द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीमुळे मिशनरी मनसुब्यांना चपराक!

    12-Jul-2022   
Total Views |

Murmu
 
 
 
मुर्मू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी घोषित होताच काही मिशनरी माफियांनी अनेक ट्विट करून त्यांच्या निवडीला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, अनेक दशकांपासून वनवासींचे धर्मांतर करू पाहणार्‍या मिशनरी माफियांना मुर्मू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी घोषित झाल्याने सडेतोड उत्तर मिळाले आहे, असे म्हणता येईल.
 
 
राष्ट्रपतीपदासाठी सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांकडून वनवासी समाजातील नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्या विजयाची आता केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. भाजप आणि मित्रपक्षांची मते तर मुर्मू यांना मिळणार आहेतच, पण विरोधी गटातील काही पक्षांनीही त्यांना पाठिंबा देऊ केला आहे. मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असा एक मतप्रवाह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतही आहे. एकूणच मुर्मू यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव होणे अटळ आहे.
 
 
मुर्मू राष्ट्रपती झाल्यानंतर वनवासी समाजाचे योजनाबद्ध रीतीने धर्मांतर करण्याचे जे प्रकार ख्रिस्ती धर्मगुरूंकडून घडत आहेत, त्यांना पायबंद बसेल. त्याचप्रमाणे वनवासी समाज हा हिंदू आणि हिंदुत्व यापासून वेगळा आहे, असा प्रयत्न, कटकारस्थान जे करीत आहेत, त्यांना मुर्मू यांच्या निवडीने आळा बसेल. जनगणनेमध्ये वनवासी समाजाचा हिंदू म्हणून उल्लेख असता कामा नये, यासाठी कार्यरत असणार्‍या शक्तींना यामुळे चपराक बसली आहे. सद्यस्थिती पाहता द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. त्यांचा विजय अधिकृतपणे घोषित झाल्यानंतर त्या देशाच्या पहिल्या वनवासी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतील. मुर्मू यांची या पदासाठी निवड झाल्याने ‘वनवासी हे हिंदू नाहीत’ असा अपप्रचार करणार्‍यांना आणि वनवासी समाजाची आगामी राष्ट्रीय जनगणनेत त्याप्रमाणे नोंद करू पाहणार्‍यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत, असे म्हणता येईल. मुर्मू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी घोषित होताच काही मिशनरी माफियांनी अनेक ट्विट करून त्यांच्या निवडीला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, अनेक दशकांपासून वनवासींचे धर्मांतर करू पाहणार्‍या मिशनरी माफियांना मुर्मू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी घोषित झाल्याने सडेतोड उत्तर मिळाले आहे, असे म्हणता येईल.
 
 
द्रौपदी मुर्मू यांची मंदिराची झाडलोट करतानाचे आणि शंकराचे वाहन असलेल्या नंदीच्या कानामध्ये कुजबुजत असल्याची छायाचित्रे अलीकडील काळात समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ झाली आहेत. ही छायाचित्रे त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरच्या दिवसाची असली तरी झारखंडच्या राज्यपाल म्हणून ऑगस्ट २०२१ मध्ये निवृत्त झाल्यानंतर आपल्या घरी परतल्यानंतर त्यांचा हा नित्यक्रमच राहिला आहे. हे चित्र पाहिल्यानंतर वनवासींना हिंदू समाजापासून वेगळे करण्याच्या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या प्रयत्नांना नक्कीच हादरा बसला आहे. एक संथाल हिंदू वनवासी महिला राष्ट्रपती भवनात विराजमान होणार, हा एक जबरदस्त संदेश, वनवासी समाजास हिंदू समाजापासून दूर नेऊ पाहणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.
 
