर’ बंगल्यावर कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांची प्रचंड गर्दी जमली होती. देवेंद्र फडणवीस यांचा स्टाफ आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना ही गर्दी आवरणे मुश्किल झाले होते. गर्दी थांबवावी का, अशा प्रकारची विचारणा देवेंद्र यांच्याकडे केली. तेव्हा ही गर्दी, ही जनता, हे कार्यकर्तेच आपलं खरं सामर्थ्य आहे, त्यामुळे सगळ्यांना भेटू, कुणालाही अडवू नका, अशी सूचना त्यांनी दिली, असा हा माणसातील नेता...
 
 
देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजाची पद्धत मी अनेक वेळा जवळून बघितली आहे. एकाच वेळी अनेक कामे अतिशय लिलया ते पार पाडत असतात. एका बाजूला कार्यकर्त्यांना भेटत असतात, त्यांच्याबरोबर फोटो काढत असतात, त्याचवेळी दुसर्‍या हॉलमध्ये जाऊन प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर बैठका घेत असतात. नेते, कार्यकर्ते यांच्याशी राजकीय चर्चा करीत असतात. दुसर्‍या बाजूला वकिलांशी कायदेशीर चर्चाही करीत असतात. ‘मल्टी टास्किंग’चे उत्तम ‘स्किल’ त्यांच्यात असल्याने ते प्रत्येक विषयाला वेळ आणि न्याय देऊ शकतात.
 
 
शारीरिक कष्टाची पर्वा न करता आणि प्रकृतीचे अवास्तव स्तोम न माजवता नागपूर, दिल्ली, मुंबई, गोवा, महाराष्ट्रातला गावोगाव ते सहज फिरत असतात. हा दौर्‍यांचा त्यांचा झपाटा आश्चर्यचकित करणारा आहे. प्रशासकीय कामकाज असो वा पक्षीय कामकाज, प्रत्येक कामात ‘पंक्च्युअल’ राहण्याचा त्यांचा आग्रह असतो. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता असल्यामुळे देवेंद्र यांच्याबरोबर अनेक दौरे करण्याचा योग मला आला. त्या प्रत्येक वेळी त्यांच्याकडून काही ना काही शिकण्यासारखे होते. राज्यभरात फिरत असताना ते नेहमी आपल्याबरोबर असणार्‍यांची काळजी घेत, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता भेटायला आला, तर शक्य होईल तेवढे समाधान करीत. त्यामुळेच विरोधकांना हा नेता आपला वाटतो.
 
  
नेतृत्वावर अपार श्रद्धा ठेवणारा आणि नेतृत्वाचे आदेश शिरसावंद्य मानणारा हा शिस्तबद्ध नेता आहे. हिंदुत्व आणि विकास या दोन गोष्टीत त्यांनी कधी तडजोड केल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही.
 
 
कार्यकर्त्याला बळ कसे दिले पाहिजे, हे देवेंद्र यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मुंबई बँकेचा अध्यक्ष असताना स्वयं पुनर्विकासासाठी पतपुरवठा करणारी योजना मी आणली होती. या योजनेला राजाश्रय देण्याचे काम त्यांनी मुख्यमंत्रिपदी असताना केले. नंतरच्या काळात या योजनेला खीळ बसली. पत्रव्यवहार किंवा फोनाफोनी न करता मला ते ‘आरबीआय’चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना अर्धा तास ही योजना आणि त्याची गरज त्यांनी समजावून सांगितली. एवढ्यावरच न थांबता, मला घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. मला सांगण्यास अभिमान वाटतो की, केवळ आणि केवळ त्यांच्याच प्रयत्नामुळे आज ‘आरबीआय’ने या योजनेला मान्यता दिली.
 
 
‘लीडरशिप क्वालिटी’बाबत असे म्हटले जाते की, ‘लीडर शुड बी गुड लिसनर.’ छोट्यातला छोटा कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता, विरोधी बाकावरील सदस्य असो किंवा शासकीय अधिकारी, प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि त्यानंतरच त्यावर मतप्रदर्शन करणे, हा त्यांच्या कार्यशैलीचा एक भाग आहे.
 
 
आपला सन्मान व्हावा, जंगी स्वागत व्हावं, असं अनेक नेत्यांना वाटत असतं. कधी कधी याचा त्रास जनतेला होतो. पण, आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस नेहमी घेतात, हे अनेक प्रसंगांतून मी अनुभवले आहे. गणपती दर्शनासाठी माझ्याकडे ते एकदा आले होते. व्यस्ततेमुळे उशिरा रात्री त्यांना वेळ मिळाला. ते आल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची माळ लावली. लोकं झोपलेली असतात, फटाक्यांच्या आवाजामुळे त्यांना त्रास होता कामा नये, असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना थांबविले. असेच एकदा सकाळी ३-४ वाजता बोरिवली येथे मेट्रो प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी ते आले. दिवसा भेट दिली, तर ट्रॅफिकमुळे जनतेला त्रास होईल म्हणून सकाळची ३-४ वाजताची वेळ निवडणारे देवेंद्रजी विरळाच!
 
