अंबरनाथ: नदीकिनारी वृक्षारोपण करून गेल्या १०० दिवसांपासून सुरु असलेल्या वालधुनी नदी आणि संवर्धन अभियानाची सांगता करण्यात आली. नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आणि पर्यावरण प्रेमींच्या साक्षीने विविध प्रकारची रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. १०० दिवसांच्या अभियानाची सांगता करण्यात आली असली तरी नदी स्वच्छतेचे काम यापुढेही अविरत सुरु ठेवले जाणार असल्याचे यावेळी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
माझे गाव , माझी नदी या भावनेतून लोकसहभाग आणि श्रमदान यांतून १४ फेब्रुवारीपासून जागतिक पर्यावरण दिन ५ जूनपर्यंत १०० दिवस अभियान राबवण्याचा निर्धार मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी केला होता. यासाठी नगरपालिकेचे अधिकारी , कर्मचारी, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, जलतज्ञ, मातोश्री आरोग्य सेवा ट्रस्ट, वालधुनी बिरादरी, काकोळे ग्रामस्थ, वालधुनी मित्रमंडळ, अर्पण महिला योगा केंद्र, भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला होता, वालधुनी नदी उगम पावणाऱ्या काकोळे या ठिकाणापासून शिवमंदिरापर्यंत सहा टप्प्यांत नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती.या मार्गात नदीपात्रात काठी ठिकाणी मातीचे बंधारे बांधण्यात आले , पाणी शुद्धीकरणासाठी कल्कीचे द्रावण करून ते पाण्यात सोडण्यात आले. नगरपालिका आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून नदीपात्राच्या दोन्ही किनारी भारतीय प्रजातीची एक हजार झाडे लावून ती जोपासण्याचा आणि नदीपात्र कायम स्वच्छ रहाण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
सोमवार ७ जून रोजी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या हस्ते नदीकिनारी वृक्षारोपण करताना उप मुख्याधिकारी संदिप कांबळे, आरोग्य निरीक्षक सुहास सामंत, राजेंद्र हावळ, राजेश तडवी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, योगेश पाटील, अर्पण महिला मंडळाच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नदी स्वच्छता मोहीम लोकसहभागातून करण्यात आली असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात आली नाही, नदी संवर्धनाची १०० दिवसांची मोहीम प्रतिकात्मक होती, नदी स्वच्छ रहावी यासाठी प्रत्येक नागरिकाने दक्षता बाळगावी असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी केले.