डोंबिवलीच्या युवकांनी तेवत ठेवला शिक्षणाचा ज्ञानदीप!

    20-Jul-2022   
Total Views |

dmn
 
 
 
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वृद्धीसाठी ‘प्रांगण फाऊंडेशन’ ही संस्था कार्यरत आहे. डोळखांबसारख्या परिसरात मुलांना रेनकोट, दप्तर, चप्पल नसल्याने पावसाळ्यातील चार महिने शाळेला सुट्टी द्यावी लागत असे. पण, ‘प्रांगण फाऊंडेशन’च्या माध्यमातून साहित्य पुरविले जात असल्याने विद्यार्थी ‘स्कूल चले हम’ म्हणत शाळेत जाऊन शिकण्याचा आनंद लुटतात. त्याविषयी...
 
 
२०१८ मधील पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. काही सदस्य (उरलेले अन्नवाटप कार्यक्रमात) ‘क्षुधायज्ञात’ काही वर्षांपासून कार्यरत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते डोंबिवलीमधील गरीब वस्त्यांमध्ये अन्नवाटप करण्यासाठी जात असत. अन्नवाटप करून झाल्यावरदेखील बरेच यक्षप्रश्न त्यांना भेडसावत होते. उदा. कमी शिक्षण. त्यामुळे वाढत जाणारी व्यसनाधिनता, बेरोजगारी आणि असे असंख्य प्रश्न... या प्रश्नांवर मात कशी करावी? याचा विचार सतत सुरु होता. फक्त विचार करून काही होत नाही. त्यासाठी कृती महत्त्वाची असते. त्यातूनच ‘प्रांगण’चा जन्म झाला आणि ती कृती ‘प्रांगण’च्या माध्यमातून घडून आणली. संस्थेचे मूळ उद्दिष्ट भारत देश सर्वतोपरी सक्षम करणे व समाजातील प्रत्येक घटकाला शैक्षणिकदृष्ट्या समान व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे आहे.
 
 
‘प्रांगण फाऊंडेशन’ची सुरुवात २०१८ साली तन्मय मुलगुंड, अक्षय हंचाटे, आशिष पुजारी, चार्मी विच्चीवोरा, स्वप्निल सरफरे, राहुल देशपांडे, हेतवी विच्चीवोरा, सागरिका अय्यर आणि वैभव नरेंद्र पाटील या तरुणांनी केली. स्वतःचे करिअर आणि समाजाची सेवा ही तारेवरची कसरत आजही ते करत आहेत.
 
 
‘प्रांगण फाऊंडेशन’चे प्रकल्प प्रोजेक्ट चंचलमन
गरीब वस्त्यांतील अंतर्गत शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीच्या अभ्यासात असे आढळून आले की, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि ते शिकत असलेल्या वर्गांचे अध्ययनस्तर यामध्ये प्रचंड तफावत आहे. हीच तफावत भरून काढण्यासाठी दि. २ ऑक्टोबर, २०१८ गांधी जयंती रोजी ‘प्रोजेक्ट चंचलमन’ची सुरुवात करण्यात आली. ‘प्रोजेक्ट चंचलमन’अंतर्गत वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना शनिवार व रविवार प्रत्येकी अडीच तास ‘केम्ब्रिज पब्लिकेशन’आधारित इंग्रजी शिकवण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. मागील तीन वर्षांत ९० हून अधिक विद्यार्थी ‘प्रांगण’च्या तीन ‘लर्निंग सेंटर’मध्ये शिक्षण घेत आहेत. ही सेंटर्स डोंबिवली पश्चिमेला भारतमाता विद्यालय, जोंधळे विद्यामंदिर आणि लोकप्रिय विद्यालय या शाळांमध्ये आहेत.
‘एलएसआरडब्ल्यू’ आणि ‘एबीएल’ पद्धतीचा उपयोग करुन इंग्रजी सुलभ व सोप्या तर्‍हेने ‘३:१’ किंवा ‘४:१’ अशा (विद्यार्थी :शिक्षक) प्रमाणात मोफत शिकविले जात आहे. आज या ज्ञानयज्ञात ६० पेक्षा अधिक तरुण-तरुणी १००हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे आणि डॉ. अब्दुल कलामांच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला शिक्षित भारत साकारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याअंतर्गत शिकणार्‍या नऊ विद्यार्थी या वर्षी दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले व त्यांचा गौरव म्हणून संस्थेने त्यांना शिष्यवृत्ती देऊ केली.
 
 
 
“याप्रसंगी हे अविरत सुरु असलेल्या ज्ञानयज्ञात सर्वात मोलाचा वाटा ‘एडुकेटर’ आणि स्वयंसेवकांचा आहे,” असे संस्थेचे सचिव तन्मय महेश मुलगुंड नमूद करतात.वनवासी पाड्यांवर जाऊन भेट देणे हे ‘प्रांगण फाऊंडेशन’च दुसरा उपक्रम ‘तय’अंतर्गत, आजपर्यंत दोन हजारांहून अधिक वनवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ‘प्रांगण फाऊंडेशन’तर्फे करण्यात आले.२०२० साली आलेल्या कोरोना महामारीच्या काळातही तरुणांनी त्यांचे ध्येय खचू दिले नाही आणि असंख्य अडथळे येऊनसुद्धा त्यावर मात करत ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अविरत शिक्षण सुरू ठेवले. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोबाईल फोन आणि रिचार्जेस ‘प्रांगण फाऊंडेशन’च्या माध्यमातून पुरविले गेले, जेणे करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये.
 
 
या सर्व उतार-चढावातून मार्ग काढत हे तरुण आणि तरुणी ही गुणवत्ता शिक्षणाची चळवळ वाढावी आणि ‘प्रांगण’मार्फत असेच वर्ग दुसर्‍याही शहरात स्थापन करावेत, अस मानस ते ठेवतात. संस्थेने त्यांच्या दुसर्‍याही उपक्रमाअंतर्गत वनवासी पाड्यावर भेट देऊन तेथील १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिकवृद्धीसाठी मदत करीत आहेत.शहापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम देहने या वनवासी पाड्यावर ‘प्रांगण फाऊंडेशन’ च्या माध्यमातून १०० विद्यार्थ्यांना रेनकोट, दप्तर, चप्पल आणि शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले. नुकतेच संस्थेला ‘सीएसआर’च्या माध्यमातून बेंचेस आणि कपाटांचे वाटप करण्यात आले, तसेच त्यांच्या समाजकार्याचा गौरव ‘एज्युकेशन एक्ससिल्लेन्स अवॉर्ड २०२१’ने करण्यात आला आहे. या तरुणांना आर्थिक मदत त्यांच्या दात्यांकडून मागील चार वर्षे दिली जात आहे, जेणेकरून एका विद्यार्थ्याला लागणारे शैक्षणिक साहित्य ‘प्रांगण फाऊंडेशन’ पुरवू शकते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.