एका वैयक्तिक मित्राबरोबरच देशाच्या सच्चा साथीदाराच्या मृत्यूने भारताची मोठी हानी झाली आहे. शिंजो आबे एका राजकीय नेत्याच्याही पलीकडे प्रत्येक आघाडीवर खांद्याला खांदा लावून भारताबरोबर उभे राहणारे व्यक्तिमत्त्व होते. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी जपानच्या भारताबरोबरील संबंधांना नव्या उंचीवर पोहोचवले.
साऱ्या जगाला हादरविणारी आणि भारताला दुःखाचामोठा धक्का देणारी घटना गेल्या आठवड्यात जपानमध्ये घडली. जपान हा तसा शांतताप्रिय देश. अणुयुद्धातल्या राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि उरलेल्या जगाने त्याचे परिणाम भोगलेले असल्याने त्यातून शहाणपण शिकलेला देश. तंत्रज्ञान, देशांतर्गत अर्थनीती या आणि अशा कितीतरी आयामांवर जपान जगाच्या नकाशात वेगळा भासतो. भारताच्या दृष्टीने बोलायचे, तर शिंजो आबे यांच्या जाण्याने जे काही नुकसान झाले ते कधीही भरून न येणारे आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाला स्वत:चा एक रंग, आकार आणि गंध असतो. चकाचक दिसणार्या परिषदा, जागतिक नेत्यांचे लवाजमे, अशा परिषदांना फडकणारे विविध राष्ट्रध्वज व त्यात आपलाही तिरंगा पाहून आपल्यालाही अभिमान वाटतो. खरे आंतरराष्ट्रीय राजकारण काही निराळेच असते. आपापली संसाधने, आपापले मित्र, आपले भूप्रदेश, अन्य मित्र या आणि अशा कितीतरी प्रकारातून देश आपापल्या पदरात जे काही शक्य ते पाडून घेण्याचा प्रयत्न करीत राहतात.
भारत-जपानचे संबंध या पलीकडे होते. हे संबंध नेहरुंच्या काळापासून सुरू झालेले असले तरी त्याचा कळसाध्याय मोदींच्या काळातच रचला गेला. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही निभावणार नाही, अशी मैत्री आबेंनी निभावली. चीन नावाचा भस्मासूर आणि त्याचा महत्त्वाकांक्षी विस्तार रोखण्यासाठी त्यांनी समोर येऊन भूमिका घेतल्या. कपटकारस्थानी चीनचे विस्तारवादी मनसुबे ओळखलेल्या आबेंच्या दूरदृष्टीतूनच हिंद-प्रशांत क्षेत्रातील जपान, भारत, अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या साथीने ‘क्वाड’ संघटना आकाराला आली. आबेंनाच ‘क्वाड’चे जनक मानले जाते. २००७ साली ‘क्वाड’ची स्थापना झालेली असली तरी जवळपास एक दशकभर ‘क्वाड’ निष्क्रियच होती. तथापि, हिंद-प्रशांत क्षेत्रातील चीनचा वाढता हस्तक्षेप व डोकलाम वाद पाहता मनिलातील पूर्व आशियाई परिषदेदरम्यान २०१७ साली क्वाडच्या पुनरुज्जीवनासाठी शिंजो आबेंनी कितीतरी प्रयत्न केले. आज ‘क्वाड’चे नाव उच्चारले, ‘क्वाड’ची बैठक आयोजित केली, ‘क्वाड’मध्ये सहभागी देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी निवेदन जारी केले तरी चीनचा संताप अनावर होतो. कारण, चीनवर नियंत्रण ठेवण्याचे काम ‘क्वाड’ करते. चीनचा भारताच्या पूर्वोत्तरसीमेवरील प्रदेशावर कायम डोळा असतो तसेच हिंदी महासागरावरही वर्चस्व गाजवण्याची त्याची इच्छा आहे. पण, आबेंनी ‘क्वाड’ला सक्रिय करण्यातून भारतासाठी चीनला अंगावर घेण्याचे काम केले. इतकेच नव्हे, तर आता ‘क्वाड’कडे हिंद-प्रशांत क्षेत्रातील इतरही अनेक देश आकर्षिले गेले आहेत. ‘क्वाड’मध्ये आपणही सहभागी व्हावे, असे त्यांना वाटते. कारण, चीनचा सामना करायचा असेल, तर तो ‘क्वाड’च्या माध्यमातूनच होईल, असा त्यांचा विश्वास. परिणामी, ‘क्वाड’मुळे चीन चांगलाच शांत झाल्याचे दिसते. या यशामागे शिंजो आबेंचा सिंहाचा वाटा होता.
