सामाजिक समरसतेचा वसा घेऊन आयुष्य व्यतित करणारे शेगावचे दामोदर परकाळे. त्यांच्या आयुष्याचा आणि विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...
दामोदर यांचे पिता उकर्डा परकाळे आणि आई शांता परकाळे सर्वसामान्य कुणबी दाम्पत्य. उकर्डा हे शेतमजुरी करायचे, तर शांताबाई गृहिणी. घरी अठराविश्व दारिद्य्रच. पण, तरीही धर्मसंस्कारात कुठेही कमी नव्हती. परकाळे कुटुंब मुळचे खामगावचेच. या गावातफक्त चौथीपर्यंत शाळा होती. त्यामुळे शिक्षणासाठी दामोदर यांना शेगावला मामाकडे पाठवण्यात आले. त्यावेळी खेळायला मिळते म्हणून दामोदर रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. बाल स्वयंसेवक ते पुढे संघकार्याची विविध जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली. खरे तर दामोदर संघ शाखेत रूळले, यालाही त्यांच्या आयुष्यातली ती घटना कारणीभूत आहे.
७०चे दशक असावे. शेगावजवळील खामगावात एक धार्मिक उत्सव होता. उत्सवाची सांगता गावभोजनाने सुरू झाली. पंगती बसल्या. या पक्तींत पाच-सहा वर्षांचे दामोदरही होते. इतक्यात गलका झाला. दामोदर यांच्या समोर बसलेल्या त्यांच्याच वयाच्या मुलांच्यासमोर गावातले काही ज्येष्ठ प्रतिष्ठित लोक उभे राहिले. ते काही बोलायच्या आतच ती दोन मुलं तिथून उठून पळू लागली. गावातल्या काही उत्साही लोकांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. दामोदर यांच्यासमोरच हे घडले. या मुलांना का मारले? तर त्यांना कळले की ही दोन मुल गावाबाहेर राहणारी होती. त्यांनी पंगतीत जेवायला बसून पंगत आणि उत्सव बाटवला होता. दामोदर छोटे होते, पण त्यांना राहून राहून त्या मुलांचे चेहरे आठवले. गरीब, घाबरलेले आणि भुकेलेले. घरी आल्यावर त्यांनी आईबाबांना हे सांगितले आणि विचाारले, “त्या मुलांना का मारले? त्यांनी तर काहीच केले नव्हते.” तर आईबाबांनी सांगितले, “रिवाज आहे.”
पण, वयाच्या पाचव्या वर्षी घडलेल्या प्रसंगांनी दामोदर यांच्या मनात जातीप्रथेबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली. एक माणूस दुसर्या माणसाला काही कारण नसताना तुच्छ कसा काय लेखू शकतो, हा विचार त्यांच्या मनात घर करून राहिला. त्यामुळेच दामोदर यांनी त्या क्षणापासून समाजातील जातीभेद, गटतट आपल्या स्तरावर संपुष्टात आणायचा निश्चय केला. शेगावला रा. स्व. संघाच्या शाखेत आल्यावर त्यांना पहिल्यांदा जाणवले ते जातपातविरहित सर्वसमावेशक समरसतेचे जीवन. विविध समाजगटातून आलेली मुलं एकत्रितरित्या आनंदाने खेळत, सहभोजन करत. आपला देश आणि समाज याबद्दल कथागोष्टी ऐकून त्यातून आपले आयुष्य ठरवत. या सगळ्यामध्ये दामोदर रमले.
