मुंबई : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मुंबई भाजपच्यावतीने कोंकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमानी आणि गणेशभक्तांसाठी विशेष मोदी एक्सप्रेस धावणार आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भाजपच्यावतीने मोदी एक्सप्रेस चालवण्यात आली होती. मोदी एक्स्प्रेसच्या माध्यमातून मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरणमान्यांच्या मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. या एक्स्प्रेसचा गेल्या वर्षी अनेक प्रवाशांनी लाभ घेतला. दरम्यान या वर्षी देखील मुंबई भाजपच्यावतीने मोदी एक्सप्रेस धावणार आहे.
यंदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार
यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट कमी झाले असून, सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईमधून मोठ्या संख्येने चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. त्यांच्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली. ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली व सावंतवाडी इथे थांबेल.
जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन
ही ट्रेन 28 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दादर रेल्वेस्थानकातून सुटणार आहे. दादर ते सांवतवाडी असा या ट्रेनचा मार्ग असणार आहे. प्रवाशांना या ट्रेनमधून मोफत प्रवास करता येणार आहे. गेल्या वर्षी देखील ही ट्रेन चालवण्यात आली होती. प्रवासासोबतच प्रवाशांच्या एकवेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. यंदा देखील दादर ते सावंतवाडी दरम्यान मोदी एक्स्प्रेस धावणार असून, अधिकाधिक संख्येने प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.