कृष्णाने सारथ्य का स्वीकारलं?

    02-Jul-2022
Total Views |

devendra fadanvis
 
 
 
कृष्णाला आता अर्जुनाचा सारथी बनून हे महाभारत जिंकायचे आहे. कर्मसिद्धांताचा संकेत घेऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शपथ ग्रहण केली आणि अगदी त्याच क्षणापासून कामाला लागले. स्वार्थाच्या आजच्या जगात जिथे पद आणि प्रतिष्ठेसाठी काहीही घडते, तिथे देवेंद्र फडणवीसांसारखा नेता त्याग आणि पक्षादेश याचा वस्तुपाठ घालून देतो.
 
 
तुम्ही ब्राह्मण म्हणून त्यांचा द्वेष करा. समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी जनतेला पेशवाई आली सांगा. त्यांच्या विरोधात कट रचून युती करा. पण, या एकट्या नेत्याने तुमच्या सर्व कारस्थानांमध्ये तुम्हाला मागे टाकले ते खरेच! चिनी पौराणिक कथेतील ‘फिनिक्स’ पक्ष्यासारखा राखेतून उठलेला नेता म्हणजे देवेंद्र गंगाधर फडणवीस!
 
 
साडेसात वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास कसे काय तयार झाले, या प्रश्नावर सध्या बरीच चर्चा सुरु आहे. पण, खर्‍या अर्थाने उत्तर शोधायचं असेल, तर ते त्यांच्या इतिहासात आहे.
 
 
वयाच्या १७व्या वर्षी वडिलांना गमावलेला हा तरुण नेता. त्यांचे वडील केवळ आमदारच नव्हते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कर्मठ स्वयंसेवकही होते, ज्यांनी आपल्या मुलामध्ये देशभक्तीची भावना रुजवली. त्याला शिकविले की, ‘आधी राष्ट्र मग आपण.’ संघाचे संस्कार तर होतेच. संघाचे काम करून नंतर संघाचा प्रचारक होण्याची मनीषा बाळगणार्‍या देवेंद्रजींना संघाकडून राजकीय क्षेत्रात काम करण्याचा संकेत मिळाला आणि खर्‍या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली. वडील आमदार असले, तरी हा वारसा विचारांचा होता, घराण्याचा नाही. १९९२ साली देशातील सर्वात तरुण नगरसेवक म्हणून ते निवडून आले. यानंतर ते काही थांबले नाहीत. नगरसेवक, आमदार, पक्षाध्यक्ष ते मुख्यमंत्री आणि नंतर विरोधी पक्षनेतादेखील. या सगळ्या प्रवासात मेहनत, सातत्य आणि विचारांवरची निष्ठा कायम होती. या दरम्यान त्यांनी उत्तम सहकारी सोबत जोडले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे प्रत्येक मावळ्यासोबत नाते होते, अगदी तोच गुण या शिवभक्तामध्ये पण कुटून भरलेला दिसतो. लोकांच्या भावनांचा आदर करणारा हा महानायक विरळाच म्हणावा लागेल. म्हणूनच देवेंद्रजी जेव्हा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांचे कार्यकर्ते खूप मोठ्या विजयोत्सवाच्या तयारीत होते, पण देवेंद्रजीनी तो उत्सव टाळला. पक्षाचे माजी नेते गुडघे पाटील त्यावेळी निवडणूक जिंकले नव्हते. या कार्यकर्त्यांना त्यांनी समजावून सांगितले की, आपल्या आनंदापेक्षा त्यांचे दुःख मोठे आहे. इतकी पराकोटीची जाणीव असलेला हा नेता महानच म्हणावा लागेल!
 
 
गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ते तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडलेले आहेत. स्नेह, संपर्क आणि संवाद हा त्यांचा गाभा. मुख्यमंत्रिपदाच्या व्यस्ततेतही त्यांनी हा आपला धागा जमेल, तसा जपला. २०१४ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा महाराष्ट्रात जातीचे राजकारण शिगेला पोहोचले होते. त्यांनी फक्त विरोधकांचा बंदोबस्त केला, असे नाही, तर युतीमध्ये असूनही विरोधकांसारखे वागणार्‍या शिवसेनेला सोबत घेऊन सरकारही चालवून दाखविले. मराठा आरक्षणासारखे आंदोलनही कुठेही हिंसक वळण लागू न देता त्यांनी हाताळले, आरक्षणही दिले आणि ते असेपर्यंत ते न्यायालयाच्या कसोट्यांवरही टिकले. त्यानंतर जे झाले ते मराठा समाजाच्या दृष्टीने दुर्दैवीच म्हणावे लागेल. सत्ता नव्हती, तरीदेखील देवेंद्रजींनी या आरक्षणासाठीची धडपड सोडली नाही. हे आरक्षण राहावे, यासाठी देवेंद्रजींच्या विनंतीवरून केंद्र सरकारने राज्य सरकारला आरक्षण वाटप करण्यासाठी विशेष अधिकार देणारी दुरुस्ती केली. परंतु, मविआ सरकारने काहीच केले नाही. हा मोर्चाही या विषयात शांतच राहिला.
 
