वैदिक परंपरा आणि साधना

शिखंडी आणि भीष्मवध

    21-Jul-2022
Total Views | 112
 
vaidik
 
 
कौरवांचे पहिले सेनापती भीष्मच होत. दहा दिवसांपर्यंत ते सेनानी म्हणून राहिले आणि दहाव्या दिवशी शिखंडीची आड घेऊन अर्जुनाने त्यांना शरबद्ध केले. दशेंद्रियांशी युद्ध म्हणजे भीष्मांचे कौरवांकडे दहा दिवसांपर्यंत सेनापतीपद सांभाळणे होय.
 
 
महाभारतयुद्ध चालेपर्यंत शस्त्र न धरण्याची श्रीकृष्णांनी प्रतिज्ञा केली होती. परंतु, शरीररुप रथाचे चाक (शरीरं रथमेवतु-उपनिषद) धरून भीष्मांवर भगवंत धावून गेले. भीष्मांना तेच हवे होते. भीष्मांनी प्रतिज्ञा केली की, ते पृथ्वी नि:पांडव करतील. भगवान कृष्ण एका रात्री भीष्मांच्या शिबिरात गेले. त्यांनी द्रौपदीला सोबत नेले होते. भीष्म त्यावेळी ध्यानस्थ बसले होते. कृष्णाने द्रौपदीला (‘दृ’ म्हणजे लवकर व ‘पदी’ म्हणजे उच्च साधना पदावर जाणारी कायारूप पांडव पत्नी द्रौपदी होय.) भीष्माचे पाय धरण्यास सांगितले. एका स्त्रीचे हात लागल्यामुळे ध्यानस्थ भीष्मांनी तिला ‘अखंड सौभाग्यवति भव’ असा आशीर्वाद दिला. नेत्र उघडून पाहतात तो समोर द्रौपदी! आता ते पांडवांना कसे मारणार? त्यांनी स्वत:चे मरण सांगितले. शिखंडीला समोर करून अर्जुनाने त्यांच्यावर शरन्यास करावा, असे सांगितले. धन्य व्यासांची दिव्य कल्पकता!
 
 
शिखंडी म्हणजे डोक्यावर तुरा असलेला मोर होय. माणसातील शिखंडी कोण? ज्या साधकाने आपल्या डोक्यातील ‘सहस्रार’ या योगचक्रावर ध्यान केंद्रित करून समाधी साधली असेल, अशा श्रेष्ठ योगसाधकाला ‘वेदव्यासशिखंडी’ म्हणतात. शिखंडी जन्मत: स्त्री मानला गेला होता आणि याच देहात रुपांतर होऊन ती स्त्री लिंगभेदाने पुरुष बनला होता. परंतु, शिखंडी जन्मत: स्त्री असल्याने त्यावर शस्त्रसंन्यास न करण्याचे भीष्मांनी सांगितले आणि त्याला आड घेऊन अर्जुनाने भीष्मावर बाण चालवावे, असे भीष्म स्वमरण सांगतात. शिखंडी योगसाधकाच्या डोक्यावरील श्रेष्ठ सहस्रारयोगचक्र भेदून समाधी प्राप्त करतो. असला पराक्रमी साधक अध्यात्मात वीरपुरुष नव्हे का? पण, हा शिखंडी जन्मत: स्त्री कसा? तर सप्त योगचक्रातील पहिले योगचक्र मूलाधारात असते. ते साध्य झाल्यास कुंडलिनी जागृत होत असते. कुंडलिनी नाम स्त्रिलिंगी असल्याने शिखंडीला जन्मत: स्त्री मानले आहे.
 
 
शिखंडीला म्हणजे समाधी अवस्थेला आड करून अर्जुनाने भीष्मांवर शरवर्षाव केला. मग हे शर कशाचे होते आणि कशावर शरवर्षाव झाला? उपनिषद सांगतात, ‘प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षमुच्यते आत्मा’ हा शर असून तो ब्रह्मावर मारायचा असतो. अर्जुनरुप साधकातील प्रेरणाशक्तीने भीष्मरूप कुनिर्धारावर त्याला ब्रह्मरूप बनविण्याकरिता शरसंपात केला. सर्वांग विद्ध झाले, पण कुनिर्धार मरेना. शेवटी धर्मवृत्तीशी सतत चर्चा करीत करीत भीष्म अखेर 36व्या दिवशी देहत्याग करतात. देहत्याग म्हणजे मुक्ती होय. कुनिर्धार असा ब्रह्मरूप झाला, पण ३६व्या दिवशी. ३६ का तर त्रिगुणात्मक वृत्तीचा ’३’ आकडा ‘षड्दर्शना’चे पूर्ण अभ्यासज्ञान करण्याविरुद्ध होता म्हणून ३६ मध्ये ३ विरुद्ध ६ आकडा आहे. पण, दोन्ही अंक एक झाल्यास ब्रह्माचे पूर्ण ज्ञान होत असते. ९ नंतर कोणताच मोठा अंक नाही. म्हणून ३६ ची बेरीज ९ होते. पूर्ण ज्ञान झाल्यावर 36व्या दिवशी उत्तरायण सुरू झाल्यावर (साधकाची उत्तर अवस्था - उत्तरायण) भीष्म वारले. अशा तर्‍हेने एक उदात्त जीवन संपले. साधकाचा निर्धारसुद्धा उत्तम असावा, हे या कथेतील रहस्य आहे.
 