दहावीनंतर घरच्या गरिबीमुळे त्यांनी ठरवले की, आपण स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण घ्यायचे. त्यामुळे लगेच नोकरी लागेल. त्यातूनच त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स’ विषयाचे प्रशिक्षण घेतले. त्यांना या प्रशिक्षणामुळे एका महाविद्यालयात नोकरीही मिळाली. अर्थात हे सगळे जसे लिहिले तसे सुरळीत नव्हतेच. गरिबी, प्रचंड संघर्ष त्यात होताच. मात्र, या सगळ्या व्यापात त्यांनी रा. स्व.संघाच्या माध्यमातून जनसेवा सुरूच ठेवली. यातले उल्लेखनीय कार्य म्हणजे शेगावमधील अण्णासाठे नगर आणि मोदीनगर येथील समाजजागृती होय. साधारण तीन दशकांपूर्वी या दोन्ही वस्त्यांतील वातावरण अतिशय वंचित असेच. वस्त्यांमध्ये अशिक्षितपणाचे प्रमाण जास्त, त्यामुळे बेरोजगारी, गरिबी आणि व्यसनाधिनता आणि सोबतच गुन्हेगारी वाढलेली.
वस्तीमध्ये परिवर्तन यावे यासाठी वस्तीतच राहून समाजकार्य करायचे असे दामोदर यांनी ठरवले. ते मोदीनगरमध्ये राहू लागले. अण्णाभाऊ साठे नगर आणि मोदीनगर य दोन्ही वस्त्यांमधील गंभीर परिस्थितीला कारणीभूत व्यसनाधिनता आहे. लोकांची व्यसनं सोडावायला हवीत, असा विचार दामोदर यांनी केला. सामाजिक, धार्मिक घटकांचा उपयोग करत त्यांनी या वस्तीतील विविध जातीपातीच्या लोकांना एकत्र आणले. भजन-कीर्तन, भागवत सप्ताह, धर्मगुरू यांच्या माध्यमातून वस्तीत कार्यक्रम सुरू केले. मोदीनगरमध्ये ३०० लोकांनी तुळशीमाळ गळ्यात घातली. माळ स्वीकारली म्हणजे दारू आणि तत्सम वस्तूंना स्पर्शही पाप, अशी वस्तीतल्या लोकांची भावना. त्यामुळे वस्तीतील विविध समाजगटातील ३००च्या वर लोकांची व्यसनाधिनता संपुष्टात आली. या वस्तीचे पाहून गावात इतरही लोकांनी व्यसन सोडले. शिक्षण आणि रोजगाराकडे लोकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. या दोन वस्त्यांमध्ये आमूलाग्र बदल झाला. रा. स्व. संघाच्या प्रेरणेने धर्मसमाजबंधातून दामोदर परकाळे यांनी शेकडो कुटुंबाच्या जीवनात विकास आणि प्रगतीचे संचित निर्माण केले. आयुष्यात काय कमावले, हे सांगताना ते म्हणतात, ”शेकडो कुटुंबांची प्रगती ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळाली, या सगळ्यांचे प्रेम आणि रा. स्व. संघाची प्रेरणा हीच माझी पुंजी. माझ्या घरी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतहीयेऊन गेले. त्यांचे मार्गदर्शन आणि स्नेह मिळणे हेसुद्धा आयुष्याचे संचितच!”
असो. ‘सावली बहुद्देशीय संस्थे’चे संस्थापक, ‘वीर अभिमन्यू वाचनालय’ आणि आणि ‘स्व. गोयंका वाचनालया’ची जबाबदारी सांभाळणारे आणि अनेक वर्षे ‘खामगाव अर्बन बँक’ तसेच ‘केशव अर्बन पतसंस्थे’ची जबाबदारी सांभाळणारे दामोदर सध्या नव्या संकल्पनेसाठी कार्यरत आहेत. सेवावस्तीतील गरजू, गरीब, होतकरू मुलांसाठी त्यांना गुरूकुल निर्माण करायचे आहे. त्यासंदर्भातील सगळे सोपस्कार त्यांनी पूर्णही केले आहेत. पुढील वर्षी शेगावमध्ये हे गुरूकुल सुरू होईल. हे सगळे कशासाठी? तर यावर दामोदर म्हणतात,
त्यजे विषमता एक बने हम,
कोटी हिंदू भारत संतान
सामाजिक समरसता से हो
हिंदू राष्ट्र का नवनिर्माण