नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन युद्धाला आज १०४ दिवस पूर्ण झाले. युद्धाच्या सुरुवातीला रशिया सारख्या बलाढ्य देशापुढे युक्रेनचा फार काळ टिकाव लागणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्षत मात्र तसं घडताना दिसून आलं नाही. या युद्धात युक्रेनने निकराचा लढा दिला. अंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा इतर राष्ट्रांकडून रशियाची कोंडी करण्याचे बरेच प्रयत्न केले गेले. रशियाने आमचे कितीही नुकसान केले तरी आम्ही प्राणपणाने लढू,असा विश्वास युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला होता. युद्धाला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटून देखील युक्रेनची झुंज कायम असल्याने, या युद्धात प्रतीकात्मक दृष्टीने रशियाचा पराभव झाला असा काही अभ्यासकांनी दावा केला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, युद्ध सुरु झाल्यापासून आता पर्यंत सुमारे १.४० करोड लोकांनी युक्रेनहून इतरत्र स्थलांतर केलं आहे. तसेच या युद्धाचा परिणाम ३० लाख मुलांच्या शिक्षणावर झालेला दिसून येतो. युक्रेनने या युद्धातून माघार घ्यावी म्हणून रशियन सैन्य आता धार्मिक स्थळांना लक्ष करत आहे. देशातील ११३ चर्चचं नुकसान केल्याची माहिती झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली. आता पर्यंत १३७६ रशियन टँक्स,२१० पेक्षा जास्त विमान विमानं या युद्धात कामी आली असून युक्रेनच्या २०% भागावर रशियाने कब्जा केला आहे. युक्रेनच्या महत्वाच्या शहरांवर ताबा घेण्यासाठी रशियन सैन्य आक्रमक झालेल आहे. अमेरिका व नाटो देशांकडून मोठ्या प्रमाणात युक्रेनला होत असलेली मदत देशांतर्गत भागात पोहचू नये म्हणून रस्ते, पूल, रेल्वेलाईन नष्ट करण्याचं काम रशियन सैन्याने सुरु केलं आहे .
दोन दिवसांपूर्वी युक्रेनची राजधानी कीव्ह शहरावर रशियाने जोरदार हल्ला केला. रशियन सैन्याने अनेक युक्रेनियन मिलिटरी बेस नष्ट केले. नुकताच रशियाने युक्रेनच्या टी-७२ या घटक मिसाईल टॅंकला उडवून दिलं. पश्चिमी देशांकडून युक्रेनला होत असलेली शास्त्रांची मदत तात्काळ बंद करावी, अन्यथा आम्ही नव्या ठिकाणांवर हल्ले करू! असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिला आहे. झेलेन्स्की म्हणतायत या युद्धात आतापर्यंत आम्ही ३०,००० रशियन सैन्याला ठार केलं. तसेच रशियाचे ९ जनरल व ३४ कर्नल मारले गेले, असाही दावा करण्यात येतोय. घातक शास्त्रांच्या वापरासह १०० दिवसांपेक्षा जास्त काळ सुरु असलेलं हे युद्ध केव्हा संपतंय, याकडे जागाच लक्ष लागलं आहे.