ठाणे: “ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर धरणाच्या परिसरात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे ही दोन्ही धरणे लवकरच ‘ओव्हरफ्लो’ होऊन वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणांच्या तसेच तानसा व वैतरणा नदीच्या परिसराच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे,” असे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची तानसा व मोडक सागर ही धरणे आहेत. तानसा व मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याची पातळी ही १२८.६३ मीटर व १६३.१४ टीएचडी इतकी आहे. मंगळवारी तानसा व मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी ही १२५.३३ मीटर व १६१.३३ मीटर इतकी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही पातळी पुढील काही दिवसात ओलांडली जाण्याची शक्यता असून ही दोन्ही धरणे ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही धरणाखालील तसेच तानसा व वैतरणा नदीलगतच्या शहापूर, भिवंडी, वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावांना व तेथील ग्रामस्थांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या परिसरातील शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले असल्याचेही प्रशासनाने कळविले आहे.