
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) कर्नाटकमधील ४ आणि उत्तर प्रदेशातील २ कार्यालये बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे. त्याची पुढील चौकशी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाद्वारे (एटीएस) केली जाणार आहे.
त्याविषयी माहिती देताना उ. प्र. एटीएसने म्हटले की, या प्रकाराविरोधात भादंवि कलम ५०७ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (एफ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या मोबाईल क्रमांवरून ही धमकी देण्यात आली, त्याचे स्थान तपासले असता ते तामिळनाडूमध्ये असल्याचे दिसून आले. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांच्या अंतर्गत सुरक्षा शाखेशी संपर्क साधून सदर आरोपीस पुडुकूडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीचे नाव राज मोहम्मद असून त्यास ताब्यात घेण्यासाठी उ. प्र. एटीएसचे पथक रवाना झाले आहे. आरोपीची पुढील चौकशी उत्तर प्रदेशात एटीएसद्वारे केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
रा. स्व. संघाची कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील एकुण ६ कार्यालयांना बॉम्बस्फोटाद्वारे उडवून दिले जाणार असल्याची धमकी सोमवारी रात्री व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देण्यात आली होती. अल अन्सारी इमाम राझी उन मेहंदी' या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कन्नड, इंग्रजी आणि हिंदी भाषेत ही धमकी देण्यात आली होती. ती बाब उत्तर प्रदेशातील एका संघ कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर लखनऊ येथील मडियाव पोलिस स्थानकामध्ये त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.