 
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासारखे काही नेते, वनवासी कधीच हिंदू नव्हते आणि असणार नाहीत, असे वक्तव्य हार्वर्ड विद्यापीठात आयोजित एका परिषदेमध्ये केले होते, तर दि. ११ नोव्हेंबर,२०२० या दिवशी झारखंड विधानसभेने एक प्रस्ताव संमत करून वनवासी लोकसंख्येसाठी एक स्वतंत्र धार्मिक संहिता असावी, अशी मागणी केली आहे. अशाच प्रकारची चर्चा वनवासीबहुल छत्तीसगढ, ओडिशा, मध्य प्रदेश, प. बंगाल आणि आसाम या राज्यांमधून सुरू झाली आहे. वनवासी हे हिंदू नाहीत, त्यामुळे त्यांना स्वतंत्र धर्माची ओळख दिली जावी, अशी मागणी केली जात आहे. समाजात असलेले तथाकथित बुद्धिवंत, वनवासी समाज हिंदू नसल्याचे बिंबविण्याचा कित्येक वर्षांपासून अथक प्रयत्न करीत आहेत. एकदा का वनवासी आणि हिंदू समाजात फूट पडली की, धर्मांतर करणार्‍या माफियांना हिंदू समाजाशी हजारो वर्षे बांधल्या गेलेल्या वनवासींचे धर्मांतर करणे सहजसुलभ होणार आहे.
 
 
या सर्व पार्श्वभूमीवर मुर्मू यांची राष्ट्रपतीपदासाठी जी निवड करण्यात आली आहे, त्याकडे पाहिले पाहिजे. मुर्मू यांची राष्ट्रपती म्हणून जी निवड होणार आहे, त्यामुळे केवळ ओडिशामधीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील वनवासी बांधवांसाठी एक चांगला संदेश जाणार आहे. तसेच, वनवासी समाजास हिंदू समाजापासून वेगळे पाडण्याचे जे प्रयत्न काही महाभाग करीत आहेत, त्यांचे प्रयत्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.
 
 
न्यायमूर्तींच्या वक्तव्यामुळे घोर निराशा : आलोक कुमार
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांनी नुपूर शर्मा प्रकरणी जे भाष्य केले, त्यामुळे हिंदू समाजात संतापाची एकच लाट उसळली आहे. न्यायदानाचे कार्य करणार्‍या सर्वोच्चन्यायालयातील न्यायमूर्तींनी लक्ष्मणरेषा ओलांडायला नको होती, असे मत हिंदू समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. नुपूर शर्मा प्रकरणी जो वाद निर्माण झाला, त्यास ती एकटीच जबाबदार आहे. तिच्या वक्तव्यामुळे उदयपूरची आणि देशातील अन्य घटना घडल्या, असे भाष्य या दोन न्यायमूर्तींनी केले होते. या दोन न्यायमूर्तींनी नुपूर शर्मा यांना कोणत्या आधारे जबाबदार धरले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. एवढेच नव्हे, तर नुपूर शर्मा यांनी दूरचित्रवाणीवर येऊन आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, असेही या न्यायमूर्तींनी म्हटले होते. आपल्या देशाचा कारभार राज्यघटनेनुसार चालतो की शरीयतनुसार, हेच दोन न्यायमूर्तींनी घेतलेल्या भूमिकेवरून लक्षात येत नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी जी भूमिका घेतली ती पाहता, सर्वोच्च न्यायालय देशातील बहुसंख्य समाजास ‘दुय्यम दर्जाचे नागरिक’ म्हणून वागवत असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारच्या निषेधार्थ हिंदू समाजाने अलीकडेच नवी दिल्लीत ‘संकल्प मार्च’ काढला होता. त्यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी, नुपूर शर्मा यांनी आपली मर्यादा सोडली होती की नाही, याचा निर्णय न्यायालयाने करावयाचा आहे. न्यायालय जोपर्यंत त्यांना दोषी ठरवत नाही तोपर्यंत त्या निर्दोष आहेत. कोणताही जमाव त्या दोषी आहेत की नाही, हे ठरवू शकत नाही, असे ते म्हणाले. न्यायमूर्तींनी अनावश्यक टीकाटिप्पणी करता कामा नये, असेही आलोक कुमार म्हणाले. हिंदू समाजाने ‘संकल्प मार्च’कडून आपला देश घटनेनुसार चालणार असल्याचे या मार्चच्या वेळी ठणकावून सांगितले.
 
