मुंबई : फडणवीस-शिंदे सरकार येताच ठाकरे सरकारमध्ये रखडलेल्या अनेक गोष्टी धडाडीने कार्यान्वीत व्हायला सुरुवात झाली. अशातच गेली अडीच वर्ष वर्क फ्रॉम होम करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. १५ जुलै) भायखळा मध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामटेकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत चौकशी करण्यासाठी शिवसेनेच्या शाखेत ते हजर होते. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांना घडलेल्या प्रसंगावरून ठाकरेंनी सुनवले खरे मात्र त्यांची हीच तळमळ पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडवेळी दिसली नाही.
"आमच्या शिवसैनिकांच्या जीवाशी खेळ होणार असेल तर मग आम्ही शांत बसणार नाही. ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. त्यांच्या केसालाही धक्का लागला तरी त्याला तुम्ही जबाबदार असाल. शिवसैनिकाचं रक्त साखळू नये म्हणून मी शांततेचं आवाहन करतोय. सध्याचं राजकारण हे एकप्रकारे सुडाचं राजकारण आहे. यात तुम्ही पडू नका. तिथे काय करायचंय ते आमचं आम्ही बघू.", असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सुनवले. "राज्यात आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं. एकतर तुम्ही तुमचे हात वर करा. अन्यथा तुमच्याकडून काही होत नसेल तर शिवसैनिक त्यांचं स्वसंरक्षण करून घेतील.", असेही ते पुढे म्हणाले.
ठाकरे सरकार सत्तेत असताना १६ एप्रिल २०२० दरम्यान पालघरमध्ये साधू हत्याकांड प्रकरण घडले होते. त्यात दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची काही जमावाकडून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. त्यावेळी मात्र उद्धव ठाकरेंची अशी तळमळ कधी दिसली नाही. केवळ ते शिवसैनिक नसावेत म्हणून? त्यामुळे उद्धव ठाकरेंची याबाबत नेमकी भुमिका काय हा प्रश्न आजही उद्भवतो आहे.