 
वेळप्रसंगी त्यांनी विरोधकांना हेही दाखवून दिले की, उगीच नाद करायचा नाही. अलीकडेच झालेल्या राज्यसभेची निवडणूक असेल किंवा विधान परिषदेची निवडणूक असेल, ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ अशी उपहासात्मक टीका त्यांच्यावर केली गेली होती. परंतु, या दोन्ही निवडणुकीत त्यांनी सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षांना धोबीपछाड दिलीच, पण नंतर एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राने पाहिला. राष्ट्रहित, जनहित आणि पक्षहित यासाठी ते आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करीत असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
 
 
राजकारणात प्रत्येक ठिकाणी गट हे असतातच. परंतु, देवेंद्रजी असे गट-तट हाताळण्यात अतिशय वाकबगार आहेत. नवी मुंबई, नगर, ठाणे आणि राज्यातल्या इतर विभागातील अशा गटातटांना त्यांनी अतिशय उत्तमपणे हाताळले. एखाद्याला काही देता आले नाही, तरी कार्यकर्ता त्यांच्यावर नाराज होत नाही, एवढे प्रेम आणि विश्वास ते त्या कार्यकर्त्याला देतात.
विधान परिषद, राज्यसभा किंवा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान पक्षाच्या बैठका होत असायच्या, भोजनही एकत्र व्हायचे. तेव्हा देवेंद्र फडणवीस प्रत्येकाच्या टेबलवर जाऊन त्यांच्याबरोबर पाच-दहा मिनिटे घालवायचे, विषय समजून घ्यायचे, सर्वांना वेळ देणे, सर्वांचा सन्मान करणे, हा त्यामागील त्यांचा प्रयत्न असायचा. परवाच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान टायटन हॉटेलमध्ये आम्ही २०-२५ आमदार त्यांच्याभोवती बसलो होतो. एका बाजूला ते आमच्याशी गप्पा मारत होते, दुसर्‍या बाजूला शासकीय कामकाज करत होते, पत्रांवर सह्या करीत होते. आ. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केलेली खंत अतिशय बोलकी आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रगल्भता अधोरेखित करणारी होती. ‘आमचे नेतेही आम्हाला असेच जवळ घेऊन बसले असते, तर आज असा प्रसंग घडला नसता.’
 
 
कुणी कितीही हिणवले, टीका केली तरी दुसर्‍याचा सन्मान करण्याकडे देवेंद्र यांचा कल असतो. मला आठवते, नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ. नरेंद्र पाटील यांनी एक कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते. ‘प्रोटोकॉल’प्रमाणे मुख्यमंत्री सभेत सर्वात शेवटी भाषण करीत असतात. परंतु, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून उद्धव ठाकरे यांना शेवटी भाषण करण्याचा मान दिला.
 
 
प्रत्येक कार्यकर्त्याला देवेंद्रजी आपले वाटतात. कारण, तेही आपल्या कार्यकर्त्याला मनापासून जपत असतात. नागपूरला ते कामात खूप व्यस्त होते. एका कार्यकर्त्याचे लग्न होते. व्यस्ततेमुळे लग्नाला जाणे शक्य नसल्यामुळे व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शूट केला आणि तो त्या कार्यकर्त्याला पाठवला. हा कार्यकर्ता आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ऋणानुबंध दर्शविणारा असा हा प्रसंग...
 
 
देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या पुढाकाराने मंत्रालयात वैद्यकीय कक्ष उभारला गेला होता. या कक्षाची महाराष्ट्रात खूप चर्चा झाली. लाखो रुग्णांना मदतीचा हात मिळाला, अनेकांचे जीव वाचले. आजही हजारो कुटुंब देवेंद्र यांना दुवा देतात. नंतर आलेल्या सरकारने हा कक्ष बंद केला असला तरी त्याची गरज लक्षात घेऊन लाखो रुग्णांना मदत मिळवून देणारा कक्ष ते पुन्हा मंत्रालयात सुरू करतील, असा मला विश्वास आहे.
 
 
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कितीही पाने लिहिली तरी कमी पडतील. देवेंद्र फडणवीस यांना दीर्घायु मिळो आणि त्यांच्याकडून महाराष्ट्राची आणि देशाची सेवा निरंतर घडो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
 
 
 
- प्रवीण दरेकर
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121