मुंबई : राज्यात नव्याने आलेल्या फडणवीस-शिंदे सरकारने अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती संदर्भात मोठा निर्णय घेतलाच. गुरुवारी (दि. १४ जुलै) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्याबाबत जाहीर केले. विशेष म्हणजे फडणवीस-शिंदे सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करत खा. संजय राऊत यांनी त्याचे स्वागत केले आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नागपूर दौऱ्यावर असताना ते यासंदर्भात पत्रकारांशी बोलत होते.
"पेट्रोल आणि डिझेलच्या किमती संदर्भात घेतलेला निर्णय ही चांगली गोष्ट आहे. लोकांना या गोष्टीतून दिलासा मिळणार असेल आणि याबाबत सरकारने निर्णय घेतला असेल तर त्याचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे.", असे राऊत यावेळी म्हणाले.
पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी होणार स्वस्त!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला असून पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वधारल्याने त्याचा परिणाम भारतावर झाला व भारतातील तेलाच्या किमती वाढल्यात्याचा परिणाम सर्वच घटकांवर झाल्याने महागाई वाढली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलच्या करात कपात करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. देशातील इतर राज्यांनाही पंतप्रधानांनी कर कपात करण्याचे आवाहन केले होते. काही राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला तर बिगर भाजप शासित राज्यांनी इंधनावरील कर कमी केले नाहीत. महाराष्ट्रातही ठाकरे सरकारने पेट्रोल- डिझेलचे दर कमी केले नव्हते. त्यामुळे फडणवीस-शिंदे सरकारने पेट्रोल आणि डीझेलचे दर कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.