 
अजमेर दर्ग्याच्या मौलवींमुळे व्यापारउदीम ठप्प!
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्ये केल्यामुळे अजमेरच्या दर्ग्यास ईदनिमित्त भेट देणार्‍या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. मौलवींनी केलेल्या घोषणेमुळे मुस्लीम भाविकांनी दर्ग्याकडे पाठ फिरविणे पसंत केले. अजमेर दर्ग्यास भेट देणार्‍या भाविकांमुळे तेथे असलेले व्यापारी, दुकानदार यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. यानिमित्ताने सुमारे ५० कोटींची उलाढाल होते, असे सांगण्यात आले. पण, मौलवींनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याचा भाविकांवर विपरित परिणाम झाला आणि त्यांनी यात्रेकडे पाठ फिरविली. अजमेर दर्ग्यास भेट देणार्‍या भाविकांमुळे त्या भागातील हॉटेल्स भरलेली असत. पण, यावेळी ती ओस पडल्याचे दिसून आले. मौलवींच्या प्रक्षोभक वक्तव्यमुळे आमचा ९० टक्के व्यवसाय बुडाला, असे तेथील व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. शुक्रवारचा जुम्माचा दिवस असूनही अजमेरच्या रस्ते आणि गल्ल्या ओस पडल्याचे दिसून आले. ख्वाजा गरीब नवाझच्या खादीमानी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे भाविकांच्या संख्येत घट झाली. नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध आतापर्यंत तीन खादिमांनी प्रक्षोभक वक्तव्ये केली आहेत. या वक्तव्यामुळे तेथील हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवसाय यांच्यावर परिणाम झाला. या प्रक्षोभक वक्तव्यांचा आधी आमचा व्यवसाय खूप चांगला चालत होता. पण, आता सर्व विक्रेत्यांना मंदीचा फटका बसला. घाबरून लोक घराबाहेर येत नसल्याचे एका व्यापार्‍याने सांगितले.
 
 
अनेक भाविकांनी आपले हॉटेल बुकिंग रद्द केल्याने दर्गा बझार, दिल्ली गेट, दिग्गी बझार, खादिम मोहल्ला. कमानी गेट, लाखन कोटरी आदी भागातील हॉटेल्स आणि विश्रामगृहांवरील व्यवसायांवर त्याचा परिणाम झाला. गेल्या वर्षी आमचा व्यवसाय चांगला झाला, पण उदयपूरची घटना आणि त्यानंतर करण्यात आलेली वक्तव्ये याचा आमच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला, अशी माहिती एका हॉटेल चालकाने दिली. द्वेष पसरविणार्‍या वक्तव्यांचा येथील व्यवसायावर परिणाम झाला. भाविकांनी अजमेरच्या भेट देण्याचे टाळले. भाविकांनी दर्ग्याकडे पाठ फिरविल्याने व्यावसायिकांचे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती ‘दर्गा बझार बिझनेस असोसिएशन’चे अध्यक्ष होतचंद श्रीनानी यांनी दिली. दरम्यान, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राजस्थान पोलिसांनी अजमेर दर्ग्याच्या एका मौलवीस अटक केली आहे. नुपूर शर्माचे शीर आणून देणार्‍यास आपण आपले घर आणि सर्व संपत्ती देऊ, असे त्या मौलवीने घोषित केले होते. मुस्लीम समाजातील काही धर्मांधांकडून नुपूर शर्मा प्रकरणी ज्या धमक्या देण्यात आल्या. तसेच उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या एका हिंदूंची हत्या करण्यात आली. त्याचा परिणाम अजमेर दर्ग्यास भेट देणार्‍यांवर कसा परिणाम झाला, याची कल्पना या सर्वांवरून यावी.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.