मुंबई : 'ज्ञानवापी प्रकरणापासून देशभरात मोठ्या प्रमाणात धार्मिक चर्चांना सुरुवात झाली आहे. शिवलिंग - हिंदू मंदिर आणि देवदेवतांशी संबंधित विषयांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून त्यातून अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्यातच युट्युबवरील एका चॅनलवर हिंदूंचे दैवत असलेल्या भगवान महादेव आणि शिवलिंग यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह टाकण्यात आला आहे.
त्याच चॅनलवर इलियास शरफुद्दीन नामक व्यक्तीने शिवलिंगाबाबत अत्यंत अशोभनीय आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले असून त्यामुळे दोन समुदायांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इलियास शरफुद्दीन या व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा,' अशी मागणी विधिज्ञ धृतिमान जोशी यांनी केली आहे.
इलियास शरफुद्दीनने केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी धृतिमान जोशी यांनी आझाद मैदान पोलीस स्थानकात धार्मिक भावना भडकविणे आणि धार्मिक तेढ निर्माण करणे या अंतर्गत तक्रार दाखल केली असून इलियासवर भारतीय सेंड संहितेच्या कलम १५३ A, २९५ A, ५०४, ५०२(२), ५०६ आणि ३४ अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.
इलियासचे झाकीर नाईक आणि आयआरएफशी संबंध
युट्युबच्या माध्यमातून हिंदू देवदेवतांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आणि त्यातून धार्मिक तेढ निर्माण करणारा इलियास शरफुद्दीन विषयी धृतिमान जोशी यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. 'इलियास शरफुद्दीन हा वादग्रस्त आणि चिथावणीखोर भाषणे करून दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कथित इस्लाम धर्मगुरू असणाऱ्या झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनशी संबंधित आहे.
तो इस्लामिक रिसर्च फाउंडेशनमध्ये सक्रिय देखील होता. झाकीर नाईकवर काही दिवसांपूर्वी ईडीतर्फे कारवाई करण्यात आली होती, त्याच धर्तीवर आता झाकीरशी संबंधित असलेल्या इलियासवर देखील ईडीकडून कारवाई करण्यात यावी,' अशी मागणी धृतिमान जोशी यांनी केली आहे.