ठाणे जिल्ह्यात दमदार पाऊस; जूनचा ‘बॅकलॉग’ भरणार

    16-Jul-2022
Total Views |

thane rains

 
 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी जुलै महिन्यात दमदार वर्षाव होत आहे. त्यामुळे पावसाने जूनचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ ३३.३ टक्के इतक्याच पावसाची नोंद करण्यात आली होती. यामुळे राज्यात जूनमध्ये कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत ठाणे जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर येऊन पोहोचला होता.


परंतु, जुलै महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात जिल्ह्यात तब्बल ८५०.४ मिलीमीटर पाऊस झाला असून, सरासरीच्या १९९.८ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यांत संततधार वर्षावाने बळीराजा सुखावला आहे. मात्र, तुलनेने मुरबाड तालुक्यात म्हणावी तशी पर्जन्यवृष्टी झालेली नाही. ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ या तालुक्यांत ८०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यात केवळ ६५७.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.


शहापूर तालुक्याला प्रामुख्याने टंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी शहापूर तालुक्यात जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीच्या ७२.६ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती, तर मागील महिन्यात केवळ ४५.३ टक्के इतकाच पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांसह नागरिकांचे डोळे जुलै महिन्यातील पावसाकडे लागले होते. यंदाच्या जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शहापूर तालुक्यात तब्बल ९०८.१ मिलीमीटर इतका पाऊस झाला असून, सरासरीच्या २१२.३ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.


यंदा शहापूर तालुक्यालाही चांगल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात सुरुवातीला चांगला पाऊस होताना दिसून येत होता. तसेच, जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाच्या परिसरात अगदी कमी पाऊस पडला असल्याने पाणी कपातीचे संकट घोंघावत होते. मात्र, आता पावसाने जून महिन्याचा ‘बॅकलॉग’ भरण्यास सुरुवात केली आहे.


तानसापाठोपाठ भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ

तानसामधून पाण्याचा विसर्ग सुरू असताना आता भातसा धरणाची पाणी पातळी वाढून १३४.८ मी. एवढी झाली आहे. भातसा धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य ओढा वाढला आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाची वक्रद्वारे येणार्‍या काही दिवसांत उघडण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे भातसा नदीच्या काठावरील विशेषतः शहापूर- मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.