नवी दिल्ली: श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातून पलायन केलेल्या गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. सभापतींनी राजीनामा स्विकारल्यानंतर आता ७ दिवसांत नवीन राष्ट्रपतींची नियुक्ती केली जाईल, असेही जाहीर केले असून पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली आहे.
श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक संकटामुळे जनतेने राजपक्षे कुटुंबास लक्ष्य केले आहे. राष्ट्रपतीपदावर असलेल्या गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केले होते, मात्र त्यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नव्हता. मात्र, त्यांनी १५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकेच्या संसदेचे सभापती महिंदा यापा अभयवर्धने यांनी त्यांचा राजीनामा मंजुर केला आहे. त्यानंतर येत्या सात दिवसांमध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांची नियुक्ती केली जाणार असल्याचे अभयवर्धने यांनी सांगितले आहे.
राजपक्षे यांचा राजीनामा गुरुवारी रात्री सिंगापूरमधील श्रीलंकन उच्चायुक्तालयामार्फत प्राप्त झाला होता. मात्र, त्याची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची घोषणा करण्यात आली. नव्या राष्ट्रपतींची नियुक्ती करण्यासाठी संसदेचे सभापती देशातील सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांसोबत संवाद साधणार आहेत. तोपर्यंत पंतप्रधान रनिस विक्रमसिंघे यांच्याकडे राष्ट्राध्यक्षांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.