 
त्यांच्या कार्याची तीव्रता दर्शविणारे अजून एक उदाहरण म्हणजे कोरेगाव-भीमा, ‘एल्गार परिषद’ प्रकरण. जात हा न्याय मिळविण्याचा निकष नाही, हे त्यांनी दाखवून दिले. या नेत्याच्या मनात समाजातील शेवटच्या माणसाप्रति असलेली सहानुभूती खरे परिणाम देते. खर्‍या अर्थाने फुले-शाहू आणि आंबेडकरांचे जातीविरहित समाजाचे हेच ते स्वप्न नाही का?
या सगळ्यांच्या पलीकडे सर्वात आव्हानात्मक काळ होता, कोरोनाचा! त्यात मविआ सरकारचा सगळीकडे हाहाकार उडाला होता. विकास प्रकल्पांना स्थगिती. डागाळलेल्या मंडळींना मंत्रिपदे देण्यात आली होती. वाझे, मनसुख हिरेन प्रकरण, रुग्णालयांना लागणार्‍या आगी, कोरोनाचा मुकाबला करण्याच्या नावाखाली तर भ्रष्टाचार शिगेला पोहोचला होता.
या स्थितीत लोकांच्या स्तरावर काम करणारे आमदार अडचणीत आले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते आणि त्यांना कोणालाही भेटायचे नव्हते. कोणीही वाली उरलेला नाही, अशी तक्रार सत्ताधारी आमदारच शिंदेंकडेच करीत होते. अनेकवेळा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या परिस्थितीची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला, पण काहीच बदल झाले नाही.
मग जे झाले ते अपरिहार्यच होते. राजकारणात अनेक गोष्टींना तर्क नसतात. बाळासाहेबांच्या शिवसेनेला काँगे्रस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याने आपले भवितव्य काय? आपल्या आमदारांचे भविष्य काय? त्यांनी त्यांच्या मतदारांना काय उत्तर द्यायचे, हाच त्यांच्यासमोरचा प्रश्न होता.
 
 
शिंदे जेव्हा देवेंद्रजींना भेटले, तेव्हा त्यांनी हीच तळमळ बोलून दाखविली. त्यांना खात्री होती की, बाळासाहेब आणि त्यांचे हिंदुत्वासाठीचे समर्पण केवळ देवेंद्रजीच समजून घेतील. शिवसेनेच्या हिंदुत्वासमोर उभा राहिलेला हा पेच देवेंद्रजीच समजून घेतील, असा विश्वास त्यांना वाटला. पुढचा घटनाक्रम जगजाहीर आहे. देवेंद्रजींनी सत्तेत न राहण्याचा निर्णय घेतला व तो तसा जाहीरही केला. पण, पक्षश्रेष्ठींना हा निर्णय मान्य झाला नाही आणि अगदी वेळेवर देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होण्याचा निर्देश आला. संघसंस्कारांचा प्रभाव असल्याने हा निर्णय स्वीकारायला त्यांनी फारसा वेळ घेतला नाही. पण, सत्तेत येण्याची कुठलीच इच्छा नसताना या घडलेल्या घटनांमुळे ते जरा व्यथित झाले. कृष्णाला आता अर्जुनाचा सारथी बनून हे महाभारत जिंकायचे आहे. कर्मसिद्धांताचा संकेत घेऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शपथ ग्रहण केली आणि अगदी त्याच क्षणापासून कामाला लागले. स्वार्थाच्या आजच्या जगात जिथे पद आणि प्रतिष्ठेसाठी काहीही घडते, तिथे देवेंद्र फडणवीसांसारखा नेता त्याग आणि पक्षादेश याचा वस्तुपाठ घालून देतो. महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या इतिहासात असे उदाहरण नाही. फडणवीसांचे कर्तृत्व मोठे आहे, त्यांना भविष्यही मोठेच आहे आणि आता अनेक अनुभवही गाठीशी आहेत. अनेक भविष्यवेधी घटनांची ही नांदी आहे.
 
 
- डॉ. क्षितिजा गुणवंतराव  वडतकर