पंतप्रधानपद स्विकारल्यानंतर आबे २००७ साली सर्वप्रथम भारतात आले व त्यांनी भारताच्या संसदेत भाषण दिले. आपल्या ऐतिहासिक भाषणातून आबेंनी ‘दोन सागराच्या मिलना’चा नारा दिला व हिंद-प्रशांत संकल्पनेची पायाभरणी केली. मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्राची बाजू त्यांनी ठामपणे मांडली. आज सर्व जगाचे लक्ष मध्य-पूर्व अथवा अन्य भागांतून वळून हिंद-प्रशांत क्षेत्रावर एकवटले आहे, हिंद-प्रशांत क्षेत्र जागतिक राजकारणाचा मुख्य प्रवाह होत आहे. तसेच, भारत-जपान संबंधांतील आधारस्तंभ झाले आहे. त्यामागे शिंजो आबे यांचेच परिश्रम होते. त्यानंतर २०१४, २०१५ आणि २०१७ साली ते भारतात आले. आपल्या कारकिर्दीत भारताचा सर्वाधिक दौरा करणारे ते जपानचे पहिलेच पंतप्रधान. भारताने अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षरी केलेली नसल्याने जपानबरोबरचा अणुकरार अनेक वर्षे रखडलेला होता. पण, आबेंनी जपानमधील अण्वस्त्रविरोधी गटाला भारताची बाजू पटवून दिली अन् भारत-जपान अणुकरार प्रत्यक्षात आला. भारताच्या दृष्टीने जपानबरोबरचा अणुकरार महत्त्वाचा होता, यातून देशाची ऊर्जा सुरक्षितता पक्की झाली. यानंतर भारतासारख्या विकसनशील देशाचे दळणवळण वेगवान होण्यासाठी शिंजो आबेंनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला अतिशय कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून दिले. या प्रकल्पाच्या पायाभरणीवेळी भारतात आलेल्या आबेंनी ‘जय जपान-जय भारत’चा नारा दिला व नंतरही तो खरा करुन दाखवला. चीनबरोबरचा डोकलाम वाद असो वा सध्याचा नियंत्रण रेषेवरील तणाव, प्रत्येकवेळी जपानने भारताचे उघड समर्थन केले अन् चीनच्या कुरापतींचा विरोध केला. चीनसारख्या पाताळयंत्री देशाविरोधात भारतासाठी भूमिका घेणे धाडसाचे होते. पण, ते काम शिंजो आबे व त्यांच्या नंतर सत्तेवर आलेल्या जपानी नेतृत्वाने घेतली. आबेंच्या भारताबरोबरील दृढ व आत्मीय संबंधांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांना २०२१ साली ‘पद्मविभूषण’ने सन्मानित करण्यात आले.
भारताबद्दल विशेष आपुलकी असलेल्या आबेंची नरेंद्र मोदींशीही मैत्री होती. ते दि. १२ डिसेंबर, २०१५ रोजी पंतप्रधान मोदींबरोबर भारतातील अतिप्राचीन शहर काशीतही गेले होते. दोन्ही पंतप्रधानांनी काशीच्या दशाश्वमेध घाटावर गंगा आरती करत हातात गंगाजल घेऊन विश्वमांगल्याची प्रार्थना केली होती. शिंजो आबेंनी आपल्या हातात थाळी घेऊन गंगाआरती केली होती, तसेच त्यानंतर भारत-जपान मैत्रीचे प्रतीक ‘रुद्राक्ष कन्व्हेंशन सेंटर’ची पायाभरणी केली होती. पुढे अहमदाबाद-गांधीनगर प्रवासादरम्यान आबेंनी मोदींच्या रोड शोमध्येही भाग घेतला होता. मात्र, एका वैयक्तिक मित्राबरोबरच देशाच्या सच्चा साथीदाराच्या मृत्यूने भारताची मोठी हानी झाली आहे. शिंजो आबे एका राजकीय नेत्याच्याही पलीकडे प्रत्येक आघाडीवर खांद्याला खांदा लावून भारताबरोबर उभे राहणारे व्यक्तिमत्त्व होते. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी जपानच्या भारताबरोबरील संबंधांना नव्या उंचीवर पोहोचवले. २००६ साली त्यांनी भारत आणि जपानमध्ये विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी करारावर हस्ताक्षर करत भारत-जपान संबंध मजबूत करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले. आज मात्र, तेच आबक अकल्पनीय पद्धतीने जगातून नाहीसे झाले. त्याने जपानचे जितके नुकसान झाले, तितकेच त्यांचे जाणे भारतासाठीही अतिशय दुर्दैवी. त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून श्रद्धांजली.