 
उत्तरायण : दक्षिणायण
भीष्माचे उत्तरायणातील मरणे म्हणजे त्यांनी भौगोलिक उत्तरायणात आपला देह ठेवला, असे विद्वान मानले जाते, पण तसे नसून अयन म्हणजे मार्ग व साधकाचे उत्तरावस्थेतील अयन म्हणजे भीष्मांच्या उत्तरायणातील मरण होय. उत्तर साधनावस्थेत साधकाची साधना बरीच प्रगल्भ झाल्याने आणि आता तो शिखंडी म्हणजे समाधी अवस्थेच्या छायेत ब्रह्मशरवर्षाव झेलत असल्याने पूर्ण होणार नाही का? भीष्माचे मरण असल्या आध्यात्मिक उत्तरायणात झाले आहे. असल्या उत्तरायणाचे वर्णन गीता करते-
 
 
अग्निज्योतिरहः शुक्ल: षण्मासा उत्तरायणम्श्रतत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः॥२४, अध्याय ८॥
‘अग्नी’ म्हणजे तप, ‘ज्योती’ म्हणजे ज्ञान, ‘अहः’ म्हणजे प्रयत्न, प्रगती: शुक्ल: म्हणजे उच्च वृत्ती, उच्च ज्योती मंडळ, ज्याचे झाले आहे असा श्रेष्ठ साधक ‘ब्रह्मविद्’ म्हणजे ब्रह्म जाणणारा झाल्यामुळे आता स्वतःच ब्रह्म बनला आहे. अशा श्रेष्ठ साधकाला आता दक्षिणायन संपवून उत्तरायण येण्याची वाट पाहण्याची आवश्यकता काय? असे असते तर भौगोलिक दक्षिणायणात ज्ञानेश्वरांनी आपला देह का ठेवला? दक्षिणायणात त्यांनी देह ठेवल्यामुळे ते अधम गतीला गेले का? कदापि नाही. असल्या उत्तरायणात म्हणजे समाधी लावून देह ठेवणारा साधक ब्रह्मच नाही का? भीष्माचे असे अमर मरण आहे. म्हणूनही उत्तरायण अवस्था भौगोलिक नसून आध्यात्मिक आहे.
 
 
अशुद्धपणा राहिल्यास जसे तांब्यापासून सोने होऊ शकत नाही, तद्वत धर्म अथवा साधनेत अशुद्ध कल्पना व अशास्त्रीय धारणा राहिल्यास साधक उच्च कोटीचा बनून मुक्त होऊच शकत नाही. वैदिक परंपरेत सहस्रावधी मुक्त ऋषिमुनी झाले तद्वत इतर धर्मपंथात झाले नाहीत याचे कारण म्हणजे त्यांच्या अशास्त्रीय व अज्ञानावर आधारलेल्या कल्पना होत्या. There's not to question why, there's but to do and die. अशी काही धर्मपंथांची अशास्त्रीय परंपरा आहे. परंतु, वैदिक म्हणजे ज्ञानमय (विद् म्हणजे ज्ञान प्राप्त करणे) परंपरेत प्रत्येक घटना, इतिहास वा कथेतील रहस्य कळायलाच हवे. गंगोत्तरीतून वाहणारी निर्मळ गंगा जशी वाराणशी कानपूरला जाऊन तेथील घाणीमुळे गटारगंगा बनते तद्वत वैदिक परंपरेत ज्या कोणी असे ज्ञानमार्ग खुला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना एकतर विरोध करते झाले किंवा ते बलशाली असल्यास त्यांचीच पूजाभक्ती समाजाने सुरू केली.
 
 
असे असले तरी समाजातील काही व्यक्ती मात्र ते सत्यज्ञान समजून तद्नुसार आपले जीवन यापन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. अशांची संख्या ज्यावेळी समाजात अधिक वाढते, त्यावेळेस समाज अधिक उन्नत होऊन पूर्वावस्थेकडे जात असतो. असल्या पूर्ण समाजाची पदचिन्हे वैदिक समाजाने अनेकवेळा पाहिली आहेत. इतर सर्व अवांतर धर्मपंथ काळाच्या ओघात नष्ट झाले, पण वैदिक परंपरा आजही उजळ माथ्याने या वैज्ञानिक काळातही गुरुस्थानी आहे. याचे कारण म्हणजे वैदिक परंपरेतील शास्त्रीय दृष्टिकोन होय. प्रस्तुत प्रयत्न त्याच ज्ञानमय वैदिक परंपरेचा एक सक्रीय भाग आहे.
 
 
 
- योगिराज हरकरे
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121